पंतप्रधान कार्यालय

रोजगार मेळाव्या अंतर्गत एक लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 12 FEB 2024 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2024

 

माझ्या प्रिय तरुण मित्रांनो,

आज 1 लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. तुम्ही तुमच्या कठोर मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. मी तुम्हा सर्वांचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो. भारत सरकारमध्ये तरुणांना नोकऱ्या देण्याचे अभियान वेगाने सुरू आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये, नोकरीची जाहिरात जारी करण्यापासून ते नियुक्ती पत्र देण्यापर्यंत खूप वेळ लागत असे. या विलंबाचा फायदा घेत, त्या काळात लाचखोरीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात सुरू होते. आम्ही आता भारत सरकारमधील भरतीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली आहे. इतकेच नाही तर भरती प्रक्रिया निर्धारित वेळेतच पूर्ण व्हावी यावर सरकारचा खूप भर आहे. यामुळे प्रत्येक तरुणाला त्याची योग्यता सिद्ध करण्याची समान संधी मिळू लागली आहे. आज प्रत्येक तरुणाच्या मनात असा विश्वास आहे की तो कठोर परिश्रम आणि त्याच्या प्रतिभेच्या जोरावर आपले स्थान निर्माण करू शकतो. 2014 पासून युवकांना भारत सरकारशी जोडण्याचा आणि त्यांना राष्ट्र उभारणीत भागीदार बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील सरकारने 10 वर्षांत जितक्या नोकऱ्या दिल्या, भाजपा सरकारने 10 वर्षांत त्याच्या सुमारे दीडपट जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. आज दिल्लीत एकात्मिक प्रशिक्षण संकुलाचीही पायाभरणी करण्यात आली आहे. मला विश्वास आहे की नवीन प्रशिक्षण संकुल आमच्या क्षमता निर्मितीच्या उपक्रमाला आणखी बळकटी देईल.

मित्रांनो, 

आज सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील तरुणांसाठी नवीन क्षेत्रे खुली होत आहेत. या क्षेत्रांमध्ये सरकारने सुरू केलेल्या नव्या मोहिमांमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. तुम्ही पाहिले असेल की या अर्थसंकल्पात 1 कोटी कुटुंबांसाठी छतावरील सौर ऊर्जा  योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आता छतावर सौर पॅनेल लावणाऱ्यांना दुप्पट फायदा होईल. त्यांचे विजेचे बिल शून्य होईल आणि त्यांनी निर्माण केलेली अतिरिक्त वीज देखील उत्पन्न देईल. छतावरील सौर ऊर्जेच्या इतक्या मोठ्या योजनेमुळे देशात रोजगाराच्या लाखो नव्या संधीही निर्माण होतील. कोणी सौर पॅनेलचे काम करेल, कोणी बॅटरीशी संबंधित व्यवसायात जाईल, कोणी वायरिंगचे काम हाताळेल, ही एक योजना अनेक स्तरांवर रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

माझ्या तरुण मित्रांनो, 

आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असलेला देश आहे. देशातील स्टार्ट अप्सची संख्या आता सव्वा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. मला हे पाहून खूप आनंद होत आहे की यापैकी मोठ्या संख्येने असलेले स्टार्ट - अप्स छोट्या म्हणजे अगदी जिल्हा केंद्रदेखील नाहीत अशा स्तर - 2, स्तर - 3 शहरांमध्ये होत आहेत. या स्टार्टअप्समध्ये तरुणांसाठी लाखो नोकऱ्या निर्माण केल्या जात आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात स्टार्ट अप्सना मिळणारी कर सवलत पुढे सुरु ठेवण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. याचा आपल्या तरुणांना खूप मोठा फायदा होईल. अर्थसंकल्पात संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक लाख कोटी रुपयांच्या नव्या निधीची घोषणा करण्यात आली आहे .

