गृह मंत्रालय

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार-2024


सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार-2024 साठी संस्थात्मक श्रेणीमध्ये 60 पॅराशूट फील्ड रुग्णालय, उत्तर प्रदेशची निवड करण्यात आली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या अमूल्य योगदानाची आणि निःस्वार्थ सेवेची दखल घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी "सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार" हा वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे

Posted On: 23 JAN 2024 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2024

 

2024 या वर्षासाठी, आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी संस्थात्मक श्रेणीतून उत्तर प्रदेशातील 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटलची निवड झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भारतातील व्यक्ती आणि संस्थांनी केलेल्या अमूल्य योगदानाची आणि निःस्वार्थ सेवेची दखल घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी "सुभाष चंद्र बोस  आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार" हा वार्षिक पुरस्कार सुरू केला आहे. दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला म्हणजेच  23 जानेवारीला हा पुरस्कार जाहीर केला जातो. संस्थेसाठी 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र तर व्यक्तीसाठी  5 लाख रुपये रोख आणि  प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशाने आपत्ती व्यवस्थापन पद्धती, सज्जता, आपत्तीशमन आणि प्रतिसाद यंत्रणेत लक्षणीय सुधारणा केली आहे ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींदरम्यान होणार्‍या जीवितहानीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री  आपत्ती सज्जतेचा सातत्याने आढावा घेतात आणि समुदायाचे प्रशिक्षण आणि जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी संबंधितांकडून सर्वोत्तम पद्धती अवलंबण्यावर भर देतात.

2024 या वर्षासाठी या पुरस्कारासाठी 1जुलै, 2023 पासून नामांकने मागवण्यात आली होती. 2024 च्या पुरस्कार योजनेला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. पुरस्कार योजनेला प्रतिसाद रूपाने संस्था आणि व्यक्तींकडून 245  वैध नामांकन प्राप्त झाली.

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील 2024 पुरस्कार विजेत्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सारांश खालीलप्रमाणे :

60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल, उत्तर प्रदेशची स्थापना 1942 मध्ये झाली. भारतीय सशस्त्र दलाची ही एकमेव हवाई वैद्यकीय आस्थापना आहे. विविध जागतिक संकटांमध्ये त्याच्या अपवादात्मक सेवेसाठी हे ओळखले जाते. यांच्या प्राथमिक मोहिमांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, शांतता आणि युद्ध दोन्हीमध्ये तसेच  नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) ऑपरेशन्सचा समावेश आहे. या युनिटने उत्तराखंड मध्ये 2013 मध्ये आलेल्या प्रलयात त्याचप्रमाणे नेपाळ मध्ये 2015 मध्ये आलेल्या भूकंपात ऑपरेशन  ‘मैत्री’ या नावाने आणि इंडोनेशियातील 2018च्या त्सुनामीच्या संकटात ऑपरेशन समुद्र मैत्री या नावाने  वैद्यकीय मदत दिली होती. अलीकडेच, फेब्रुवारी 2023 मध्ये तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपाच्या नैसर्गिक संकटात या युनिटने अत्यंत वेगाने 99 सदस्यांचे पथक तयार केले  आणि संसाधनांची कमतरता आणि भाषेतील अडथळ्यांवर मात करून तुर्कीमध्ये हटे प्रांताच्या शाळेच्या इमारतीत 30 खाटांचे हॉस्पिटल उभारून भारताची अग्रणी द्वितीय स्तरीय  वैद्यकीय सुविधा स्थापन केली. युनिटने बचाव, आपत्ती दरम्यान जखमींच्या उपचारासाठी प्राधान्यक्रम ठरवणे (ट्रायएज), शस्त्रक्रिया, दंत उपचार, एक्स रे आणि प्रयोगशाळेच्या सुविधांसह वैद्यकीय सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान केली आणि ‘ऑपरेशन दोस्त’चा एक भाग म्हणून 12 दिवसांच्या कालावधीत 3600 रूग्णांची काळजी घेतली.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1998798) Visitor Counter : 346