पंतप्रधान कार्यालय

भारत मंडपम येथे विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 03 NOV 2023 2:01PM by PIB Mumbai

या कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयलजी, गिरीराज सिंहजी,पशुपती पारसजी, पुरुषोत्तम रुपालाजी, प्रल्हाद सिंह पटेलजी, जगभरातील विविध देशांमधून आलेले सर्व पाहुणे, राज्य सरकारांतील मंत्री, उद्योगविश्व आणि स्टार्ट अप जगतातील सर्व सहकारी, देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले शेतकरी बंधू-भगिनी, स्त्री-पुरुषहो, तुम्हा सर्वांचे विश्व भारतीय खाद्य महोत्सवात स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन.

मी आताच तंत्रज्ञानावर आधारित दालनाला भेट देऊन इथे आलो आहे. या महोत्सवात ज्या प्रकारे तंत्रज्ञानावर आधारित दालन, स्टार्ट अप दालन आणि फूड स्ट्रीट यांसारखे उपक्रम मांडले आहेत ते अद्भुत आहेत. चव आणि तंत्रज्ञान यांचा हा मिलाफ एका नव्या भविष्याला जन्म देईल, एका नव्या अर्थव्यवस्थेला चालना देईल. आजच्या सतत बदलणाऱ्या जगात, अन्न सुरक्षेचा प्रश्न देखील 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. आणि म्हणूनच विश्व भारतीय खाद्य महोत्सवाचे हे आयोजन अधिकच महत्त्वाचे ठरते.

मित्रांनो,

भारतात अन्न प्रक्रिया उद्योगाकडे आज सनराईज सेक्टर म्हणजे उदयाला येत असलेले क्षेत्र म्हणून पाहिले जाते. पहिल्या विश्व भारतीय खाद्य महोत्सवाच्या आयोजनातून जे निष्कर्ष हाती आले आहेत ते देखील याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये या क्षेत्रात 50 हजार कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. हा भारत सरकारच्या उद्योग-स्नेही आणि शेतकरी-स्नेही धोरणांचा परिणाम आहे. आम्ही अन्न प्रक्रिया क्षेत्रासाठी उत्पादनाशी संलग्न अनुदान (पीएलआय) योजना देखील सुरु केली आहे. या योजनेतून प्रक्रिया उद्योग आणि या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या उद्योजकांना विशेष सहकार्य मिळत आहे.

आज भारतात अग्री-इन्फ्रा निधीअंतर्गत काढणी-पश्चात पायाभूत सुविधांसाठी हजारो प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या क्षेत्रात देखील 50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुक झाली आहे. तसेच मत्स्यपालन आणि पशुपालन क्षेत्रातील अन्नप्रक्रियाविषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी देखील हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

मित्रांनो,

आज भारतात सरकारने जी गुंतवणूकदार-स्नेही धोरणे राबवली आहेत ती खाद्यान्न क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. गेल्या 9 वर्षांमध्ये भारताच्या कृषीविषयक निर्यात क्षेत्रातील प्रक्रियायुक्त खाद्यान्नाचा वाटा 13 टक्क्यावरुन 23 टक्क्यापर्यंत वाढला आहे. या 9 वर्षांमध्ये प्रक्रियायुक्त अन्नाच्या निर्यातीत सुमारे 150 टक्क्याची वाढ झाली आहे. आज आपण 50,000 दशलक्ष डॉलर्सहून अधिक निर्यात मूल्याच्या कृषी मालाची निर्यात करून  जगात सातव्या स्थानावर पोहोचलो आहोत. अन्न प्रकिया उद्योगात असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे भारताने अभूतपूर्व वाढ नोंदवलेली नाही. अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असलेली प्रत्येक कंपनी आणि स्टार्ट अप उद्योग यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
 
 मित्रांनो,

ही वाढ आत्ता अति वेगवान आणि जलद वाटत असली तरी त्याच्या मागे आमची सातत्यपूर्ण आणि समर्पित मेहनत देखील आहे. आमच्या सरकारच्या कार्यकाळात देशात प्रथमच कृषी निर्यात धोरण तयार करण्यात आले. आम्ही लॉजिस्टिक्स आणि पायाभूत सुविधांचे देशव्यापी नेटवर्क उभे केले.

