पंतप्रधान कार्यालय
गोव्यामधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
26 OCT 2023 10:44PM by PIB Mumbai
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई जी, लोकप्रिय आणि तरुण, उत्साही मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी,
व्यासपीठावर उपस्थित इतर लोकप्रतिनिधी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष भगिनी पीटी उषा जी, देशाच्या कानाकोपऱ्यामधून आलेले माझे सर्व खेळाडू मित्र, मदतनीस कर्मचारी, इतर पदाधिकारी आणि युवा मित्रांनो, भारतीय क्रीडा महाकुंभाचा प्रवास आज गोव्यात येऊन पोहोचला आहे. सगळीकडे रंग आहे...तरंग आहेत...रोमांच आहे..उत्साह आहे. गोव्याच्या हवेत असेच काहीसे आहे. आपणा सर्वांना सदतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन!
मित्रहो,
गोव्याने देशाला क्रीडा क्षेत्रातील असे अनेक चमकते तारे दिले आहेत. जिथे फुटबॉलची आवड तर गल्ली गल्लीत दिसून येते. आणि देशातील काही जुने फुटबॉल क्लब इथे आपल्या गोव्यात आहेत. अशा क्रीडा प्रेमी गोव्यामध्ये होत असलेले राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आपल्याला एक नवीन ऊर्जा देत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन अशा वेळी होत आहे, जेव्हा भारताचे क्रीडा विश्व एकामागून एक यशाची नवीन शिखरे सर करत आहे. जे 70 वर्षात घडले नाही ते आपण यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहिले आणि आता आशियाई पॅरा गेम्सही सुरू आहेत. यामध्येही भारतीय खेळाडूंनी 70 हून अधिक पदके जिंकून आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यापूर्वी जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धाही झाल्या होत्या. त्यातही भारताने नवा इतिहास घडवला. हे यश इथे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठी प्रेरणा आहे. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा एक प्रकारे तुमच्यासाठी, सर्व तरुणांसाठी, सर्व खेळाडूंसाठी एक भक्कम लॉन्चपॅड आहे. तुमच्या समोर असलेल्या अनेक संधी लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या सर्व शक्तीनिशी कामगिरी करावी लागेल. करणार ना? नक्की? जुने विक्रम मोडणार ना? माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
माझ्या युवा मित्रांनो,
भारतातील प्रत्येक गावात आणि गल्लीत प्रतिभेची कमतरता नाही. आपला इतिहास साक्षीदार आहे की, गरिबीच्या काळातही भारताने चॅम्पियन्स (सर्वोत्तम खेळाडू) घडवले आहेत. आपल्या भगिनी पीटी उषा जी माझ्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत. असे असले, तरीही प्रत्येक देशवासीयाला सतत काहीतरी उणीव भासत होती. आपला एवढा मोठा देश आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पदकतालिकेत नेहमी खूप मागे पडतो. त्यामुळे 2014 नंतर आपण एक राष्ट्रीय संकल्प म्हणून देशाची ही खंत दूर करण्याचा विडा उचलला. आम्ही क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये बदल घडवून आणले, आम्ही निवड प्रक्रियेत बदल केले, आणि ते अधिक पारदर्शक केले. खेळाडूंना आर्थिक मदत देण्यासाठीच्या योजनांमध्ये आम्ही बदल केले, आम्ही समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणला, जुना विचार, जुना दृष्टिकोन यामुळे आपल्या क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये जे अडथळे होते, त्याला एकेक करून दूर करण्याचे काम सुरु केले. सरकारने प्रतिभेचा शोध घेण्यापासून, ते त्यांना ऑलिम्पिक पोडियमपर्यंत हात धरून पोहोचवण्यापर्यंतचा पथदर्शक आराखडा तयार केला. त्याचे परिणाम आज आपण देशभर पाहत आहोत.
