पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी  काशी तमिळ संगमम् 2023 चे केले उद्घाटन


थिरुक्कुरल, मनिमेकलाई आणि इतर उत्कृष्ट तमिळ साहित्याचे विविध भाषेतील तसेच  ब्रेल लिपीतील अनुवादाचे लोकार्पण.

पंतप्रधानांनी कन्याकुमारी - वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

"काशी तमिळ संगमम् 'एक भारत, श्रेष्ठ भारत' च्या भावनेला प्रोत्साहन देत आहे "

"काशी आणि तामिळनाडूमधील संबंध भावनिक आणि सर्जनशील आहेत."

"एक राष्ट्र म्हणून भारताची ओळख अध्यात्मिक विश्वासामध्ये आहे"

"आपला सामायिक वारसा आपल्याला आपल्या नातेसंबंधांच्या दृढतेची जाणीव करून देतो."

Posted On: 17 DEC 2023 8:11PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे काशी तमिळ संगमम् 2023 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कन्याकुमारी वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तसेच थिरुक्कुरल, मनिमेकलाई आणि इतर उत्कृष्ट तमिळ साहित्याचे विविध भाषेतील तसेच ब्रेल लिपीतील अनुवादाचे लोकार्पणही केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी भरवलेल्या प्रदर्शनात फेरफटका मारला आणि सांस्कृतिक कार्यक्रमही पाहिला. देशातील दोन सर्वात महत्त्वाची आणि शिक्षणाची प्राचीन ठिकाणे असलेल्या तामिळनाडू आणि काशी यांच्यातील जुने दुवे पुन्हा शोधणे, त्या दुव्यांची पुष्टी करणे आणि त्यांचा उत्सव साजरा करणे हे काशी तमिळ संगमम् चे उद्दिष्ट आहे.

मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी सर्वांचे पाहुणे म्हणून नव्हे तर आपले कुटुंबीय म्हणून स्वागत केले. तामिळनाडूतून काशीला येणे म्हणजे भगवान महादेवाच्या मदुराई मीनाक्षी या एका निवासापासून काशी विशालाक्षी या दुसऱ्या निवासस्थानापर्यंत प्रवास करणे होय, हे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तामिळनाडू आणि काशीमधील लोकांमधील अनोखा स्नेह आणि संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी काशीतील नागरिकांच्या आदरातिथ्याबाबत विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमातील सहभागी तामिळनाडूला परतताना , भगवान महादेवाच्या आशीर्वादासह काशीची संस्कृती, स्वादिष्ट खाद्यपदार्थ  आणि आठवणी घेऊन परततील, यावर पंतप्रधानांनी भर दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाचे तमिळमध्ये भाषांतर करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर प्रकाश टाकला आणि भविष्यातील कार्यक्रमांमध्येही  त्याचा वापर केला जाईल असे सांगितले

याप्रसंगी पंतप्रधानांनी कन्याकुमारी वाराणसी तमिळ संगमम् रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला तसेच तिरुक्कुरल, मनिमेकलाई आणि इतर उत्कृष्ट तमिळ साहित्याच्या विविध भाषेतील आणि ब्रेल लिपीतील अनुवादाचे लोकार्पण केले.  सुब्रमण्य भारती यांचे वक्तव्य उद्धृत करून पंतप्रधान म्हणाले की, काशी-तमिळ संगमम् ची स्पंदने देशभर आणि जगभर पसरत आहेत.