आज भारतातील 100 हून अधिक जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निर्यात केंद्र उभारण्यात आली आहेत ज्यांच्या माध्यमातून हे जिल्हे थेटपणे जागतिक बाजारपेठेशी जोडले गेले आहेत. यापूर्वी देशात 2 मेगा फूड पार्क कार्यरत होते, आज त्यांची संख्या 20 पेक्षाही जास्त झाली आहे. आधी आपली अन्न प्रक्रिया क्षमता 12 लाख टन होती ती आता 200 लाख टनांपेक्षा जास्त झाली आहे. म्हणजेच 9 वर्षांमध्ये 15 पटीहून अधिक वाढ!

अशी अनेक कृषी उत्पादने आहेत जी पहिल्यांदाच परदेशी बाजारांमध्ये पोहोचली आहेत. हिमाचल प्रदेशातील काळा लसूण, कच्छ मधील ड्रॅगनफ्रुट, मध्य प्रदेशातील सोया दूध पावडर, लडाख मधील कार्कीचू सफरचंदे, पंजाबमधील कॅव्हेंडीश केळी, जम्मूमधील गुची मश्रुम्स आणि कर्नाटकामधील कच्चा मध अशी कितीतरी उत्पादने अनेक देशांमध्ये ग्राहकांच्या पसंतीची झाली आहेत, ही उत्पादने तेथील लोकांमध्ये विशेष आवडीची झाली आहेत. म्हणजेच तुमच्यासाठी संपूर्ण जग ही एक खूप मोठी बाजारपेठ बनली आहे.

मित्रांनो,

भारतात देखील आणखी एक क्षेत्र उदयाला येत आहे. मी तुम्हा सर्वांचे लक्ष त्याकडे वेधू इच्छितो. आज भारतात वेगाने होत असलेले शहरीकरण लक्षात घेता, वाढत्या संधींसोबत, घराबाहेर पडून काम करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढते आहे. आणि यामुळे पॅकबंद पदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे, त्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत आपले शेतकरी, स्टार्ट अप्स आणि लहान उद्योजकांसाठी अनपेक्षित संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. या शक्यतांसाठी तुमचे नियोजन देखील तितकेच महत्त्वाकांक्षी असणे गरजेचे आहे.

मित्रांनो ,

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील भारताच्या यशोगाथेचे तीन सर्वात प्रमुख स्तंभ आहेत - लहान शेतकरी, लघु उद्योग आणि महिला! लहान शेतकऱ्यांचा सहभाग आणि फायदा वाढवण्यासाठीचा मंच म्हणून शेतकरी उत्पादक संघटनांचा म्हणजेच एफपीओजचा वापर केला आहे. भारतात आम्ही 10 हजार नव्या एफपीओजची स्थापना करत आहोत आणि त्यापैकी 7 हजार संघटना याआधीच स्थापन झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आता अधिक सुलभतेने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येत आहे आणि त्यांना अन्न प्रक्रिया करण्याच्या सुविधा देखील अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. अन्न प्रक्रिया उद्योगात लहान प्रमाणात व्याप्ती असणाऱ्या उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी सुमारे 2 लाख सूक्ष्म उद्योगांची उभारणी केली जात आहे. सरकारच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ – ओडीओपी सारख्या योजनांमुळे देखील छोटे शेतकरी आणि लघु उद्योगांना नवी ओळख मिळाली आहे.

मित्रांनो,

भारत आज जगाला महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मार्ग दाखवतो आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सतत वाढत आहे. याचा देखील फायदा अन्न प्रक्रिया उद्योगाला मिळत आहे. आज भारतातील 9 कोटींहून अधिक महिला स्वयंसहाय्यता बचत गटांशी जोडलेल्या आहेत. भारतात हजारो वर्षांपासून अन्न विज्ञानातील आघाडीचे शास्त्रज्ञ महिलाच आहेत. आपण अन्न पदार्थांची जी विस्तृत श्रेणी पाहतो, जे वैविध्य पाहतो ते म्हणजे भारतीय महिलांचे कौशल्य आणि ज्ञान यांचा परिपाक आहे. लोणची, पापड, चिप्स, मोरांबे अशा कितीतरी उत्पादनांची बाजारपेठ महिलावर्ग आपापल्या घरांतूनच चालवतो.  
भारतीय महिलांकडे अन्न प्रक्रिया उद्योगाचे नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. म्हणूनच प्रत्येक पातळीवर महिलांना, कुटिरोद्योगांना आणि बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे.

