राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश

Posted On: 25 JAN 2024 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जानेवारी 2024

माझ्या प्रिय नागरिकांनो,

नमस्कार !

75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा ! मागे वळून पाहता, अडचणी आणि संकटे असूनही आपण किती दूरवर प्रवास केला हे पाहून माझे  अंतःकरण अभिमानाने भरून येते . प्रजासत्ताकाचं 75 वे  वर्ष म्हणजे, अनेक अर्थांनी- एखाद्या देशाच्या प्रवासातला खरोखरच एक ऐतिहासिक मैलाचा दगड. विशेषतः हा क्षण साजरा करण्याजोगा आहे, कारण इतक्यातच- म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्षं पूर्ण करताना, स्वातंत्र्याच्या महोत्सवादरम्यान आपण आपल्या देशाचे अनन्यसाधारण श्रेष्ठत्व आणि वैविध्यपूर्ण संस्कृती साजरी केली.

उद्याच्या दिवशी आपण संविधानाचा प्रारंभ साजरा करतो. "आम्ही, भारताचे लोक" या शब्दांनी सुरु होणारी त्याची उद्देशिका, या दस्तऐवजाच्या 'लोकशाही' या मध्यवर्ती संकल्पनेवर प्रकाश टाकते. लोकशाहीच्या पाश्चिमात्य संकल्पनेपेक्षा पुष्कळ जुनी लोकशाही प्रणाली भारतात आहे. त्यामुळेच भारताला 'लोकशाहीची जननी' असे  म्हटले  जाते .

प्रदीर्घ आणि अत्यंत अवघड अशा संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत परकीय राजवटीतून मुक्त झाला. तथापि, देशावर शासन करण्यासाठीची तसेच देशाचे खरे सामर्थ्य बंधमुक्त करण्यासाठीची- तत्वे आणि प्रक्रिया यांची रचना करण्याचे  कार्य तेव्हाही प्रगतीपथावर होते . शासनाच्या सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यासाठी घटना समितीने जवळपास तीन वर्षांचा काळ व्यतीत केला आणि आपल्या राष्ट्राच्या महान पायाभूत दस्तऐवजाची- म्हणजेच 'भारताच्या संविधानाची' निर्मिती केली. आपल्या वैभवशाली आणि स्फूर्तिदायी अशा संविधानाची रचना करण्याच्या कामी योगदान देणाऱ्या दूरदर्शी नेत्यांचं आणि अधिकाऱ्यांचंही कृतज्ञ स्मरण आज राष्ट्र करत आहे.

स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे नेणाऱ्या अमृतकाळाच्या प्रारंभिक वर्षांत आज देश उभा आहे. हा युगांतरकारी परिवर्तनाचा काळ आहे. देशाला नवनव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी आपल्याला देण्यात आली आहे. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी, संविधानात सांगून ठेवलेल्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करण्याचे आवाहन मी माझ्या देशबांधवांना करेन. ही कर्तव्यं म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीपूर्तीपर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकावरच्या अत्यावश्यक जबाबदाऱ्या आहेत. इथे माझ्या मनात महात्मा गांधी यांचा विचार येतो- त्यांनी किती योग्य म्हणून ठेवले आहे  - "केवळ अधिकारांचा विचार करणारा कोणताच समुदाय विकसित झाला नाही. केवळ त्याच समुदायाचा उद्धार झाला, ज्यांनी कर्तव्यांचा विचार केला."

