पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित


नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण 

“रोजगार मेळावा  तरुणांसाठी  ‘विकसित भारताचे' निर्माते बनण्याचा मार्ग प्रशस्त करतो

“नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याला तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे”

"ज्यांना कधीही कोणताही लाभ मिळाला नाही त्यांच्या दारापर्यंत सरकार पोहोचत आहे"

"भारत पायाभूत सुविधांच्या क्रांतीचा साक्षीदार आहे"

"अपूर्ण प्रकल्प हा देशातील प्रामाणिक करदात्यांवर मोठा अन्याय आहे, आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत"

"भारताच्या विकास गाथेबद्दल जागतिक संस्था आशावादी आहेत''

Posted On: 30 NOV 2023 5:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले हे कर्मचारी महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, वित्तीय सेवा विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय, यासह सरकारच्या  विविध मंत्रालये/विभागांमध्ये  रुजू होतील. 

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची सरकारची मोहीम सातत्याने पुढे जात आहे आणि आजच्या घडीला देशभरातील 50,000 हून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली आहेत, असे नवनियुक्तांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले. ही नियुक्तीपत्रे, नियुक्ती झालेल्यांच्या मेहनतीचे आणि परिश्रमाचे फलित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे कर्मचारी  लोकांशी थेट व्यवहार करणाऱ्या व्यवस्थेचा एक भाग बनणार आहेत, असे पंतप्रधान यावेळी, नवनियुक्त  आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करताना म्हणाले. एक सरकारी कर्मचारी या नात्याने, नवीन नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांवर पंतप्रधानांनी भर दिला आणि सर्वसामान्य लोकांचे  जीवनमान सुलभ करण्याला  सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाची  आठवण करून देत ,1949 मध्ये याच दिवशी देशाने भारतीय संविधान स्वीकारले आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले, असे पंतप्रधानांनी सांगितले. संविधानाचे शिल्पकार म्हणून सर्वांना समान संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचे  योगदान  त्यांनी अधोरेखित केले. समाजातील एक मोठा घटक वर्षानुवर्षे संसाधने आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असताना, स्वातंत्र्यानंतर समानतेच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करण्यात आले, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. 2014 नंतर आताचे सरकार सत्तेवर आले तेव्हा 'वंचितांना प्राधान्य' हा मंत्र अवलंबण्यात आला आणि नवा मार्ग तयार झाला, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ज्यांना कधीही कोणताही लाभ मिळालेला नाही, त्यांच्या दारापर्यंत सरकार पोहोचले आहे, असे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उपेक्षित राहिलेल्यांचे जीवन बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

जरी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, जनता आणि फाईल्स त्याच असल्या  तरीही गरीब आणि मध्यमवर्गाच्या विकासाला प्राधान्य दिल्याने संपूर्ण यंत्रणेच्या कार्यपद्धतीत आणि शैलीत सर्वांगीण बदल घडून आलं आहे, असे पंतप्रधानांनी सरकारच्या विचारसरणीत आणि कार्यसंस्कृतीत झालेल्या बदलामुळे आज झालेलले अभूतपूर्व बदल अधोरेखित करताना सांगितले.  त्यामुळे सर्वसामान्यांच्या कल्याणाचे सकारात्मक परिणाम समोर आले. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार गेल्या 5 वर्षांत 13 कोटींहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. सरकारी योजनांमुळे  गरिबांच्या जीवनात कशाप्रकारे परिवर्तन होते याची ही साक्ष आहे ”,असे ते म्हणाले. सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी ,नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी आपला वेळ जनतेच्या सेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले.

आज बदलत्या भारतात आधुनिक महामार्ग, रेल्वे स्थानके, विमानतळ आणि जलमार्ग या क्षेत्रांमधील   पायाभूत सुविधांच्या क्रांतीचे तुम्ही  साक्षीदार आहेत, असे पंतप्रधानांनी नवीन भरती झालेल्यांना सांगितले. पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे लाखो नवीन रोजगार निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.

