गृह मंत्रालय
'पोलीस स्मृती दिना'निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
21 OCT 2023 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
'पोलीस स्मृती दिना'निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आणि केंद्रीय गृह सचिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या भाषणात शाह यांनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि सीमांच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या 36,250 पोलिस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना सांगितले की आज भारत जगात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि त्याचा पाया त्यांच्या कुटुंबांतील शहीद जवानांचे बलिदान आहे आणि हा देश त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही.
देशाच्या सेवेत कार्यरत आपली सर्व पोलीस दले त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आपल्या कुटुंबापासून दूर व्यतित करतात आणि आपल्या शौर्य आणि बलिदानाद्वारे देशाचे रक्षण करतात. गेल्या एका वर्षात 1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत देशाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 188 पोलिसांनी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळाची घोषणा दिली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यापासून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतची ही 25 वर्षे देशाला प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानावर नेण्यासाठी आहेत, असे ते म्हणाले. यासाठी देशातील 130 कोटी जनतेने सामूहिक आणि वैयक्तिकरित्या संकल्प केला आहे आणि या संकल्पांमुळे आपल्याला जगात प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. गेल्या दशकात आपल्या शूर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे दहशतवाद, अतिरेकी हल्ले, नक्षलवाद आणि हिंसाचाराचे प्रमाण 65 टक्क्यांनी कमी झाले आहे असे शाह म्हणाले.
दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण कायम ठेवत मोदी सरकारने कठोर कायदे केले आहेत आणि पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी पोलिस तंत्रज्ञान मोहिम हाती घेऊन जगातील सर्वोत्तम दहशतवादविरोधी दल बनण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे गृहमंत्री म्हणाले. पोलीस कर्मचार्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने आयुष्मान-सीएपीएफ, गृहनिर्माण योजना, सीएपीएफ ई-आवास वेब पोर्टल, पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना, केंद्रीय सानुग्रह अनुदान, दिव्यांगांसाठी सानुग्रह योजना, हवाई कुरिअर सेवा आणि केंद्रीय पोलीस कल्याण स्टोर्समध्ये कालानुरूप बदल केले आहेत असे शाह म्हणाले.
अमित शहा म्हणाले की पोलीस स्मारक हे केवळ प्रतिक नाही तर ते राष्ट्र उभारणीसाठी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बलिदान आणि समर्पणाची ओळख आहे. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
* * *
M.Pange/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969824)
Visitor Counter : 134