पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित


“या वर्षातील पहिलेच सार्वजनिक संबोधन भारताच्या युवा वर्गाशी करताना आनंद होतो आहे”

“भारतीदासन विद्यापीठ अत्यंत मजबूत आणि परिपक्व पायावर उभारलेले आहे”

“कोणत्याही देशाला विशिष्ट दिशा देण्यात विद्यापीठे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात”

“आपला देश आणि त्यातील नागरी संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे”

“आतापासून 2047पर्यंतची वर्षे आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची वर्षे बनवण्यासाठी देशातील युवा वर्गामध्ये असलेल्या क्षमतेवर मला विश्वास आहे”

“युवा म्हणजे उर्जा. युवा म्हणजे वेग, कौशल्य आणि मोठ्या प्रमाणासह काम करण्याची क्षमता”

“प्रत्येक जगातील उपाययोजनेचा भाग म्हणून भारताचे स्वागत होत आहे”

“अनेक प्रकारे, स्थानिक आणि जागतिक घटकांमुळे, सध्याचा काळ भारतातील तरुणांचा सर्वोत्तम काळ आहे”

Posted On: 02 JAN 2024 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देखील प्रदान केले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सांगितले की भारतीदासन विद्यापीठाचा 38 वा पदवीदान समारंभ त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे कारण 2024 या नववर्षातील त्यांचा हा पहिलाच सार्वजनिक संवाद आहे. तामिळनाडूसारख्या देखण्या राज्यात आणि युवकांमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आनंद वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. याप्रसंगी, पदवीप्राप्त विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन भारतीदासन विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणारे पहिलेच पंतप्रधान ठरल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की विद्यापीठाची निर्मिती ही सामान्यतः कायदेशीर प्रक्रिया असते आणि कालांतराने नवी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होत जातात आणि त्यातून विद्यापीठाचा विस्तार होत जातो. भारतीदासन विद्यापीठाची निर्मिती मात्र वेगळ्या पद्धतीने झाली आहे कारण हे विद्यापीठ निर्माण करण्यासाठी तसेच या प्रक्रियेतून मजबूत आणि परिपक्व पाया निर्माण करण्यासाठी अनेक कार्यरत सुप्रसिध्द महाविद्यालयांना एकत्र आणण्यात आले आणि त्यायोगे हे विद्यापीठ अनेक क्षेत्रांमध्ये प्रभावी ठरेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले.

नालंदा आणि तक्षिला या प्राचीन विद्यापीठांच्या कार्यावर अधिक प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले, “आपला देश आणि त्यातील नागरी संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे.” जगभरातील विद्यार्थ्यांनी वारंवार भेट दिलेल्या कांचीपुरम, गंगाईकोंडा, चोलापुरम आणि मदुराई यथील महान विद्यापीठांचा देखील त्यांनी उल्लेख केला.

पदवीदानाची संकल्पना प्राचीन असल्याचे भाष्य करून, ज्या ठिकाणी कवी आणि विद्वानांनी त्यांच्या कविता तसेच इतर साहित्य विश्लेषणासाठी प्रस्तुत केले आणि नंतर त्या साहित्य कृतींना समाजाच्या अधिक मोठ्या वर्गाकडून मान्यता मिळाली त्या तमिळ संगमम चे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. हेच तत्व आज देखील शैक्षणिक क्षेत्र आणि उच्च शिक्षणासाठी वापरले जात आहे असे ते म्हणाले. “आपले तरुण विद्यार्थी ज्ञानाच्या त्या महान ऐतिहासिक परंपरेचा भाग आहेत,” पंतप्रधान पुढे म्हणाले.

कोणत्याही देशाला दिशा दाखवण्याच्या बाबतीत विद्यापीठांच्या भूमिकेवर अधिक प्रकाश टाकत, उर्जेने भारलेल्या विद्यापीठांमुळे देश आणि नागरी संस्कृती कशी चैतन्यमय होते याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. देशावर जेव्हा परकीयांनी हल्ला केला तेव्हा देशाच्या ज्ञान व्यवस्थेला लक्ष्य करण्यात आले याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. महात्मा गांधी, पंडित मदन मोहन मालवीय आणि सर अन्नामलाई चेट्टीयार यांचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी ही बाब अधोरेखित केली की, या नेत्यांनी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला विद्यापीठे सुरु केली आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान ही विद्यापीठे ज्ञान आणि राष्ट्रवादाची केंद्रे झाली. तसेच, भारतातील विद्यापीठांचा उदय हा भारताच्या उदयासाठी कारणीभूत घटकांपैकी एक घटक आहे असे ते म्हणाले. आर्थिक विकास क्षेत्रात भारत नवे विक्रम स्थापित करत आहे, जगातील पाचव्या क्रमांकाची प्रमुख वेगवान अर्थव्यवस्था म्हणून प्रगती करत आहे आणि भारतीय विद्यापीठे जागतिक क्रमवारीत विक्रमी संख्येने ठसा उमटवत आहेत या गोष्टींचा देखील पंतप्रधानांनी बोलताना उल्लेख केला.

शिक्षणाचा उद्देश आणि समाज प्रतिभावंतांकडे कोणत्या दृष्टीने बघतो याबाबत खोलवर विचार करण्याचे आवाहन त्यांनी तरुण प्रतिभावंतांना केले. शिक्षण आपल्याला संपूर्ण अस्तित्वासह कशा प्रकारे एकतानतेने जगण्यास शिकवते यासंदर्भातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वचन पंतप्रधानांनी याप्रसंगी उधृत केले. विद्यार्थ्यांना आजचा दिवस दाखवण्यात संपूर्ण समाजाने भूमिका निभावली आहे असे सांगून त्यांनी समाजाची परतफेड करण्यावर आणि अधिक उत्तम समाज आणि देश निर्माण करण्यावर अधिक भर दिला. “एका प्रकारे, येथे उपस्थित प्रत्येक पदवीधर 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करण्यात योगदान देऊ शकतो,” पंतप्रधान मोदी म्हणाले.

2047 पर्यंतची वर्षे राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची वर्षे म्हणून ओळखली जावीत, यासाठी तरुणांच्या क्षमतेवर आपला विश्वास आहे याचा पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पुनरुच्चार केला. - ‘आपण एक धैर्यशाली नवीन जग तयार करूया’,- या विद्यापीठाच्या ब्रीदवाक्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले, की भारतीय तरुण याआधीपासूनच असे विश्व निर्माण करत आहेत. कोविड महामारीच्या काळात लस तयार करणे, चांद्रयान तसेच पेटंटची संख्या 2014 सालापासूनच्या 4000 वरून आता जवळपास 50,000 पर्यंत वाढली असून या सर्वांत तरुण भारतीयांचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी कधीही न सांगितला गेलेला भारताचा इतिहास भारतातील संबंधित विषयातील तज्ञ दाखवून देत आहेत, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. "तुम्ही अशा जगात प्रवेश करत आहात जेव्हा प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकजण तुमच्याकडे नवीन आशेने पाहत आहे", असेही त्यांनी सांगितले. खेळाडू, संगीतकार, कलाकार यांच्या कर्तृत्वावरही त्यांनी प्रकाश टाकला.

“तरुणाई म्हणजे ऊर्जा; याचा अर्थ वेग, कौशल्य आणि श्रेणीसह काम करण्याची क्षमता हा आहे”,असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की,सरकार गेल्या काही वर्षांत अशा विद्यार्थ्यांच्या समान गती आणि श्रेणीसह जुळवून घेण्याचे काम करत आहे‌.

गेल्या दहा वर्षांत, देशातील विमानतळांची संख्या 74 वरून 150 पर्यंत जवळपास  दुप्पट झाली आहे, सर्व प्रमुख बंदरांतील मालवाहतूक क्षमता दुप्पट झाली आहे, महामार्गांच्या बांधकामाचा वेग आणि प्रमाण दुप्पट झाले आहे आणि स्टार्टअप्सची संख्या 2014 मधील 100 इतक्या अल्पसंख्येवरून जवळपास 1 लाख पर्यंत वाढली असल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारताने महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसोबत अनेक व्यापारी करार केले आहेत, ज्यामुळे भारतातील वस्तू आणि सेवांसाठी नवीन बाजारपेठ खुली होईल, तसेच तरुणांसाठी अगणित संधी निर्माण होतील याबद्दलही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. G20 सारख्या संस्थांना बळकटी देणे, हवामान बदलाशी लढा देणे आणि जागतिक पुरवठा साखळीत मोठी भूमिका बजावणे, यासारख्या प्रत्येक गोष्टीसाठी जग भारताकडे आदर्श उपाय म्हणून पहात असून भारताचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले. “स्थानिक आणि जागतिक घटकांमुळे भारत हा विविध प्रकारे तरुण आहे”, असे मोदी म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना या कालावधीचा जास्तीत जास्त उपयोग करून देशाला नवीन उंचीवर नेण्याचे आवाहन केले.

विद्यापीठातील तुमचा प्रवास आज पूर्ण झाला असला, तरी शिक्षणाच्या प्रवासाला अंत नाही, असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले, की “जीवन आता तुमचे गुरू बनेल”. त्यांनी अधोरेखित केले की सतत नवनवीन प्रयोग करत शिकणे, कौशल्याच्या कक्षा रूंदावणे, त्यांचा स्तर वाढवत जात सक्रियपणे काम करणे महत्त्वाचे आहे. “झपाट्याने बदलणार्‍या जगात, एकतर तुम्ही बदल घडवून आणता किंवा बदल तुम्हाला घडवत असतो”, असे आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी युवावर्गाला सांगितले. 

यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आणि भारतीदासन विद्यापीठाचे कुलपती श्री आर एन रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री श्री एम के स्टॅलिन, कुलगुरू डॉ एम सेल्वम आणि प्र-कुलगुरु श्री आर एस राजकन्नप्पन उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

* * *

NM/Tupe/Sanjana/Sampada/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1992351) Visitor Counter : 117