प्रकल्प पूर्ण करताना त्यासाठी अभियान स्तरावर कार्य आवश्यक आहे असे सांगून  पंतप्रधान म्हणाले की अपूर्ण प्रकल्प म्हणजे देशातील प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करण्यासारखे आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये केंद्र सरकारने लाखो करोडो रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे पुनरावलोकन करून त्यांना त्वरित पूर्णत्वाला नेले आहे ज्यामुळे रोजगाराची नवीन दालने खुली झाली. या अनुषंगाने पंतप्रधानांनी रखडलेल्या प्रकल्पांची उदाहरणे दिली जे आता पूर्णत्वाला गेले यापैकी एक प्रकल्प म्हणजे गेली  22-23 वर्षे रखडलेला  बिदर कलबुर्गी रेल्वे मार्ग प्रकल्प जो केवळ तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. सिक्कीममधील पाकयोंग विमानतळाची संकल्पना 2008 मध्ये मांडण्यात आली होती परंतु 2014 पर्यंत ती केवळ कागदावरच राहिली आणि 2014 नंतर हा प्रकल्प 2018 पर्यंत पूर्ण झाला. त्याचप्रमाणे पारादीप शुद्धीकरण प्रकल्प देखील गेल्या  20-22 वर्षांपासून कोणत्याही महत्त्वपूर्ण प्रगतीशिवाय  केवळ चर्चेत होता. हा प्रकल्प अलीकडेच पूर्ण झाला आहे. 

देशातील बांधकाम क्षेत्राबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की हे क्षेत्र बांधकाम व्यावसायिक आणि मध्यमवर्गाला ऱ्हासाकडे घेऊन चालले होते मात्र रेरा कायद्यामुळे पारदर्शकता निर्माण झाल्याने गुंतवणुकीला चालना मिळाली. आज देशातील एक लाखाहून अधिक प्रकल्पांची रेरा अंतर्गत नोंदणी झाली आहे, असे ते म्हणाले. हे प्रकल्प कसे ठप्प झाले आणि रोजगाराच्या संधी देखील कशाप्रकारे गतिशून्य झाल्या हे सांगून देशातील बांधकाम व्यवसायाच्या वृद्धीमुळे आज रोजगाराच्या अमाप संधी निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकारची धोरणे आणि निर्णयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला एका नव्या उंचीवर नेले आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जगातील नामांकित संस्था भारताच्या वृद्धी दराबद्दल कमालीच्या आशावादी आहेत. देशातील रोजगाराच्या वाढत्या संधी, सध्या कार्यरत असलेली लोकसंख्या आणि श्रमिकांच्या उत्पादकतेत झालेली वाढ यामुळे गुंतवणूक मानांकनामधील जागतिक संस्थांनी  अलीकडेच भारताच्या वेगवान वाढीवर मान्यतेचे  शिक्कामोर्तब केले आहे असे सांगून यासाठी पंतप्रधानांनी, भारताच्या उत्पादकता आणि बांधकाम क्षेत्राला देखील श्रेय दिले. येत्या काळात भारतात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये सातत्याने वाढ होण्याच्या अनेकविध शक्यता असल्याचे या तथ्यांवरून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. 

भारतात होत असलेल्या विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत यासाठी पंतप्रधानांनी  सरकारी कर्मचारी म्हणून नियुक्त झालेल्यांच्या  भूमिकेवर भर दिला. एखादे क्षेत्र कितीही दूर असले तरी त्याला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. एखादी व्यक्ती कितीही  दुर्गम भागात असली तरी तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे, असे ते म्हणाले. नवनियुक्त अधिकाऱ्यांनी भारत सरकारचे कर्मचारी या नात्याने या दृष्टिकोनातून कार्य केले तरच विकसित भारताचे स्वप्न सत्यात साकारेल असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी देशाच्या दृष्टीने आगामी पंचवीस वर्षांच्या कार्यकाळाचे महत्व विशद केले. नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी कर्मयोगी प्रारंभ या मोड्युलचा वापर करावा आणि ज्ञानार्जन कायम ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. कर्मयोगी प्रारंभ हे मॉड्यूल वर्षभरापूर्वी सुरू झाल्यापासून लाखो नवीन सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याद्वारे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली. आयगाॅट  iGoT कर्मयोगी या प्रशिक्षण मंचावर 800 पेक्षा अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. त्याचा उपयोग तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी करा असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला आणि नवनियुक्तांचे त्यांच्या यशाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन केले. राष्ट्र निर्मितीच्या दिशेने तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छाअसे पंतप्रधानांनी सांगितले.

पार्श्वभूमी

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे.  रोजगार मेळा हा पुढील रोजगार निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी सहाय्य करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागी होण्यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे.

नव्याने नियुक्ती झालेले उमेदवार त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि भूमिका- क्षमतांसह, देशाच्या औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या सक्षमीकरणाच्या कार्यात योगदान देतील आणि त्याद्वारे विकसित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावतील.

नव्याने नियुक्त केलेल्यांना कर्मयोगी प्रारंभ द्वारे आयगाॅट (iGOT) या पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूलवर  स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळत आहे, ज्यावर 800 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम कुठेही कोणत्याही साधनावरप्रशिक्षणासाठी (लर्निग फॉरमॅट) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

***

R.Aghor/S.Chavan/B.Sontakke/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1981341) Visitor Counter : 123