पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली कॉरिडॉरचे उद्घाटन आणि नमो भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 20 OCT 2023 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2023

 

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय, 

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय, ऊर्जावान मुख्यमंत्री भाई योगी आदित्यनाथ जी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी जी, वी के सिंह जी, कौशल किशोर जी, इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या कुटुंबीयांनो,

आज संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. आज भारताची पहिली रॅपिड रेल्वे सेवा,नमो भारत ट्रेन,राष्ट्राला समर्पित करण्यात येत आहे, या गाडीचा प्रारंभ झाला आहे. साधारणपणे चार वर्षांपूर्वी मी दिल्ली - गाझियाबाद - मेरठ प्रादेशिक कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते.आज साहिबाबाद ते दुहाई डेपो पर्यंत नमो भारतचे संचालन सुरू झाले आहे. ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन आम्ही करतो त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो हे मी याआधीही सांगितले आहे आणि आजही सांगत आहे.हा मेरठचा टप्पा दीड वर्षांनी पूर्ण होईल त्या वेळीही मी आपल्या सेवेसाठी उपस्थित असेन.

या अत्याधुनिक गाडीचा प्रवास मी आत्ताच अनुभवला.माझे  बालपण रेल्वे फलाटावर व्यतीत केले आहे आणि रेल्वेचे हे नवे रूप मला सर्वात जास्त आनंद देत आहे. हा अनुभव प्रफुल्लित करणारा आहे, आनंददायी आहे.आपल्याकडे नवरात्रीमध्ये शुभ कार्याची परंपरा आहे. देशाच्या पहिल्या नमो भारत रेल्वेलाही आज कात्यायनी मातेचे आशीर्वाद मिळाले आहेत.विशेष म्हणजे या नव्या गाडीच्या सर्व कर्मचारी महिला आहेत, आपल्या देशाच्या कन्या आहेत. देशाच्या स्त्री शक्तीच्या वाढत्या सामर्थ्याचे हे प्रतिक आहे. नवरात्रीच्या या पवित्र पर्वात मिळालेल्या या भेटीसाठी दिल्ली एनसीआर आणि पश्चिम उत्तरप्रदेशच्या सर्व लोकांचे  मी खूप-खूप अभिनंदन करतो, अनेक-अनेक शुभेच्छा देतो. नमो भारत गाडीमध्ये आधुनिकता आहे आणि प्रचंड वेगही आहे. ही नमो भारत गाडी, नव भारताच्या नव्या वाटचालीची  आणि नव्या संकल्पांची प्रचीती देत आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

भारताचा विकास हा राज्यांच्या विकासातूनच शक्य आहे असे मी कायमच म्हणत आलो आहे. आज यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या जी हेही आपल्यासमवेत जोडले गेले आहेत.आज बेंगळूरूमध्ये मेट्रोच्या 2 मार्गांचेही राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. यामुळे बेंगळूरूच्या माहिती तंत्रज्ञान केंद्राची कनेक्टीव्हिटी अधिक उत्तम झाली आहे.आता तर बेंगळूरूमध्ये दररोज सुमारे 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करत आहेत.नव्या मेट्रो सुविधेसाठी मी बेंगळूरूच्या सर्व लोकांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

21 व्या शतकातला आपला भारत आज प्रत्येक क्षेत्रात,प्रगतीची नवी गाथा लिहित आहे. आजचा भारत, चंद्रावर चंद्रयान उतरवून संपूर्ण जगात हिंदुस्तानचा दबदबा निर्माण करतो.आजचा भारत म्हणजे जी-20 चे शानदार आयोजन करून, जगासाठी आकर्षणाचा, उत्सुकतेचा आणि जगाला भारतासमवेत जोडले जाण्यासाठी एक नवी संधी ठरला आहे. आजचा भारत आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पेक्षा जास्त पदकांची कमाई करून दाखवतो आणि यात माझ्या  उत्तर प्रदेशचाही समावेश असतो.आजचा भारत स्वबळावर 5 जी सुरु करून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्याचा विस्तार करतो.आजचा भारत जगातले सर्वाधिक  डिजिटल व्यवहार करतो.  