अनेक मठांचे प्रमुख, विद्यार्थी, कलाकार, लेखक, कारागीर आणि व्यावसायिकांसह लाखो लोक काशी तामिळ संगमम् ची गेल्या वर्षी स्थापना झाल्यापासूनच त्याचा भाग बनले आहेत. असे पंतप्रधान म्हणाले. काशी तामिळ संगमम् संवाद आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक प्रभावी व्यासपीठ बनले आहे, असेही ते म्हणाले.  बनारस हिंदू विद्यापीठ आणि आयआयटी, चेन्नई यांच्या संयुक्त उपक्रमाबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. या संयुक्त उपक्रमात चेन्नई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था, विद्या शक्ती उपक्रमांतर्गत, वाराणसीतील हजारो विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित या विषयात ऑनलाइन सहाय्य प्रदान करत आहे.  या अलीकडच्या काळातील घडामोडी काशी आणि तामिळनाडूतील लोकांमधील भावनिक आणि सर्जनशील दृढ बंधाचा पुरावा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, "काशी तमिळ संगमम 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही भावना अधिक दृढ करते." काशी तेलुगू संगमम आणि सौराष्ट्र काशी संगमम यांना एकत्र करण्यामागे ही हीच ही भावना होती, असे ते म्हणाले. देशातील सर्व राजभवनांमध्ये इतर राज्याचे दिन साजरे करण्याच्या नव्या परंपरेतून 'एक भारत, श्रेष्ठ भारतया भावनेला आणखी बळ मिळाले. यावेळी पंतप्रधानांनी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हीच भावना प्रतिबिंबित करणाऱ्या आदिनाम संतांच्या देखरेखीखाली नवीन संसद भवनात पवित्र सेंगोलची स्थापना केल्याची आठवण करून दिली. एक भारत, श्रेष्ठ भारतही भावना आज आपल्या राष्ट्रीय भावनेला अधिक प्रेरित करत आहे ”, असेही ते म्हणाले.

भारतातील प्रत्येक ठिकाणचे पाणी हे गंगाजल आहे आणि देशातील प्रत्येक भौगोलिक स्थान काशी आहे असे महान पांडियन राजा पराक्रम पांडियन यांनी सांगितल्याप्रमाणे भारताची विविधता अध्यात्मिक चेतनेमध्ये बदलली आहे असे यावेळी पंतप्रधानांनी नमूद केले. उत्तर भारतातील श्रद्धेची केंद्रे असणाऱ्या मंदिरांवर परकीय शक्तींकडून सतत हल्ले होत असताना, त्या काळी राजा पराक्रम पांडियन यांनी काशीचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तेन्काशी आणि शिवकाशी मंदिरे बांधल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. भारताची विविधता जी-20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या मान्यवरांच्या आकर्षणाचेही केंद्र ठरल्याचे प्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, इतर देशांमध्ये राष्ट्राची व्याख्या ही राजकीय भाषेत केली जाते, तर भारत एक राष्ट्र म्हणून अध्यात्मिक श्रद्धेने बांधला गेलेला आहे. भारताला आदि शंकराचार्य यांसारख्या संतांनी एकरूप केले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आदिना संतांच्या शिवस्थानांच्या यात्रांच्या भूमिकेचेही पंतप्रधानांनी स्मरण केले. "या यात्रांमुळे भारत एक राष्ट्र म्हणून चिरंतन आणि अटल राहिला आहे", असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

तामिळनाडूतील लोक, विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने काशी, प्रयाग, अयोध्या आणि इतर तीर्थक्षेत्रांना जात असल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवत पंतप्रधान मोदींनी प्राचीन परंपरांकडे देशातील तरुणांची रुची  वाढल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भगवान महादेवासह रामेश्वरमची स्थापना करणाऱ्या अयोध्येतील प्रभू रामाचे दर्शन हे दैवी आहे”, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, काशी तामिळ संगममला उपस्थित राहणाऱ्यांच्या अयोध्या भेटीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.

एकमेकांची संस्कृती जाणून घेण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला कारण यामुळे विश्वास वाढतो आणि संबंध विकसित होतात. काशी आणि मदुराई या दोन महान मंदिर शहरांचे उदाहरण देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, तमिळ साहित्य हे वागाई आणि गंगई (गंगा) या दोन्ही गोष्टींबद्दल भाष्य करते. "जेव्हा आपल्याला या वारशाची अनुभूती होते तेव्हा आपल्याला आपल्यातल्या नात्याची खोली समजते असेही ते म्हणाले".

काशी-तामिळ संगममचा हा संगम भारताचा वारसा अधिक सक्षम बनवत राहील आणि एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला बळ देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी काशीला भेट देणाऱ्यांचे वास्तव्य  आनंददायी राहावे  अशी अपेक्षा व्यक्त केली आणि प्रसिद्ध गायक श्रीराम यांनी आपल्या कलेने संपूर्ण श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आदी  मान्यवर उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1987557) Visitor Counter : 110