मित्रहो,
पूर्वीच्या सरकारांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातल्या निधीबाबत संकुचित दृष्टीकोन असायचा. लोकांना वाटायचं, की, खेळ हा खेळ असतो, खेळच तर असतो, अजून काय? यावर खर्च कशाला करायचा! आमच्या सरकारने हा दृष्टीकोनही बदलला. आम्ही क्रीडा क्षेत्राचे बजेट (अर्थसंकल्पीय तरतूद) वाढवले. यंदाचे केंद्रीय क्रीडा बजेट 9 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 3 पट अधिक आहे. खेलो इंडिया ते टॉप्स (TOPS) योजनेपर्यंत, सरकारने देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन परिसंस्था निर्माण केली आहे. या योजनांतर्गत देशभरातून शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावरून तुमच्यासारखे प्रतिभावान खेळाडू ओळखले जात आहेत. त्यांचे प्रशिक्षण, त्यांचा आहार, त्यांच्या इतर खर्चांवर सरकार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत आहे. TOPS म्हणजेच Target Olympic Podium Scheme, या अंतर्गत देशातील अव्वल खेळाडूंना जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जाते. जरा कल्पना करा, खेलो इंडिया योजनेअंतर्गत सध्या देशभरातील तीन हजार तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. खेळाडूंचा एवढा मोठा टॅलेंट पूल (प्रतिभावान समुदाय) तयार होत आहे. आणि यापैकी प्रत्येक खेळाडूला दरवर्षी 6 लाख रुपयांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती दिली जात आहे. खेलो इंडिया मोहिमेतून सुमारे 125 युवा खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला. या ठिकाणी जुनी व्यवस्था असती तर या प्रतिभेला कधीच ओळख मिळाली नसती. या प्रतिभावान खेळाडूंनी 36 पदके जिंकली आहेत. खेलो इंडिया द्वारे खेळाडूंची निवड करणे, त्यांना घडवणे आणि नंतर त्यांना TOPS द्वारे ऑलिम्पिक पोडियमपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशिक्षण आणि मनोबल देणे, हा आमचा रोडमॅप (पथदर्शक आराखडा) आहे.
माझ्या युवा मित्रांनो,
कोणत्याही देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा थेट संबंध त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीशी असतो. जेव्हा देशात निराशा आणि नकारात्मकता असते, तेव्हा मैदानावरही आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातही त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो. भारताच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची ही कथा भारताच्या एकूण यशोगाथेपेक्षा वेगळी नाही. आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि नवनवीन विक्रम नोंदवत आहे. आज भारताचा वेग आणि त्याचे प्रमाण याची स्पर्धा करणे कठीण आहे. गेल्या तीस दिवसांमधील काम आणि त्यामध्ये मिळालेले यश, यावरून भारत कसा पुढे जात आहे, याचा अंदाज येईल.
मित्रहो,
मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुमचे उज्ज्वल भविष्य कसे घडवले जात आहे, याचा अंदाज घ्या. माझ्या युवा मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, मी तुम्हाला केवळ तीस दिवसांच्या कामाबद्दल सांगतो. गेल्या तीस-पस्तीस दिवसांमध्ये काय झाले, आणि हा वेग आणि या प्रमाणात देश पुढे जात राहिला, तर तुमच्या उज्ज्वल भविष्याची मोदींची हमी पक्की आहे.
गेल्या 30-35 दिवसांमध्येच,
- नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा झाला.
- गगनयानशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
- भारताला पहिली प्रादेशिक रॅपिड रेल्वे नमो भारत मिळाली.
- बेंगळुरू मेट्रो सेवेचा विस्तार झाला.
- जम्मू-काश्मीरमध्ये पहिली विस्टाडोम रेल्वे सेवा सुरू झाली.
- या 30 दिवसांत दिल्ली-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन झाले.
- भारतात G-20 देशांचे खासदार आणि वक्त्यांची परिषद झाली.
- भारतात जागतिक सागरी परिषद झाली, यामध्ये 6 लाख कोटी रुपयांचे करार झाले.
- इस्रायलमधून भारतीयांना मायदेशी परत घेऊन येण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आले.
- 40 वर्षांनंतर भारत आणि श्रीलंके दरम्यान प्रवासी जलमार्ग सेवा सुरू झाली.
- युरोपला मागे टाकत भारत 5G वापरकर्त्यांच्या बाबतीत जगातील टॉप-3 देशांमध्ये पोहोचला.
- अॅपल पाठोपाठ गुगलनेही मेड इन इंडिया स्मार्टफोन बनवण्याची घोषणा केली.
- आपल्या देशाने अन्न आणि फळ-भाजीपाला उत्पादनात नवा विक्रम नोंदवला.