माझ्या प्रिय नागरिकांनो,

प्रजासत्ताक दिवस म्हणजे आपल्या मुलभूत मूल्यांचे  आणि तत्त्वांचे  स्मरण करण्याचा प्रसंग. जेव्हा आपण त्यापैकी कोणत्याही एका तत्त्वाचं चिंतन करतो, तेव्हा आपोआपच तत्त्वांची दिशाही आपल्याला मिळते. संस्कृती, श्रद्धा आणि रीतीरिवाजांची विविधता आपल्या लोकशाहीतून ध्वनित होते. विविधता साजरी करण्यातून समता ध्वनित होते, आणि त्या समतेला न्यायाचा आधार असतो. हे सर्व शक्य होतं ते स्वातंत्र्यामुळे. या सर्व मूल्यांची आणि तत्त्वांची समग्रता  हीच आपल्या भारतीयत्वाचा पाया आहे. डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या परिपक्व विचारांनी मार्गदर्शित, या पायाभूत मूल्यांनी आणि तत्त्वांनी प्रेरित अशा संविधानाच्या गर्भितार्थाने, आपल्याला सर्व प्रकारच्या भेदभावांना समाप्त करण्यासाठी सामाजिक न्यायाच्या मार्गावर सातत्याने मार्गस्थ ठेवले आहे.

मला इथे उल्लेख करावासा वाटतो, तो असा की- सामाजिक न्यायाचे अथक पुरस्कर्ते आदरणीय श्री कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा काल समारोप झाला. कर्पूरीजी हे मागासवर्गीयांच्या सर्वात महान समर्थकांपैकी एक होते आणि त्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले . त्यांचे  आयुष्य हा एक संदेश होता. आपल्या योगदानाने सामाजिक जीवन समृद्ध करण्याबद्दल मी, कर्पूरीजी यांना आदरांजली अर्पण करते.

आपल्या प्रजासत्ताकाने जतन केलेल्या मूल्यांनी, आपणा १४० कोटी भारतीयांना एक कुटुंब म्हणून जगण्यासाठी एकत्र आणले  आहे. जगातल्या या सर्वात मोठ्या कुटुंबासाठी सह-अस्तित्व ही भूगोलाने लादलेली गोष्ट नाही, तर तो सामूहिक उल्हासाचा स्रोत आहे आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातून तोच प्रकट होतो.

याच आठवड्याच्या सुरुवातीला आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानी बांधलेल्या नवीन भव्य मंदिरात स्थापित मूर्तीच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार झालो. या घटनेकडे व्यापक दृष्टीने पाहता, आपल्या सांस्कृतिक वारशाचा सातत्यपूर्ण पुनर्शोध घेण्याच्या भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा म्हणून भावी इतिहासकार या प्रसंगाकडे बघतील. उचित न्यायप्रक्रिया पार पाडून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या मंदिराची निर्मिती सुरु झाली. आता केवळ जनतेच्या श्रद्धेची अभिव्यक्ती म्हणून नव्हे, तर लोकांच्या न्यायप्रक्रियेवरच्या प्रचंड विश्वासाचं द्योतक म्हणून आता ही भव्य वास्तू उभी राहिली आहे.

प्रिय माझ्या नागरिकांनो,

आपले राष्ट्रीय उत्सव म्हणजे आपण एकाचवेळी इतिहासावर नजर टाकण्याचे आणि भविष्याचा वेध घेण्याचे महत्त्वपूर्ण प्रसंग असतात. गेल्या प्रजासत्ताक दिनापासूनच्या वर्षभराचा विचार करता, खूप प्रसन्न वाटते.भारताच्या अध्यक्षतेखाली राजधानीमध्ये ग्रुप ऑफ ट्वेन्टी शिखर परिषदेचे  यशस्वी आयोजन, हे एक अभूतपूर्व यश होते . जी-ट्वेन्टीच्या कार्यक्रमांमध्ये लोकांचा सहभाग ही यातली लक्षणीय गोष्ट. कल्पना आणि सूचनांचा प्रवास सर्वोच्च पदाकडून म्हणजे वरून खाली अशा पद्धतीने न होता, तळाकडून वरच्या दिशेने झाला. ज्या धोरणात्मक आणि मुत्सद्देगिरीविषयक बाबी शेवटी नागरिकांचं भवितव्य घडवणार असतात, अशा बाबींमध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचा आदर्श वस्तुपाठच या भव्य समारंभाने सर्वांसाठी घालून दिला. ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देशांचा आवाज म्हणून भारताच्या उदयाला जी-ट्वेन्टी शिखर परिषदेने चालना दिली. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चर्चेमध्ये एका महत्त्वाच्या घटकाची भर घातली.