आज या कार्यक्रमातही महिला बचत गट चालवणाऱ्या 1 लाखाहून अधिक महिलांना कोट्यवधी रुपयांचे बीज भांडवल देण्यात आले आणि ते मी आता येथून त्यांच्या खात्यात तांत्रिकदृष्ट्या आधीच जमा केले आहे. मी या महिलांचे विशेष अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.

मित्रांनो, 

भारतात जेवढी सांस्कृतिक विविधता आहे तेवढीच खाद्य विविधता, खाद्यपदार्थांचीही विविधता आहे.  आपली ही खाद्य विविधता जगातील प्रत्येक गुंतवणूकदारासाठी लाभांश आहे. आज ज्या प्रकारे संपूर्ण जगात भारताविषयी उत्सुकता वाढली आहे, ती तुम्हा सर्वांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे. जगभरातील खाद्य उद्योगांना भारताच्या खाद्य परंपरांमधूनही खूप काही शिकण्यासारखे आहे.

येथे ही एक गोष्ट शतकानुशतके जीवनाचा भाग आहे, प्रत्येक कुटुंबाच्या विचारांचा एक भाग आहे. आपल्या येथे म्हटले जाते - 'यथा अन्नम्, तथा मन्नम'.  म्हणजेच आपण जसे अन्न खातो त्यासारखेच आपले मन बनते.  म्हणजेच अन्न हा केवळ आपल्या शारीरिक आरोग्याचाच मोठा घटक नाही तर आपल्या मानसिक आरोग्यामध्येही तो मोठी भूमिका बजावतो. भारताची शाश्वत खाद्यसंस्कृती हा हजारो वर्षांच्या विकास प्रवासाचा परिणाम आहे.  आपल्या पूर्वजांनी खाण्याच्या सवयींचा संबंध आयुर्वेदाशी जोडला होता.  आयुर्वेदात असे म्हटले आहे - ‘ऋत-भुक्’ म्हणजेच ऋतूनुसार खाणे, ‘मित् भुक्’ म्हणजेच संतुलित आहार आणि ‘हित भुक्’, म्हणजेच आरोग्यदायी पदार्थ, हे भारताच्या वैज्ञानिक आकलनाचे महत्त्वाचे भाग आहेत.

शतकानुशतके भारतातून होणाऱ्या अन्नधान्य आणि विशेषतः मसाल्यांच्या व्यापारातून संपूर्ण जगाला भारताच्या या ज्ञानाचा फायदा होईल. आज जेव्हा आपण जागतिक अन्न सुरक्षेबद्दल बोलतो, जागतिक आरोग्याबाबत इतक्या मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जाते, तेव्हा आपल्या अन्न प्रक्रिया उद्योगानेही शाश्वत आणि आरोग्यदायी अन्न सवयींचे हे प्राचीन ज्ञान जाणून घ्यायला हवे, समजून घ्यायला हवे आणि त्याचा अवलंब करायला हवा.

मी तुम्हाला उदाहरण देतो भरडधान्याचे.  या वर्षी जग आंतरराष्ट्रीय भरडधान्य  वर्ष साजरे करत आहे.  आपल्या सर्वांना माहित आहे की भरडधान्य आपल्या सुपरफूड बकेटचा भाग आहे.  भारतात आपण त्याला श्रीअन्न अशी  ओळख दिली आहे.  शतकानुशतके, बहुतेक सभ्यतांमध्ये भरडधान्याला मोठे प्राधान्य दिले गेले. परंतु, गेल्या काही दशकांमध्ये भारतासह अनेक देशांमध्ये भरडधान्ये लोकांच्या खाण्याच्या सवयीतून दूर गेली आहेत. यामुळे जागतिक आरोग्य, शाश्वत शेती आणि शाश्वत अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले.

भारताने घेतलेल्या पुढाकारामुळे आज पुन्हा एकदा जगभर भरडधान्याबाबत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे.  माझा विश्वास आहे, ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाने योगाला जगाच्या कानाकोपऱ्यात नेले, त्याचप्रमाणे आता भरडधान्येही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. नुकतेच, याच ठिकाणी झालेल्या जी20 शिखर परिषदेत भारताने जगातील प्रमुख नेत्यांचे यजमान म्हणून स्वागत केले होते, तेव्हा त्यांनाही भरडधान्याच्या पदार्थांपासून बनवलेले पदार्थ आवडले होते.

आज भारतात अनेक मोठमोठ्या कंपन्या भरडधान्याचे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बाजारात आणत आहेत. या दिशेने जास्तीत जास्त संधी कशा निर्माण करता येतील, खाद्यान्न बाजारात श्रीअन्नाचा वाटा कसा वाढवता येईल, याबाबत आपण सर्वांनी चर्चा करून त्यासाठी एक सामूहिक रुपरेषा तयार करायला हवी, जेणेकरुन उद्योग आणि शेतकरी या दोघांनाही त्याचा फायदा होईल.

मित्रांनो,

या परिषदेत अनेक भविष्यवेधी विषय आपल्यासमोर मांडले जाणार आहेत.  तुम्ही उद्योग आणि व्यापक जागतिक हित या दोन्ही विषयांवर चर्चा करून त्या दिशेने पावले उचलली पाहिजेत.  उदाहरणार्थ, जी20 गटाने दिल्ली जाहीरनाम्यात शाश्वत शेती, अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षा यावर भर दिला आहे. अन्न प्रक्रियेशी संबंधित सर्व भागीदारांची या प्रकरणी मोठी भूमिका आहे. यासाठी आपण स्वतःला तयार केले पाहिजे.

आपण देशातील 10 कोटींहून अधिक मुले, मुली आणि गर्भवती महिलांना पौष्टिक आहार पुरवत आहोत. अन्न वितरण कार्यक्रमाला वैविध्यपूर्ण अन्न समुच्चयाकडे नेण्याची हीच वेळ आहे.  त्याचप्रमाणे, आपल्याला काढणीनंतरचे नुकसान आणखी कमी करावे लागेल.  पॅकेजिंगमध्ये चांगले तंत्रज्ञान आणण्यासाठी काम करावे लागेल.  अन्नाची नासाडी रोखणे हेही शाश्वत जीवनशैलीसाठी मोठे आव्हान आहे.  आपली उत्पादने अशी असली पाहिजेत की जाने नासाडी थांबायला हवी. 

यामध्ये तंत्रज्ञानही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. नाशवंत उत्पादनांची प्रक्रिया शक्य तितकी वाढवावी लागेल.  त्यामुळे नासाडी कमी होईल, शेतकर्‍यांनाही फायदा होईल, शिवाय भावातील चढउतार रोखण्यासही मदत होईल. शेतकऱ्यांचे हित आणि ग्राहकांचे समाधान यामध्ये समतोल साधला पाहिजे. मला खात्री आहे, या कार्यक्रमात अशा सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. येथे काढलेले निष्कर्ष जगासाठी शाश्वत आणि अन्न सुरक्षेच्या भविष्याचा पाया घालतील.

पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे लोक दिल्लीत, दिल्लीच्या आसपास आहेत आणि ज्यांना या विषयात रस आहे, मग ते कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी असोत, स्टार्टअप्सच्या जगातले लोक असोत, शेतकरी संघटना चालवणारे लोक असोत;  मी त्यांना विनंती करेन... हा उत्सव इथे तीन दिवस चालणार आहे;  तुम्ही जरूर या... दोन-चार तास येथे घालवा... जग किती झपाट्याने बदलत आहे.  आपल्या शेतातील प्रत्येक गोष्ट आपण किती प्रकारे वापरू शकतो?  मूल्यवर्धन करून आपण आपले उत्पन्न कसे वाढवू शकतो?  आज अनेक गोष्टी इथे आहेत ते पहा.

माझ्याकडे जितका वेळ होता, पण त्यात मला जितके पाहायला मिळाले, ते खरोखरच प्रभावित करणारे आहे.  आणि म्हणूनच मी त्यांना प्रत्येक स्टॉलवर जाऊन, त्या गोष्टी बघून, पुढे नेण्याचा आग्रह करायला आलो आहे, तुम्ही त्यातही मूल्यवर्धनाचे काम करू शकता. पण मी देशवासीयांना हेही सांगेन की जे दिल्लीत पोहोचू शकतात  त्यांनी या तीन दिवसांचा लाभ घ्यावा आणि अशा भव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याच अपेक्षेसह तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

खूप खूप धन्यवाद!

*****

MI/Sanjana C/Vinayak/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974644) Visitor Counter : 121