मित्रहो,
या तर फक्त अर्ध्याच गोष्टी आहेत. माझ्याकडे सांगण्यासारखे अजून बरेच काही आहे. महाराष्ट्रातील नळवंडे धरणाचे भूमिपूजन आजच मी केले, जे गेली 50 वर्षे रखडले होते..
- गेल्या 30 दिवसांत तेलंगणमध्ये 6 हजार कोटी रुपये मूल्याच्या सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचे लोकार्पण झाले.
- छत्तीसगडमध्ये बस्तर येथे 24 हजार कोटी रुपये मूल्याच्या आधुनिक स्टील प्लांटचे लोकार्पण झाले.
- राजस्थानमध्ये मेहसाणा-भटिंडा-गुरदासपूर गॅस पाइपलाइनच्या एका भागाचे लोकार्पण झाले.
- जोधपूरमध्ये नवीन विमानतळ टर्मिनल इमारत आणि आयआयटी कॅम्पसची पायाभरणी आणि लोकार्पण झाले.
-गेल्या 30 दिवसांत महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
- काही दिवसांपूर्वी गुजरातच्या धोरडोला सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कार मिळाला होता.
- जबलपूरमध्ये वीरांगना राणी दुर्गावती स्मारकाचे भूमिपूजन झाले.
- हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी हळद उत्पादक मंडळाची घोषणा करण्यात आली.
- तेलंगण येथे केंद्रीय आदिवासी विद्यापीठाला मान्यता मिळाली.
- मध्य प्रदेशमध्ये सव्वा दोन लाख गरीब कुटुंबांना पीएम आवास योजनेअंतर्गत घरे मिळाली.
- याच 30 दिवसांत पीएम स्वानिधी योजनेच्या लाभार्थींची संख्या 50 लाखांवर पोहोचली आहे.
- आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 26 कोटी कार्ड तयार होण्याचा टप्पा ओलांडला.
- आकांक्षी जिल्ह्यांनंतर, देशात आकांक्षी गटांच्या विकासाची मोहीम सुरू झाली.
- गांधी जयंतीला दिल्लीतील खादीच्या एका दुकानात दीड कोटी रुपये मूल्याची विक्री झाली.
आणि मित्रहो,
या 30 दिवसांत क्रीडा विश्वातही बरेच काही घडले आहे.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 पेक्षा जास्त पदके जिंकली.
- 40 वर्षांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सत्र झाले.
- उत्तराखंडला हॉकी अॅस्ट्रो-टर्फ आणि वेलोड्रोम स्टेडियम मिळाले.
- वाराणसी येथील आधुनिक क्रिकेट स्टेडियमचे काम सुरू झाले.
- ग्वाल्हेरला अटल बिहारी वाजपेयी दिव्यांग क्रीडा केंद्र मिळाले.
- आणि आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होत आहेत.
फक्त 30 दिवस, माझ्या युवा मित्रांनो, विचार करा, फक्त 30 दिवसात झालेल्या कामांची ही यादी खूप मोठी आहे. मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवली आहे. आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व वेगाने काम केले जाते आहे, देशाच्या प्रत्येक भागात प्रत्येकजण विकसित भारताच्या उभारणीत व्यस्त आहे.
मित्रहो,
माझ्या देशाया युवा वर्गा, माझ्या भारताचे युवा, या सर्व कामांच्या केंद्रस्थानी आहेत. आज भारतातील युवा वर्गात अभूतपूर्व आत्मविश्वास भरलेला आहे. भारतातील युवा वर्गाच्या याच आत्मविश्वासाची सांगड राष्ट्रीय संकल्पांशी घालण्याचे आणखी एक मोठे काम अलीकडेच करण्यात आले आहे. मेरा युवा भारत, इथे तुम्हाला सर्वत्र फलक दिसले आहेत, माय युवा भारत, अर्थात MY भारत या नावाने नवीन व्यासपीठाला मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरातील, म्हणजेच देशाच्या सर्व भागांतील युवा वर्गाला एकमेकांशी आणि सरकारशी जोडणारा हा मंच एकात्मिक केंद्र अर्थात ‘वन स्टॉप सेंटर’ असेल, ज्याच्या माध्यमातून त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देता येतील. हे केंद्र, भारतातील युवा शक्ती विकसित करण्याचे, या शक्तीला भारताची शक्ती बनविण्याचे माध्यम होईल. येत्या काही दिवसांनी, 31 ऑक्टोबर रोजी, एकता दिनानिमित्त, मी MY भारत मोहिम सुरू करणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आम्ही देशभरात ‘रन फॉर युनिटी’ हा मोठा कार्यक्रम आयोजित करतो, हे देशवासियांना माहिती आहेच. देशाच्या एकात्मतेसाठी 31 ऑक्टोबर रोजी गोव्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात रन फॉर युनिटीचा भव्य कार्यक्रम व्हावा, असे मला वाटते. या मोहिमेत तुम्ही सर्वजण नक्कीच सहभागी व्हा.
