पंतप्रधान कार्यालय

मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी


देशाच्या कानाकोपऱ्यातून संकलित केलेल्या मातीपासून उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची केली पायाभरणी

‘मेरा युवा भारत’ - माय भारत मंचाचा केला प्रारंभ

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 1. जम्मू आणि काश्मीर, 2. गुजरात आणि 3. हरियाणा या अव्वल 3 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुरस्कार केला प्रदान

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 मंत्रालयांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुरस्कार प्रदान केला - 1. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, 2. संरक्षण मंत्रालय; आणि 3. रेल्वे मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांना संयुक्तपणे

"माय भारत 21 व्या शतकात राष्ट्र उभारणीत मोठी भूमिका बजावणार "

"भारतातील युवक कशा प्रकारे संघटित होऊन प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात याचे मेरी माटी मेरा देश अभियान हे जिवंत उदाहरण आहे"

"अनेक महान संस्कृतीचा ऱ्हास झाला मात्र भारताच्या मातीत एक चैतन्य आहे ज्याने या देशाचे प्राचीन काळापासून ते आजपर्यंत संरक्षण केले आहे"

"भारताची माती आत्म्यामध्ये अध्यात्माप्रति ओढ निर्माण करते"

“अमृत वाटिका भावी पिढीला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ बद्दल माहिती देईल”

"अमृत महोत्सवाने एक प्रकारे इतिहासाची हरवलेली पाने भावी पिढ्यांसाठी जोडली आहेत"

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान, देशाने राजपथ ते कर्तव्यपथ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला"

"माझा युवा भारत संघटना हा भारताच्या युवा शक्तीचा जयघोष आहे"

Posted On: 31 OCT 2023 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील कर्तव्यपथ येथे आयोजित मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभही आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली आणि देशातील युवकांसाठी ‘मेरा युवा भारत’ - माय भारत मंचाचे उदघाटनही केले.

मोदी यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांना तसेच मंत्रालये किंवा विभागांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुरस्कारही प्रदान केले. जम्मू आणि काश्मीर, गुजरात आणि हरियाणा ही सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी 3 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत, तर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंत्रालयांमध्ये पहिल्या स्थानी परराष्ट्र मंत्रालय, दुसऱ्या स्थानी संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की सरदार साहेबांच्या जयंतीदिनी कर्तव्यपथ आज महायज्ञ पाहत आहे. 12 मार्च 2021 या दिवशी महात्मा गांधींच्या दांडी यात्रेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात केली होती याचे स्मरण करत पंतप्रधानांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप केला. प्रत्येक भारतीयाचा सहभाग असलेल्या दांडी मार्च यात्रेशी साधर्म्य साधून पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे लोकांचे लक्ष वेधले ज्याने लोकसहभागाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.

“दांडी मार्चने स्वातंत्र्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित केली तर अमृत काळ भारताच्या विकासाच्या 75 वर्षांच्या प्रवासाचा संकल्प ठरत आहे” यावर मोदींनी भर दिला. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा 2 वर्षे चाललेल्या प्रदीर्घ सोहळ्याची सांगता होत आहे असे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या ऐतिहासिक आयोजनाची भावी पिढ्यांना आठवण करून देणाऱ्या स्मारकाच्या पायाभरणीचाही त्यांनी उल्लेख केला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालयांचेही त्यांनी अभिनंदन केले.

भव्य उत्सवाची आपण सांगता करत असतानाच  'माय भारत' सह एका नव्या संकल्पाची सुरुवात आपण करत आहोत, हे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.  “21 व्या शतकात राष्ट्र उभारणीत माय भारत संस्था मोठी भूमिका बजावणार आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतीय युवांच्या सामूहिक सामर्थ्याकडे लक्ष वेधताना पंतप्रधान म्हणाले, "मेरी माटी मेरा देश अभियान" हे भारतातील तरुण कसे संघटित होऊ शकतात आणि  प्रत्येक ध्येय साध्य करू शकतात याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे." पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य तरुणांच्या सहभागावर प्रकाश टाकला.  देशभरातून 8500 अमृत कलश कर्तव्यपथावर पोहोचले आहेत आणि करोडो भारतीयांनी पंचप्रण प्रतिज्ञा घेतली असून अभियान संकेतस्थळावर सेल्फी अपलोड केले असल्याचे सांगितले. 