संसदेने ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक पारित केल्यावर, स्त्री-पुरुष समानतेच्या आदर्शाच्या दिशेने आपण आणखी प्रगती केली. नारी शक्ती वंदन अधिनियम हे स्त्री-सक्षमीकरणाचं क्रांतिकारी साधन ठरेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या शासनप्रक्रिया सुधारण्याबाबतीतही ते अधिक उपयुक्त ठरेल. सामूहिक महत्त्वाच्या विषयांमध्ये जेव्हा स्त्रियांना सामील करून घेण्याचं प्रमाण वाढेल, तेव्हा बहुजनांच्या गरजांशी आपल्या प्रशासकीय प्राधान्यक्रमांचा ताळमेळ बसेल.

भारत चंद्रावर पोहोचला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला, तोही याचवर्षी. चांद्रयान-3 नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सौरमोहीमही उघडली. नुकतेच, आदित्य L1 ला हेलो कक्षेमध्ये यशस्वीपणे स्थापित करण्यात आले . एक्स्पोसॅट या आपल्या पहिल्या एक्स रे पोलॅरिमीटर उपग्रहाच्या प्रक्षेपणानं आपल्या वर्षाची सुरुवात झाली आहे. हा उपग्रह कृष्णविवरासारख्या अवकाशीय रहस्यांचा शोध घेणार आहे. या वर्षभरात म्हणजे २०२४ मध्ये आणखी अनेक अवकाश मोहिमा काढण्याचं नियोजन आहे. भारताच्या अंतराळ प्रवासात नवे मैलाचे दगड पार होणार आहेत हे सांगताना मला आनंद होत आहे. आपला पहिला मानवासहित अंतराळ उड्डाण कार्यक्रम- म्हणजे गगनयान मोहिमेची तयारीही सुरळीत सुरु आहे. आपल्या शास्त्रज्ञांचा आणि तंत्रज्ञांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटत आला आहे, पण आता ते पूर्वीपेक्षा खूपच उत्तुंग ध्येयं डोळ्यासमोर ठेवत आहेत आणि तशी कामगिरीही करत आहेत. अखिल मानवतेच्या हितासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेचा विस्तार करण्याच्या आणि तिला अधिक सखोल करण्याच्या उद्देशाने भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरु आहे. इस्रोच्या उपक्रमांसाठी देशात दिसून येणारा उत्साह खरोखरच उमेद वाढवणारा आहे. या क्षेत्रातल्या नव्या यशामुळे तरुण पिढीच्या कल्पकतेला खतपाणी मिळाले आहे. मला खात्री आहे, की आता अधिकाधिक मुलांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांच्यात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन वाढीस लागेल. यातून अधिक युवावर्गालाही- विशेषतः तरुणींना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची स्फूर्ती मिळेल.

माझ्या प्रिय नागरिकांनो,

भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हा आत्मविश्वास जोमदार अर्थव्यवस्थेमुळे आला असून, अर्थव्यवस्थेवरही त्याचे  प्रतिबिंब पडल्याचे  दिसत आहे. नजीकच्या काळात, मोठाल्या अर्थव्यवस्थांमध्ये आपला जीडीपी वृद्धिदर सर्वोच्च राहिला आहे. तसेच, ही असामान्य कामगिरी 2024 मध्ये आणि त्यानंतरही अशीच सुरु राहील याची खात्री वाटावी अशी परिस्थिती निश्चितपणे आहे. यात मला विशेषत्वाने लक्षणीय वाटणारी गोष्ट अशी की- दूरदृष्टी असणारे  जे नियोजन अर्थव्यवस्थेला गती देत आहे, तेच सर्वार्थाने सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी कल्याणकारी योजनांनाही चालना देत आहे. महामारीच्या काळात समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य अन्नधान्य पुरवण्याच्या योजनांची व्याप्ती सरकारने वाढवली होती. दुर्बल घटकांना त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं सरकारने पुढेही या उपाययोजना सुरूच ठेवल्या. त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून सरकारने 81 कोटी लोकांना पाच वर्षांसाठी विनामूल्य अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कदाचित इतिहासातला अशा प्रकारचा सर्वात मोठा कल्याणकारी कार्यक्रम असेल.