कोरोनाचे संकट आले तेव्हा भारतात तयार झालेल्या लसीनी,जगभरातल्या कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले.मोठ-मोठ्या कंपन्या मोबाईल,टीव्ही, लॅप टॉप,संगणक निर्मितीसाठी आज भारतात येत आहेत. आज भारत लढाऊ विमानांची निर्मिती करतो, लढाऊ विमानांच्या बरोबरच सागरात तिरंगा फडकवणाऱ्या  विक्रांत जहाजाचीही निर्मिती करतो. आज ही वेगवान नमो भारत सुरु झाली आहे ना तीसुद्धा मेड इन इंडियाच आहे, भारताची आपली गाडी आहे. हे ऐकून अभिमान वाटतो की नाही ? प्रत्येक हिंदुस्तानीला उज्वल भविष्य दिसत आहे की नाही ?माझ्या युवकांचे उज्वल भविष्य दिसत आहे की नाही ? आताच फलाटावर ज्याचे लोकार्पण झाले ती स्क्रीन डोर प्रणालीही मेक इन इंडियाच आहे. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो, आपण हेलिकॉप्टरने प्रवास करतो, पंतप्रधानांचे हे  हेलिकॉप्टरआहे ना, त्याचा इतका आवाज येतो जसा  हवाई ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरपेक्षाही जास्त आवाज येतो.कान बंद करावे लागतात.विमानात जो आवाज येतो ना,मी आज पाहिले नमो भारत गाडीमध्ये विमानापेक्षाही कमी आवाज आहे,किती सुखकर प्रवास आहे.

मित्रहो,

नमो भारत, भविष्यातल्या भारताची झलक आहे,देशाचे आर्थिक सामर्थ्य वाढल्यानंतर आपल्या देशाचे चित्र कसे बदलते याचे प्रमाण म्हणजे नमो भारत  आहे.दिल्ली आणि मेरठचा हा  80 किलोमीटरपेक्षा जास्त पट्टा म्हणजे केवळ सुरवात आहे,ही तर एक सुरवात आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश,हरियाणा आणि राजस्थान यांचे अनेक भाग नमो भारत गाडीने जोडले जाणार आहेत. आता मी राजस्थानचे नाव घेतले तर अशोक गेहलोत यांची झोप उडेल.येत्या काळात देशाच्या आणखी भागातही नमो भारत सारखी प्रणाली सुरु होईल. यातून औद्योगिक विकासही साध्य होईल आणि माझ्या देशाच्या युवा पिढीसाठी,माझ्या देशाच्या तरुण मुला-मुलींसाठी रोजगाराच्या नव-नव्या संधीही निर्माण होतील.  

मित्रहो,

या शताब्दीचे हे तिसरे दशक भारतीय रेल्वेच्या कायापालटाचे दशक आहे.मित्रहो,आपण पहात आहात या दहा वर्षात संपूर्ण रेल्वेमध्ये आपल्याला बदल झालेला आढळेल आणि मला छोटी स्वप्ने पहायची सवय नाही आणि रखडत-रखडत चालण्याचीही सवय नाही. मी आजच्या युवा पिढीला विश्वास देऊ इच्छितो, युवा पिढीला हमी देऊ इच्छितो की या दशकाच्या अखेरीपर्यंत आपल्याला भारताच्या रेल्वे, जगाच्या तोडीस तोड झालेल्या आढळतील. सुरक्षा असो, सिविधा असो, सामंजस्य असो, सामर्थ्य असो भारतीय रेल्वे संपूर्ण जगभरात नवे स्थान प्राप्त करेल. भारतीय रेल्वे शंभर टक्के विद्युतीकरणाच्या उद्दिष्टापासून फार दूर नाही.आज नमो भारत सुरु झाली आहे. त्याआधी वंदे भारतच्या रूपाने देशाला आधुनिक रेल्वेगाड्या मिळाल्या. अमृत भारत स्थानके अभियानाअंतर्गत देशातली रेल्वे स्थानके आधुनिक करण्याचे काम झपाट्याने सुरु आहे. अमृत भारत,वंदे भारत आणि नमो भारत यांची ही त्रिवेणी या दशकाच्या अखेरीला भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे प्रतिक ठरतील.