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या समारोपासाठी घटक म्हणून मातीचा वापर का करण्यात आला हे स्पष्ट करताना पंतप्रधानांनी एका कवीचे शब्द उद्धृत केले आणि सांगितले भूमीवर संस्कृती भरभराटीला आल्या,  मानवाने प्रगती केली आहे आणि प्रचंड मोठ्या कालखंडाचा ठसा ज्या भूमीवर उमटला आहे, ती ही भूमी आहे. “भारताच्या मातीत चैतन्य आहे. त्यात एक जीवन स्वरूप आहे ज्यामुळे सभ्यतेचा ऱ्हास रोखला गेला आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अनेक संस्कृती लयाला गेल्या असताना भारत कसा ठामपणे उभा आहे हे त्यांनी नमूद केले. “आत्म्यासाठी भारताची माती अध्यात्माबद्दल आत्मीयता निर्माण करते”, असे सांगत त्यांनी भारताच्या शौर्याच्या असंख्य गाथा उलगडून दाखवताना शहीद भगतसिंग यांच्या योगदानाचा उल्लेख केला. प्रत्येक नागरिकाची पाळंमुळं  मातृभूमीच्या मातीत कशी खोलवर रुजलेली आहेत यावर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले, "त्या जीवनाला काय अर्थ आहे , जर ते भारताच्या मातीचे ऋण फेडत नसेल!" दिल्लीत दाखल झालेल्या हजारो ‘अमृत कलशां मधील माती प्रत्येकाला कर्तव्य भावनेचे स्मरण करून देत राहील आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणा देत राहील, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्र उभारणीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

देशभरातून आलेल्या  रोपांची उभारली जाणारी  अमृत वाटिका येणाऱ्या पिढीला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची शिकवण देत राहील. नवीन संसद भवनात  देशाच्या कानाकोपऱ्यातल्या 75  महिला कलाकारांनी सर्व राज्यांच्या मातीतून   साकारलेल्या जन, जननी, जन्मभूमी या कलाकृतीबद्दल पंतप्रधानांनी उपस्थितांना माहिती दिली. 

सुमारे 1000 दिवस चाललेल्या आझादी का अमृत महोत्सव (AKAM) अर्थात स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सवाचा  सर्वाधिक सकारात्मक परिणाम भारताच्या तरुण पिढीवर झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या पिढीला गुलामगिरीचा अनुभव आलेला नसून तेसुद्धा स्वतंत्र भारतात जन्मलेले  पहिले पंतप्रधान असल्याचे, त्यांनी सांगितले.   परकीय राजवटीत असा एकही क्षण नव्हता जेव्हा स्वातंत्र्यासाठी कोणतीही चळवळ झाली नाही आणि कोणताही विभाग किंवा प्रदेश असा नव्हता जो चळवळींपासून अलिप्त होता, याचे स्मरण लोकांना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाने करून दिले, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

“अमृत महोत्सवाने एकप्रकारे इतिहासाची हरवलेली पाने भविष्यातील पिढ्यांसाठी  जोडली आहेत, असे .पंतप्रधान म्हणाले. भारतातील जनतेने अमृत महोत्सवाला लोकचळवळ बनवले आहे. हर घर तिरंगा या या मोहिमेचे  यश हे प्रत्येक भारतीयाचे यश असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या कुटुंबांचे आणि गावांचे योगदान लोकांना समजले. स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हानिहाय डेटाबेस तयार करण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान भारताने केलेल्या  कामगिरीवर प्रकाश टाकला. आणि जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा उदय, चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग, जी 20 शिखर परिषदेचे आयोजन, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये  100 हून अधिक पदके जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम, संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, नारी शक्ती वंदन कायदा, निर्यातीत, कृषी उत्पादनात नवे विक्रम, वंदे भारत रेल्वे  जाळ्याचा  विस्तार, अमृत भारत स्थानक अभियानाची सुरुवात, देशातील पहिली प्रादेशिक गतिमान  रेल्वे  नमो भारत, 65,000  हून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती, मेड इन इंडिया 5जीचा प्रारंभ  आणि विस्तार, आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पीएम गतीशक्ती बृहद आराखडा योजना याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

“स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवादरम्यान देशाने राजपथ ते कर्तव्यपथ हा प्रवास पूर्ण केला. गुलामगिरीची अनेक प्रतीकेही आपण काढून टाकली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. इंडिया गेटवरील नेताजी सुभाष बोस यांचा पुतळा, नौदलाचे नवे  बोधचिन्ह, अंदमान निकोबार बेटांना प्रेरणादायी नावे, आदिवासी  गौरव दिवस, साहिबजादे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वीर बाल दिवस आणि दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती  दिवस साजरा करण्याचा निर्णय हे सरकारचे  निर्णय त्यांनी नमूद केले.

''एखाद्या गोष्टीचा शेवट नेहमी नवीन गोष्टीची सुरुवात दर्शवतो” असे पंतप्रधानांनी  संस्कृत श्लोकाचा अर्थ  स्पष्ट करताना सांगितले . त्यांनी अमृत महोत्सवाच्या समारोपासह माय भारतचा शुभारंभ  नमूद केला आणि "माय भारत हे भारतातील युवा शक्तीचे घोषणापत्र आहे.", असे त्यांनी सांगितले. देशातील प्रत्येक तरुणाला एका मंचावर  आणण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम बनेल, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी माय भारत संकेतस्थळाच्या शुभारंभाची माहिती दिली आणि   तरुणांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांचा या मंचावर  समावेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या मंचाशी  शक्य तितके स्वतःला जोडावे  भारताला नवीन उर्जेने भरावे आणि देशाला पुढे नेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी तरुणाईला  केले.

भाषणाचा समारोप करताना , पंतप्रधानांनी भारताचे स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाच्या समान संकल्पांची पूर्तता आहे आणि त्याचे एकतेने  संरक्षण करण्याचे आवाहन   केले. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प लक्षात घेऊन, स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण झाल्यावर हा विशेष दिवस देशाच्या स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले . “आपण  घेतलेला संकल्प, येणार्‍या पिढीला दिलेली वचने आपल्याला  पूर्ण करावी लागतील”, यासाठीचे   प्रयत्न अधिकाधिक वाढवण्याचे  आवाहन पंतप्रधानांनी केले. “विकसित देश होण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक भारतीयाचे योगदान महत्त्वाचे आहे. चला, अमृत महोत्सवाच्या माध्यमातून विकसित भारताच्या अमृतकाळाचा नवा प्रवास सुरू करूया”, असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री  अनुराग सिंह ठाकूर आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री   जी किशन रेड्डी आदी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

मेरी माटी मेरा देश

मेरी माटी मेरा देश मोहीम ही देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर आणि वीरांगनांना आदरांजली आहे. जन भागीदारीच्या भावनेने, या मोहिमेमध्ये देशभरात पंचायत/गाव, तालुका, शहरी स्थानिक संस्था, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांचा आणि समारंभांचा समावेश आहे. यात सर्वोच्च बलिदान दिलेल्या सर्व शूरवीरांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिलाफलकम (स्मारक) उभारणे; शिलाफलकम येथे लोकांकडून ‘पंच प्रण’ शपथ घेणे; स्वदेशी प्रजातींच्या रोपांची लागवड आणि ‘अमृत वाटिका’ (वसुधा वनधन) विकसित करणे आणि स्वातंत्र्यसैनिक आणि दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा (वीरों का वंदन) सन्मान करण्यासाठी सत्कार समारंभ करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.

36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2.3 लाख शिलाफलक बांधून ही मोहीम प्रचंड यशस्वी झाली; सुमारे 4 कोटी पंचप्रण प्रतिज्ञा सेल्फी अपलोड करण्यात आले; देशभरात 2 लाखांहून अधिक ‘वीरों का वंदन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले; 2.36 कोटी पेक्षा जास्त देशी रोपांची लागवड करण्यात आली; आणि देशभरात वसुधा वंदन संकल्पने अंतर्गत 2.63 लाख अमृत वाटिका तयार करण्यात आल्या.

'मेरी माटी मेरा देश' मोहिमेमध्ये अमृत कलश यात्रेचाही समावेश आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील 6 लाखाहून अधिक खेड्यांमधून आणि शहरी भागातील प्रभागांमधून मृदा (माती) आणि धान गोळा करून, तालुका स्तरावर पाठवली गेली (जेथे सर्व गावांमधील गोळा केलेली माती तालुक्यात मिसळली गेली) आणि नंतर राज्याच्या राजधानीकडे पाठवण्यात आली. हजारो अमृत कलश यात्रींसोबत राज्य स्तरावरील मृदा राष्ट्रीय राजधानीत पाठवण्यात आली. 

काल, अमृत कलश यात्रेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या संबंधित तालुका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेने त्यांच्या कलशातून आणलेली माती एका विशाल अमृत कलशात जमा करण्यात आली. पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी झालेली अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारक, देशाच्या प्रत्येक भागातून गोळा केलेल्या मातीपासून साकारले जाईल.

'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या कार्यक्रमाची सांगता म्हणून मेरी माटी मेरा देश मोहिमेची कल्पना करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 12 मार्च 2021 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला. त्यानंतर देशभरात उत्साही लोकसहभागाने दोन लाखाहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

माझा युवा भारत

‘माझा युवा भारत’ - देशातील तरुणांसाठी एकछत्री संपूर्ण सरकारी व्यासपीठ म्हणून काम करण्यासाठी एक स्वायत्त संस्था म्हणून माझा युवा भारतची स्थापना केली जात आहे. देशातील प्रत्येक तरुणांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून, माझा युवा भारत सरकारच्या संपूर्ण दृष्टिकोनातून सक्षम यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल जेणेकरून ते त्यांच्या आकांक्षा जाणू शकतील आणि 'विकसित भारताच्या' उभारणीत योगदान देऊ शकतील. माझा युवा भारतचे उद्दिष्ट तरुणांना समाज बदलाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रनिर्माते बनण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना सरकार आणि नागरिक यांच्यातील ‘युवा सेतू’ म्हणून कार्य करण्यास सक्षम करणे हे आहे. या अर्थाने ‘माझा युवा भारत’ देशातील ‘युवा नेतृत्वाच्या विकासाला’ मोठी चालना देईल.
 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Tupe/S.Patil/Sushma/Sonali K/Sonal C/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1973544) Visitor Counter : 121