मित्रहो,
आज भारताचा संकल्प आणि प्रयत्न दोन्ही खूप मोठे आहेत, अशा वेळी भारताच्या आकांक्षाही उत्तुंग असणे स्वाभाविक आहे. म्हणूनच आयओसीच्या अधिवेशनात मी 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा समोर ठेवल्या आहेत. भारत 2030 साली युवा ऑलिम्पिक आणि 2036 साली ऑलिंपिक आयोजित करण्यास तयार असल्याची ग्वाही, मी ऑलिम्पिकच्या सर्वोच्च समितीला दिली आहे.
मित्रहो,
ऑलिम्पिक आयोजनाची आमची आकांक्षा केवळ भावनांपुरती मर्यादित नाही. खरे तर यामागे काही ठोस कारणे आहेत. 2036 पर्यंत, म्हणजे आजपासून सुमारे 13 वर्षांनंतर, भारत जगातील आघाडीच्या आर्थिक सत्तांपैकी एक असेल. तोपर्यंत प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न आजच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असेल. तोपर्यंत भारतात खूप मोठा मध्यमवर्ग असेल. खेळापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत भारताचा तिरंगा अधिक अभिमानाने फडकत असेल. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी जोडणी आणि इतर आधुनिक पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. आज भारत आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटीपेक्षा जास्त खर्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसुद्धा आमच्यासाठी तितकेच सोपे होणार आहे.
मित्रहो,
आपल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा ‘एक भारत, सर्वोत्तम भारत’चे प्रतीक आहेत. भारतातील प्रत्येक राज्याला आपली क्षमता दाखवण्यासाठी हे फार मोठे माध्यम आहे. यावेळी गोव्याला ही संधी मिळाली आहे. गोवा सरकार आणि गोव्यातील जनतेने ज्या प्रकारची तयारी केली आहे, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. येथे निर्माण करण्यात आलेल्या क्रीडासंबंधी पायाभूत सुविधा गोव्यातील युवा वर्गाला पुढच्या अनेक दशकांसाठी उपयुक्त ठरेल. भारताला येथून अनेक नवे खेळाडू मिळतील. त्यामुळे येथे जास्तीत जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यात जोडणीशी संबंधित आधुनिक पायाभूत सुविधाही विकसित झाल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे गोव्यातील पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.
मित्रहो,
गोवा, गोवा तर सणांसाठी, उत्सवांसाठी ओळखला जातो. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची चर्चा आता जगभरात होऊ लागली आहे. आमचे सरकार गोव्याला आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठका आणि शिखर परिषदांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करते आहे. 2016 साली आम्ही गोव्यात ब्रिक्स परिषद आयोजित केली होती. G-20 शी संबंधित अनेक महत्त्वाच्या बैठका गोव्यातही झाल्या आहेत. जागतिक पर्यटनाच्या शाश्वत विकासासाठी, पर्यटनासाठी गोवा रोडमॅप जी-20 देशांनी एकमताने स्वीकारला आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. गोव्यासाठी ही अभिमानाची बाब आहेच, आणि त्याचबरोबर भारताच्या पर्यटनासाठीही फार मोठी गोष्ट आहे.
मित्रहो,
क्षेत्र कोणतेही असो, आव्हान कोणतेही असो, आपण प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करायची असते. ही संधी आपण गमवायची नाही. या आवाहनासह, मी सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा करतो. तुम्हा सर्व खेळाडूंना पुन्हा खूप खूप शुभेच्छा. गोवा तयार आहे! गोंय आसा तयार! Goa is ready ! अनेकानेक आभार.
*********
NM/Rajashree/Madhuri/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1971866)
Visitor Counter : 271
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam