गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय पोलीस अकादमीत आयपीएसच्या 75 आरआर तुकडीच्या दीक्षांत संचालनाला उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले


आपण आता झिरो टॉलरन्स धोरणाच्या पुढे जाऊन झिरो टॉलरन्स रणनीती आणि झिरो टॉलरन्स कृतीच्या दिशेने पुढे निघालो आहोत

पोलीस अधिकाऱ्यांनी देशातील गरीब आणि दुर्बल घटकांप्रती नेहमीच संवेदनशील असले पाहिजे आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाप्रती सक्रीय असले पाहिजे

Posted On: 27 OCT 2023 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई राष्ट्रीय पोलीस अकादमीत आयपीएसच्या 75 आरआर तुकडीच्या दीक्षांत संचालनाला उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले.

याप्रसंगी केलेल्या भाषणात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, या अकादमीच्या अमृत महोत्सवातील 75 व्या तुकडीला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हे अधिकारी त्यांची मेहनत, एकनिष्ठता, त्यागभावना आणि समर्पण वृत्ती या मूल्यांच्या जपणुकीतून या प्रसंगाला अधिक ऐतिहासिक बनवतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, येत्या काळात, अंतर्गत सुरक्षिततेच्या हाताळणीमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस तंत्रज्ञान अभियानाची स्थापना केली आहे. पोलिसांच्या कार्यात आणि अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न हाताळण्यात तंत्रज्ञानाचा व्यावहारिक वापर करून घेण्यासाठी तसेच पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या गुन्हेगारांच्या दोन पावले पुढे असावे यासाठी एक यंत्रणा उभारावी लागेल असे ते म्हणाले.

आज एका महिला अधिकाऱ्याला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून गौरवण्यात आले आहे आणि आपल्या देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असे अमित शाह यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की आपला देश बऱ्याच काळापासून दहशतवाद, डाव्या विचारसरणीचा जहालवाद आणि नक्षली हिंसेचा सामना करत आहे पण गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या शूर पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. ते पुढे म्हणाले की आपल्यापुढची आव्हाने अजून संपलेली नाहीत आणि आता  संघटीत गुन्हेगारी, सायबर गुन्हे, आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे, आंतरराज्यीय टोळ्या अशी अनेक नवी आव्हाने आज आपल्यासमोर उभी ठाकलेली आहेत. ते म्हणाले की आपल्याला त्याच धैर्याने अंमली पदार्थ तस्करी,क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणे, हवाला व्यवहार आणि बनावट चलनी नोटांचा व्यापार यांसारख्या आव्हानांविरुद्धचा लढा सुरुच ठेवला पाहिजे. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटीशांच्या काळापासून चालत आलेल्या सीआरपीसी, आयपीसी आणि पुरावा कायदा या तीन कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल केले असून देशाच्या संसदेपुढे त्यांनी तीन नवीन फौजदारी  कायदे ठेवले आहेत. लवकरच हे नवे कायदे मंजूर होतील आणि या कायद्यांच्या आधारावर आपली नवी गुन्हेगारीविरोधी न्यायव्यवस्था सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की ब्रिटीशांच्या काळात तयार करण्यात आलेल्या कायद्यांचे युग संपवल्यानंतर आता भारत नवा विश्वास, आशा आणि उत्सुकतेच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. ब्रिटीश सरकारच्या हितांचे रक्षण करणे हा त्या जुन्या कायद्यांचा हेतू होता तर आता जनतेच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि हे हक्क मिळण्याच्या आड येणारे सर्व अडथळे दूर करणे हा या नव्या कायद्यांचा उद्देश आहे. 

नव्या कायद्यांच्या अंतर्गत दोषसिद्धीचा दर वाढवण्यासाठी कालबद्ध योजना तयार करण्यात आली आहे असे त्यांनी पुढे सांगितले.

केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की या कायद्यांच्या माध्यमातून न्याय व्यवस्थेमध्ये देखील अनेक बदल घडवण्यात आले आहेत.केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना, ‘प्रतिक्रियात्मक आणि प्रतिसादात्मक’ पोलीस कारवाईच्या पलीकडे जाऊन ‘प्रतिबंधक, भविष्यवेधी आणि सक्रीय’ कार्यवाही करण्याची तसेच बदलत्या वातावरणात पोलीसांच्या कार्यपद्धतीत काळानुसार बदल घडवून आणण्यास देखील सांगितले.

त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना देशातील गरीब आणि दुर्बल घटकांप्रती नेहमीच संवेदनशील राहण्यास आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाप्रती सक्रीय राहण्यास सांगितले. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि प्रसिद्धीच्या मोहात न पडता पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1972114) Visitor Counter : 61