पंतप्रधान कार्यालय

जम्मू-काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद


'वतन को जानो - युथ एक्स्चेंज प्रोग्राम 2023' अंतर्गत विद्यार्थी शिष्टमंडळाची दिल्लीला भेट

जम्मू काश्मीरमधला युवा कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता  बाळगून असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी योगदान देत विकसीत भारत @2047 हे स्वप्न साकार करण्यात हातभार लावावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू-काश्मीरमध्ये उभारल्या जात असलेल्या जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलामुळे या भागातली दळणवळण सुविधा सुधारेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Posted On: 24 DEC 2023 7:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या आपल्या 7, लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी जम्मू-काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी  संवाद साधला. जम्मू-काश्मीरच्या सर्व जिल्ह्यांमधल्या सुमारे 250 विद्यार्थ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. या सगळ्यांनी पंतप्रधानांसोबतच्या मनमोकळ्या आणि अनौपचारिक संवादात भाग घेतला.

केंद्र सरकारच्या 'वतन को जानो - युथ एक्स्चेंज प्रोग्राम 2023' अंतर्गत विद्यार्थ्यांचं हे शिष्टमंडळ जयपूर, अजमेर आणि नवी दिल्लीला भेट देत आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' ही भावना मनात ठेवून जम्मू-काश्मीरमधल्या तरुणांना देशभरातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेचे दर्शन घडविणे हा या विद्यार्थी शिष्टमंडळाच्या भेटीमागचा मुख्य उद्देश आहे.

या विद्यार्थी शिष्टमंडळासोबतच्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाचा अनुभव आणि त्यांनी भेट दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांबद्दल विचारले. या संवादात पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरमधल्या समृद्ध क्रीडा संस्कृती आणि परंपरेवरही चर्चा केली, तसेच या विद्यार्थ्यांच्या क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळांमधल्या सहभागाबद्दलही विचारपूस केली. यावेळी पंतप्रधानांनी  हांगझोऊ इथं झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकलेल्या जम्मू-काश्मीमधली युवा तिरंदाज शीतल देवी हीचे उदाहरणही या विद्यार्थ्यांसमोर मांडले. जम्मू-काश्मीरच्या युवकांमध्ये असलेल्या प्रतिभेचेही पंतप्रधानांनी कौतुक केले, आणि इथला युवा कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता  बाळगून असल्याचे आवर्जून नमूद केले.

सर्व विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी काम करत स्वतःचं योगदान देत विकसीत भारत @2047 हे स्वप्न साकार करण्यात हातभार लावावा असा मोलाचा सल्लाही पंतप्रधानांनी या विद्यार्थ्यांना दिला.

जम्मू-काश्मीरमध्ये जगातला सर्वात उंच रेल्वे पुल उभारला जात असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी या संवादात केला, आणि या पुलामुळे या भागातली दळणवळण सुविधा सुधारेल असा विश्वासही व्यक्त केला.

चांद्रयान-3 आणि आदित्य-एल1 या मोहिमांच्या यशाबद्दलही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. देशानं विज्ञान क्षेत्रात करून दाखवलेल्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असल्याचंही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अधोरेखीत केलं.

यावर्षी जम्मू-काश्मीरला विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिल्यासंदर्भात  बोलताना पर्यटन क्षेत्रात जम्मू-काश्मीरला प्रचंड मोठ्या संधी असल्याचं त्यांनी नमूद केलं. या विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे फायदे सांगून, पंतप्रधानांनी त्यांना दररोज योगाभ्यासाचा सराव करण्याचं आवाहन केलं. जी - 20 परिषदेअंतर्गत काश्मीरमध्ये बैठकांचं यशस्वीरित्या झालेलं आयोजन आणि देशात स्वच्छता राखण्याच्या  प्रयत्नांच्या मुद्यावरही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1990137) Visitor Counter : 85