आज देशात मल्टीमोडल वाहतूक व्यवस्थेवरही अतिशय वेगाने काम सुरु आहे.म्हणजेच प्रवासाच्या वेगवेगळ्या माध्यमांना परस्परांशी जोडले जात आहे.या नमो भारत गाडीमध्येही मल्टीमोडल कनेक्टीव्हिटीकडे लक्ष पुरवण्यात आले आहे.दिल्लीच्या सराए काले खां, आनंद विहार, गाझियाबाद आणि  मेरठ इथे कुठे रेल्वे,कुठे बस स्थानके तर कुठे मेट्रो स्थानकांशी ही गाडी जोडली गेली आहे. गाडीतून उतरल्यानंतर तिथून घर किंवा कार्यालय गाठण्यासाठी दुसरे कोणते साधन शोधण्याची आपल्याला आता चिंता नसेल.

माझ्या कुटुंबियांनो,

बदलत्या भारतासाठी सर्व देशवासीयांचे जीवनमान उंचावण्याची, जीवनाचा दर्जा अधिक सुधारण्याचीही आवश्यकता आहे.लोकांना मोकळी आणि स्वच्छ  हवा मिळावी, कचऱ्याचे  ढीग नष्ट व्हावेत, प्रवासाची उत्तम साधने उपलब्ध असावीत, उपचाराची उत्तम व्यवस्था असावी या सर्वांवर आज भारत सरकार विशेष लक्ष पुरवत आहे.  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर तर आज भारत जितका खर्च करत आहे तितका यापूर्वी कधीच झाला नव्हता.

मित्रहो,

प्रवासासाठी,वाहतुकीसाठी आम्ही पाणी, जमीन, आकाश आणि अंतराळ प्रत्येक दिशेने प्रयत्न करत आहोत.जल वाहतुकीकडेच पहा ना, आज देशातल्या नद्यांमध्ये 100 पेक्षा जास्त जलमार्ग तयार होत आहेत. यामध्ये सर्वात मोठा जल मार्ग गंगा मातेच्या जल प्रवाहात तयार होत आहे. बनारसपासून ते हल्दिया पर्यंत गंगा नदीवर जहाजांसाठी अनेक जल मार्ग टर्मिनल तयार करण्यात आले आहेत.यामुळे शेतकरी जल मार्गानेही अन्न-धान्य, फळे, भाज्या दुसरीकडे पाठवू शकत आहेत.जगात सर्वात जास्त लांबी असलेल्या गंगा विलास या रिव्हर क्रुझने 3200 किलोमीटर अंतराचा प्रवास करून नुकताच विक्रम केला आहे. आज देशात समुद्र किनाऱ्यांवरही बंदर पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार होत आहे, आधुनिकीकरण होत आहे. याचा लाभ कर्नाटकसारख्या राज्यांनाही होत आहे. जमिनी वाहतुकीबाबत बोलायचे झाले तर आधुनिक रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी भारत सरकार 4 लाख कोटी रुपयांहून जास्त खर्च करत आहे.नमो भारतसारख्या रेल्वेगाड्या असोत किंवा मेट्रो गाड्या यावरही 3 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे.

मागच्या काही वर्षात मेट्रो मार्गांचा कसा विस्तार झाला आहे हे दिल्ली एनसीआर मध्ये राहणारे लोक जाणतात.उत्तर प्रदेशात आज नोएडा, गाझियाबाद, लखनौ, मेरठ, आग्रा, कानपूर यासारख्या शहरांमध्ये मेट्रोचा प्रारंभ होऊ लागला आहे, काही ठिकाणी मेट्रो आली आहे काही ठिकाणी लवकरच येणार आहे.कर्नाटकमधेही बेंगळूरू असो, मैसुरु असो, मेट्रो धावणाऱ्या शहरांच्या संख्येत वाढ होत आहे.

नभ म्हणजेच आसमंतातही भारत अवकाशातही आपले पंख तितकेच फैलावत आहे. आम्ही हवाई चप्पल घालणाऱ्यांसाठी देखील हवाई प्रवास सुलभ बनवत आहोत. गेल्या 9 वर्षात देशात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. गेल्या काही कालावधीत आपल्या एयरलाईन्स कंपन्यांनी भारतात 1 हजारांहून अधिक नव्या विमानांची मागणी नोंदवली आहे. याचप्रकारे आपण अवकाशातही आपली पावले जलद गतीने टाकत आहोत. नुकतेच आपल्या चांद्रयानाने चंद्रावर आपला तिरंगा ध्वज फडकवला आहे. आपण वर्ष 2040 पर्यंतचा पक्का मार्गदर्शक आराखडा तयार केलेला आहे. काही काळानंतर आपले गगनयान भारतीयांना घेऊन अवकाशात झेपावणार आहे. मग आपण अवकाशात आपले अंतराळ स्थानक स्थापित करु. तो दिवस दूर नाही जेव्हा आपण आपल्या अंतराळ यानातून पहिला भारतीय चंद्रावर उतरवू. आणि हे सर्व कोणासाठी केले जात आहे ? हे देशातील युवकांसाठी केले जात आहे, त्यांचे भविष्य उज्वल बनवण्यासाठी केले जात आहे. 