मित्रांनो, 

आज या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय रेल्वेमध्येही नियुक्त्या होत आहेत. जेव्हा जेव्हा लोकांना कुटुंबासमवेत लांबच्या प्रवासाला जायचे असते, तेव्हा आजही भारतीय रेल्वे ही सामान्य कुटुंबाची पहिली पसंती असते. भारतीय रेल्वेमध्ये आज मोठे परिवर्तन होत आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रेल्वेचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. तुम्हाला आठवत असेल, 2014 पूर्वी रेल्वेची स्थिती काय होती.  रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण असो किंवा दुपदरीकरण, गाड्यांचे परिचालन सुधारणे असो किंवा प्रवाशांसाठी सुविधा वाढवणे असो, आधीच्या सरकारांनी जेवढे लक्ष द्यायला हवे होते तेवढे दिले नाही. पूर्वीच्या सरकारांची सामान्य भारतीयांच्या समस्यांप्रती उपेक्षेची भावना होती. 2014 नंतर आम्ही रेल्वे प्रवासाचा संपूर्ण अनुभव सुधारण्यासाठी मोहीम सुरू केली. आम्ही रेल्वेच्या आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरणावर लक्ष केंद्रित केले 

यावेळी तुम्ही अर्थसंकल्पातही पाहिले असेल की सरकारने घोषणा केली आहे की वंदे भारत एक्स्प्रेससारखे 40,000 आधुनिक डबे तयार केले जातील आणि सामान्य गाड्यांमध्ये जोडले जातील . यामुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुविधाजनक होईल .

मित्रांनो,

देशात जेव्हा संपर्क व्यवस्थेचा  विस्तार होतो, तेव्हा त्याचा एकाच वेळी अनेक गोष्टींवर परिणाम होतो. सुधारित संपर्क व्यवस्थेमुळे नवीन बाजारपेठा, पर्यटन स्थळांचा विकास होतो. सुधारित संपर्क व्यवस्थेमुळे नवीन व्यवसाय निर्माण होतात आणि त्यामुळे रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. म्हणजेच चांगल्या संपर्क व्यवस्थेचा थेट परिणाम देशाच्या विकासावर होतो. विकासाच्या गती तीव्र करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवली जात आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पायाभूत सुविधांवरील इतक्या मोठ्या खर्चामुळे रस्ते, रेल्वे, विमानतळ, मेट्रो, वीज यासारख्या प्रत्येक प्रकल्पाला गती येईल. यामुळे रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील.

मित्रांनो,

आज ज्यांना नियुक्ती पत्रे मिळाली आहेत त्यापैकी मोठ्या संख्येने तरुण निमलष्करी दलांचा भाग होणार आहेत. तरुणांसाठीही स्वतःचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांत निमलष्करी दलातील भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर 13 भाषांमध्ये लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय या वर्षी जानेवारीपासून लागू झाला आहे. यामुळे लाखो सहभागींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची समान संधी मिळाली आहे. सीमावर्ती जिल्हे आणि उग्रवाद प्रभावित जिल्ह्यांचा कोटाही वाढवण्यात आला आहे.

मित्रांनो,

विकसित भारताच्या प्रवासात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याचे मोठे योगदान असेल. आज आमच्यात सहभागी होणारे एक लाखाहून अधिक कर्मचारी या प्रवासाला नवी ऊर्जा आणि गती देतील. एक लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्याही विभागात असाल, प्रत्येक दिवस राष्ट्र उभारणीसाठी समर्पित करा. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी भारत सरकारने कर्मयोगी भारत पोर्टलही सुरू केले आहे. पोर्टलवर विविध विषयांचे 800 हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वापरकर्ते या पोर्टलशी जोडले गेले आहेत. तुम्ही सर्वजण देखील या पोर्टलचा पूर्ण लाभ घ्या आणि तुमच्या कौशल्यांचा विस्तार करा. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नियुक्ती पत्रे मिळण्याच्या, उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या, तुमच्या कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर देशाला काहीतरी देऊन पुढे जाण्याच्या शुभेच्छा देतो. देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊन स्वतःला प्रोत्साहन द्या. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

 

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005528) Visitor Counter : 56