याशिवाय, सर्व नागरिकांची जीवन-सुलभता उंचावण्यासाठी मिशन मोडवर अनेक योजना सुरु आहेत. घरी सुरक्षित आणि पुरेसे पेयजल उपलब्ध असण्यापासून, स्वतःच्या घराची ऊब मिळण्यापर्यंत- या साऱ्या किमान मूलभूत गरजा आहेत, हे काही विशेषाधिकार नव्हेत. या बाबी कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक तत्वज्ञानापलीकडच्या असून त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितले  पाहिजे. सरकारने कल्याणकारी योजनांचा केवळ विस्तार आणि संख्या वाढवली नसून 'कल्याण' या संकल्पनेचीच व्याख्या पुन्हा नव्याने केली आहे. बेघर लोकांचं प्रमाण तुरळक असणाऱ्या मोजक्या देशांच्या पंगतीत भारत जाऊन बसेल तेव्हा तो आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत अभिमानाचा क्षण असेल. त्याचप्रमाणे, डिजिटल विषमता दूर करून, वंचित विद्यार्थ्यांना हितकर ठरेल अशी सर्वांसाठी समान शैक्षणिक रचना निर्माण करायला राष्ट्रीय शिक्षण धोरण उचित प्राधान्य देत आहे. आयुष्मान भारत योजनेचं विस्तारत जाणारे  विमा संरक्षण, सर्व लाभार्थ्यांना त्या छत्रछायेखाली आणण्याच्या उद्दिष्टाने काम करते  आणि गरिबांना तसेच वंचित घटकांना मोठा दिलासा मिळवून देते.

आपल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची मान उंचावली आहे. गेल्यावर्षी झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये आपण विक्रमी 107 पदके  जिंकून इतिहास घडवला. आणि दिव्यांगांसाठीच्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये आपण 111 पदकांवर नाव कोरले. आपल्या पदकतालिकांमध्ये महिलांचे  प्रभावशाली योगदान अतिशय आनंददायी आहे. आपल्या आघाडीच्या खेळाडूंनी लहान मुलांना विविध क्रीडाप्रकारांकडे वळण्याची स्फूर्ती दिली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. नव्या आत्मविश्वासाने भारलेले आपले खेळाडू, आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आणखी चमकदार कामगिरी करून दाखवतील, याची मला खात्री आहे.

प्रिय माझ्या नागरिकांनो,

नजीकच्या काळात जगभरात अनेक संघर्ष उद्भवले आणि जगाच्या अनेक भागांना हिंसाचाराची झळ बसली. जेव्हा संघर्ष करणाऱ्या दोन्ही पक्षांना 'आपली बाजू बरोबर आणि दुसऱ्याची चूक' वाटते, तेव्हा तर्कशुद्ध आणि न्यायसंगत पद्धतीने मार्ग शोधला पाहिजे. दुर्दैवाने, तर्काची जागा भय आणि पूर्वग्रहाने घेतल्यामुळे भावनातिरेक होऊन हिंसाचाराचं सत्र सुरु झाले. माणसांना दुःख आणि हालअपेष्टा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागल्या आणि माणसांची ही पीडा बघून आपण व्यथित झालो आहोत. अशा वेळी आपण भगवान बुद्धांच्या शब्दांचं स्मरण करुया -

न हि वेरेन वेरानि, सम्मन्तीध कुदाचनम्
अवेरेन च सम्मन्ति, एस धम्मो सनन्तनो

म्हणजे -: "वैरभाव कदापि वैरभावाने शांत होत नाही. तर, शत्रुत्व न करण्यानेच तो शांत होतो. हाच चिरंतन शाश्वत नियम आहे."

वर्धमान महावीर आणि सम्राट अशोक यांच्यापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापर्यंत, भारताने वेळोवेळी आणि पुनःपुन्हा हे दाखवून दिले आहे की, अहिंसा हा केवळ आचरण्यास अवघड असा आदर्श नाही, तर ती एक सुस्पष्ट शक्यता आहे- इतकेच नाही तर अनेकांचे   ते जिवंत वास्तव आहे. संघर्षग्रस्त प्रदेशांना ते संघर्ष सोडवण्यासाठी आणि शांतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी मार्ग मिळेल, अशी आशा करूया.

