पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित


“मढडा धाम हे चारण समुदायासाठी श्रद्धा, शक्ती, संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे”

“श्री सोनल मातेची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपस्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी वलय निर्माण केले ज्याचा आजही अनुभव येतो”

“सोनल माँ यांचे संपूर्ण जीवन सार्वजनिक कल्याणासाठी, देशाच्या आणि धर्माच्या सेवेसाठी समर्पित होते”

“देशभक्तीपर गीते असोत वा आध्यात्मिक शिकवण असो, चारण साहित्याने यामध्ये शतकानुशतके महत्त्वाची भूमिका बजावली आहे”

“ज्यांनी सोनल मातेकडून रामायणाची कथा ऐकली आहे, ते ती कधीही विसरू शकणार नाहीत”

Posted On: 13 JAN 2024 12:08PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोनल माता जन्मशताब्दी सोहळ्याला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की आई श्री सोनल माता यांचा जन्मशताब्दी सोहळा पौषच्या पवित्र महिन्यात होत आहे आणि या पवित्र सोहळ्यासोबत जोडले जाणे हा एक विशेष बहुमान आहे. यावेळी पंतप्रधानांनी सोनल मातेच्या आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण चारण समाज आणि सर्व प्रशासकांचे या प्रसंगी अभिनंदन केले आणि सांगितले, “मढडा धाम हे  चारण समुदायासाठी श्रद्धा , शक्ती ,संस्कार  आणि परंपरांचे केंद्र आहे. मी श्री आईंच्या पायावर नतमस्तक होतो आणि अभिवादन करतो ”.

तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी  व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे  भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात  उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, "सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.

पंतप्रधान म्हणाले, “सोनल माँ यांचे संपूर्ण जीवन सार्वजनिक कल्याणासाठी, देशाच्या आणि धर्माच्या सेवेसाठी समर्पित होते ज्या ठिकाणी त्यांनी भगत बापू, विनोबा भावे, रवीशंकर महाराज, कनभाई लहेरी, कल्याण शेठ यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्वांसोबत कार्य केले.चारण समुदायामधील विद्वानांमध्ये त्यांचे एक विशेष स्थान होते आणि त्यांनी अनेक युवांना योग्य दिशा दाखवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवले, यावर पंतप्रधानांनी भर दिला. समाजाविषयी त्यांनी दिलेले योगदान अधोरेखित करताना पंतप्रधानांनी समाजाच्या शिक्षणाच्या संदर्भात आणि व्यसनमुक्तीसाठी सोनल माता यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. अनिष्ट चालीरितींपासून समाजाचे रक्षण  करण्यासाठी सोनल माता यांनी काम केले आणि कच्छमधील व्होवार गावापासून एक विशाल संकल्प अभियान सुरू केले ज्याने कठोर परिश्रम आणि पशुधनाचे रक्षण करून स्वयंपूर्ण बनण्यावर भर दिला होता. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबरोबरच सोनल माँ या देशाच्या एकता आणि अखंडतेच्या एक भक्कम पालक देखील होत्या आणि फाळणीच्या वेळी जुनागढ संस्थान वेगळे करण्यासाठी सुरू असलेल्या कारस्थानाविरोधात, माँ चंडीप्रमाणेच त्या उभ्या राहिल्या, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

श्री सोनल माँ या चारण समुदायाच्या, देशासाठीच्या योगदानाचे एक मोठे प्रतीक आहेत ", पंतप्रधान म्हणाले, या समाजाला भारताच्या धर्मग्रंथांमध्येही विशेष स्थान आणि आदर देण्यात आला आहे. भागवत पुराणासारख्या पवित्र ग्रंथांमध्ये चारण समुदायाचा श्री हरीचे थेट वंशज म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सरस्वती मातेनेही या समाजाला विशेष आशीर्वाद दिले आहेत.

पूज्य ठारण बापू, पूज्य इसर दास जी, पिंगळशी बापू, पूज्य काग बापू, मेरुभा बापू, शंकरदान बापू, शंभूदान जी, भजनिक नारणस्वामी, हेमुभाई गढवी, पद्मश्री कवी दाद आणि पद्मश्री भिखुदान गढवी आणि इतर  अनेक व्यक्तिमत्त्वे, ज्यांचा जन्म या समाजात झाला, त्यांनी चारण समाजाला समृद्ध केले आहे, असे त्यांच्या नावांचा विशेष उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले. विशाल चारण साहित्य आजही या महान परंपरेचा पुरावा आहे. देशभक्तीपर गीते असोत वा अध्यात्मिक प्रवचन असो, चारण साहित्याने शतकानुशतके महत्त्वाची भूमिका बजावली असून,श्री सोनल माँ यांचे जोषपूर्ण भाषण,हे याचे उत्तम उदाहरण आहे, असा त्या भाषणाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले. जरी त्यांनी औपचारिक पद्धतीने शिक्षण घेतले नसले तरी संस्कृतसारख्या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यांना धर्मशास्त्रांचे सखोल ज्ञान होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले."ज्यांनी त्यांच्याकडून रामायणाची कथा ऐकली आहे ते ती कधीच विसरू शकत नाहीत", असे  पंतप्रधान म्हणाले. 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची माहिती मिळाली असती तर सोनल मातेच्या आनंदाला पारावार उरला नसता, असे सांगून  पंतप्रधानांनी 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांना श्रीराम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. कालपासून सुरू झालेल्या देशातील मंदिरांच्या स्वच्छता मोहिमांचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला आणि ते म्हणाले, “या दिशेनेही आपल्याला एकत्र काम करायचे आहे. मला खात्री आहे की अशा प्रयत्नांनी श्री सोनल माँचा आनंद द्विगुणित होईल.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, श्री सोनल माँ यांच्या प्रेरणेने भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून कार्य करण्यासाठी आम्हाला नवी ऊर्जा मिळते. ही उद्दिष्टे साध्य करण्यात चारण समाजाची असलेल्या भूमिकेविषयी माहिती देखील त्यांनी दिली. सोनल माँ यांनी दिलेल्या 51 आज्ञा चारण समाजासाठी दिशादर्शक आहेत”, असे सांगत पंतप्रधानांनी चारण समुदायाला समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कार्य करत राहण्याचे आवाहन केले. सामाजिक एकोपा बळकट करण्यासाठी  मधडा धाममध्ये सुरू असलेल्या सदाव्रताच्या यज्ञाचे त्यांनी कौतुक केले आणि मधडा धाम भविष्यातही राष्ट्रनिर्मितीच्या अशा असंख्य अनुष्ठानाना चालना देत राहील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

***

N.Chitale/S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1995853) Visitor Counter : 97