आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशातील 203 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 1,232 आरोग्य शिबिरांचे आयोजन; 1,66,000 पेक्षा अधिक लोकांनी घेतला लाभ


शिबिरांमध्ये 33,000 हून अधिक आयुष्मान कार्डे तयार केली तर 21,000 हून अधिक कार्डांचे प्रत्यक्ष वितरण

Posted On: 22 NOV 2023 4:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023

केंद्र सरकारी योजनांचा लाभ देशभरातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या मार्गदर्शक उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील खुंटी येथून दिनांक 15 नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ केला. जनतेला जलद सेवा देण्याच्या उद्देशाने टपाल विभाग, आरोग्य विभाग आणि यांसारख्या इतर अनेक विभागांतर्फे विविध शिबिरांचे आयोजन केले जात आहे. सरकारच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती देऊन नागरिकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने सुरु केलेल्या या यात्रेचा उद्देश जनतेमध्ये जागृती निर्माण करणे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ थेटपणे लोकांपर्यंत पोहोचवणे असा आहे.

आदिवासी गौरव दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या योजनांची माहिती देणारा संदेश घेऊन जाणाऱ्या विशेष पद्धतीने निर्मित आयईसी व्हॅन्सना झेंडा दाखवून रवाना केले. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ऑन-स्पॉट म्हणजे जागेवर थेट उपलब्ध असणाऱ्या सेवांचा भाग म्हणून ज्या ग्राम पंचायतींमध्ये आयईसी व्हॅन्सना थांबा दिलेला आहे तेथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी उपलब्ध माहितीनुसार, पहिल्या आठवड्यात देशभरातील 203 ग्रामपंचायतींमध्ये 1232 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे आणि 1,66,000 पेक्षा अधिक लोकांनी त्यांचा लाभ घेतला आहे.

Lower Subansiri, Arunachal Pradesh

Dang, Gujarat

Rajouri, J&K

North and Middle Andaman

Koraput, Odisha

Vanthadapalli ASR, Andhra Pradesh

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरु आकारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणून आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आयुष्मान ॲपचा वापर करुन आयुष्मान कार्डे तयार केली जात आहेत आणि लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कार्डांचे वितरण देखील करण्यात येत आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी या शिबिरांमध्ये 33,000 हून अधिक आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली तर 21,000 हून अधिक कार्डांचे प्रत्यक्ष वितरण करण्यात आले

क्षयरोगाची लक्षणे, थुंकीची तपासणी तसेच जेथे एनएएटी यंत्रे उपलब्ध होणे शक्य आहे तेथे या यंत्रांच्या सहाय्याने क्षयरोगाची शक्यता तपासण्यासाठी चाचण्या करण्यात येत आहेत. क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता असणाऱ्या रुग्णांना पुढील तपासण्या तसेच उपचारांसाठी विशेष सुविधा असणाऱ्या केंद्रांकडे पाठवले जात आहे. यात्रेच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी 41,000 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4,000 हून अधिक लोकांना पुढील उपचारासाठी वरच्या पातळीवरील सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांकडे पाठवण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये आलेल्या समस्यांबद्दल काही राज्यांनी माहिती कळवली आहे. महाराष्ट्रात सामाजिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या (सीएचओज) संपामुळे आरोग्य शिबिरे आयोजित करणे आव्हानात्मक होते मात्र एएनएमज आणि एएसएचएज यांच्या मदतीने अत्यंत यशस्वीरित्या आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली आणि नागरिकांना सर्व सेवा सुरळीतपणे पुरवता आल्या. महाराष्ट्रात आयईसी व्हॅन्स दुर्गम भागात आणि वस्त्यांपर्यंत पोहोचल्या आणि या अत्यावश्यक सेवा सर्वांना उपलब्ध असतील याची त्यांनी सुनिश्चिती करून घेतली अशी नोंद करण्यात आली आहे.

या यात्रेने आयुष्मान सुवर्ण कार्ड योजनेला प्रोत्साहन देऊन चालना देण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातील अनेक ब्लॉक्समध्ये यात्रेच्या कालावधीत सामुदायिक सहभागामध्ये लक्षणीय यश मिळाले. गुजरात राज्याने आधार कार्डे आणि शिधापत्रिकांच्या कार्यक्षम वितरणासाठी या यात्रेच्या मंचाचा वापर करून घेतला. तर त्रिपुरा राज्याने उत्पन्नाचे दाखले आणि दिव्यांग दाखले जरी करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या मंचाचा वापर केला.

या आरोग्य शिबिरांनी सिकल सेल, क्षयरोग, मधुमेह तसेच उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांनी पिडीत व्यक्ती सोप्या रीतीने ओळखून त्यांना उपचारासाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले असे बहुतांश राज्यांनी कळवले आहे.

 

S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1978778) Visitor Counter : 146