जागतिक पर्यावरण संकटातून मार्ग काढण्यासाठीही भारताचे  प्राचीन ज्ञान जगाला साहाय्यभूत ठरू शकते . नवीकरणक्षम ऊर्जास्रोतांना चालना देण्याबाबत भारत आघाडीवर आहे आणि हवामानबदलविरोधात कृती करण्याच्या बाबतीत जगाचे  नेतृत्व करत आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे. पर्यावरणाचं भान राखणाऱ्या जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी भारताने 'लाईफ चळवळ' सुरु केली आहे. हवामानबदलाच्या समस्यांशी दोन हात करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर आचरणात बदल घडवून आणण्यावर आपला देश भर देतो, याचं जागतिक समुदायाने कौतुक केले  आहे. आपल्या जीवनशैलीच्या तारा सृष्टिमातेशी जुळवून आणण्यासाठी सगळीकडचे लोक योगदान देऊ शकतात, आणि त्यांनी ते दिलंच पाहिजे. यामुळे भावी पिढ्यांसाठी आपली पृथ्वी सांभाळून तर ठेवता येईलच, शिवाय जीवनाची गुणवत्ताही उंचावेल.

माझ्या प्रिय नागरिकांनो,

देशाच्या स्वातंत्र्याचे शतक म्हणजे अमृतकाळ हा तंत्रज्ञानात अभूतपूर्व बदल घडून येण्याचा काळ असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अशी तंत्रज्ञानातील प्रगती ठळक बातम्यांमधून आपल्या दैनंदिन जीवनापर्यंत येऊन ठेपली आहे- तीही आश्चर्यकारक वेगाने ! येत्या काळात अनेक क्षेत्रात चिंतेचे विषय असले तरी, पुढे उत्साहवर्धक संधीही आहेत- विशेषतः तरुणाईसाठी. युवावर्ग नवनव्या सीमांचा धांडोळा घेत आहे. त्यांच्या रस्त्यातले अडथळे दूर करण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, आणि त्यांच्या संपूर्ण सामर्थ्याला बंधमुक्त करू दिले  पाहिजे. त्यांना संधीची समानता हवी आहे. त्यांना समानतेचेजुने शाब्दिक डोलारे नको आहेत, तर समानतेच्या आपल्या अमूल्य आदर्शाची वास्तविक प्रचीती त्यांना हवी आहे.

अखेरीस, त्यांचाच तर आत्मविश्वास उद्याच्या भारताची उभारणी करतो आहे. त्याहीपुढे जाऊन, तरुणाईच्या मनांना आकार देतात ते शिक्षक- त्यामुळे ते राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार. शांतपणे परिश्रम करत राहून देशासाठी अधिक चांगले  भविष्य निर्माण करण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि श्रमिकांचाही कृतज्ञ उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छिते. या शुभ प्रसंगाच्या पूर्वसंध्येला, आपल्या सशस्त्र दलांच्या, पोलीस दलांच्या आणि निमलष्करी दलांच्या सर्व सदस्यांना भारत कृतज्ञ वंदन करत आहे. त्यांच्या पराक्रमाविना आणि दक्षतेविना आपण आजच्याइतक्या यशाच्या भराऱ्या घेऊ शकलो नसतो.

समारोप करण्यापूर्वी, न्यायपालिका आणि नागरी सेवांच्या सदस्यांना मला शुभेच्छा द्यायच्या आहेत. परदेशातील भारतीय मिशन्सना आणि अनिवासी भारतीयांच्या समुदायालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्याकडून शुभेच्छा ! चला, आपण सारे देशाच्या आणि देशबांधवांच्या सेवेसाठी स्वतःला सर्वथा समर्पित करूया. या प्रयत्नांसाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा !

धन्यवाद.

जय हिंद !

जय भारत !

* * *

Jaydevi PS//D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1999693) Visitor Counter : 269