मित्रांनो, 

चांगल्या हवेसाठी शहरांमधील प्रदूषण कमी होणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक बसचे देखील मोठे जाळे तयार केले जात आहे. केंद्र सरकारने राज्यांना 10 हजार इलेक्ट्रिक बस देण्याची योजना सुरू केली आहे. भारत सरकारने राजधानी दिल्लीमध्ये 600 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली असून त्यातून 1300 हून अधिक इलेक्ट्रिक बस चालवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. यापैकी 850 हून अधिक इलेक्ट्रिक बस दिल्लीमध्ये रस्त्यावर धावण्याची सुरुवात झाली आहे. याचप्रमाणे बंगळुरू शहरात देखील 1200 हुन अधिक इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी भारत सरकार 500 कोटी रुपयांची मदत पुरवत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश असो की कर्नाटक, प्रत्येक शहरात आधुनिक आणि हरित सार्वजनिक वाहतूक सेवेला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. 

मित्रांनो 

आज भारतात ज्या पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे त्यात नागरिकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. काम करण्याच्या उद्देशाने कार्यालयात जाणाऱ्या व्यक्तींसाठी मेट्रो किंवा नवभारत रेल्वे यासारख्या पायाभूत सुविधा फार महत्त्वपूर्ण आहेत. ज्यांच्या घरी छोटी मुले आहेत किंवा वयस्कर आई वडील आहेत, या सुविधेमुळे त्यांचा वेळ वाचेल तसेच त्यांना आपल्या कुटुंबीयांबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करतात येईल. जेथे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत त्या भागात मोठ्या कंपन्या येतील आणि मोठे उद्योग सुरू होऊन रोजगार निर्मिती होईल याची युवकांना हमी मिळते. एखाद्या व्यापाऱ्याला चांगली हवाई वाहतूक आणि चांगले रस्ते असतील तर त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचणे सुलभ होते. चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे अनेक प्रकारचे व्यापार आणि उद्योग एका जागी सुरू होऊ लागतात आणि यांचा लाभ सर्वांनाच होतो. मेट्रो किंवा आरआरटीएस सारख्या पायाभूत सुविधांमुळे एखाद्या नोकरी करणाऱ्या महिलेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते. त्या केवळ आपल्या कार्यालयात सुरक्षित पोहचतात असे नाही तर त्यांच्या पैशांची देखील बचत होत आहे. 

जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढते तेव्हा उपचारांच्या प्रतिक्षेत असलेले रुग्ण आणि डॉक्टर बनण्याची आकांक्षा बाळगून असणारे युवक या दोहोंचाही फायदा होतो. जेव्हा डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास होतो तेव्हा सर्वात गरीब व्यक्तीला देखील त्याचे हक्काचे पैसे थेट त्याच्या बॅंक खात्यावर दिले जातात. जेव्हा नागरिकांना सगळ्या प्रकारच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध होतात तेव्हा त्यांना कार्यालयात खेटे घालण्यापासून मुक्ती मिळते. आता थोड्या वेळापूर्वी मी जी युपीआय द्वारे तिकीट काढण्याची मशीन पाहिली ती देखील तुमच्या सुविधेत भर घालणारी आहे. अशा प्रकारे गेल्या एका दशकात सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व कार्य झाले आहे. यामुळे लोकांचे जीवन सोपे बनले आहे आणि त्यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. 

माझ्या कुटुंबीयांनो, 

हा सणासुदीचा काळ आहे. हा आनंदाचा काळ आहे. देशातील माझे प्रत्येक कुटुंब हे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे करु शकेल यासाठी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, कर्मचाऱ्यांना फायदा होईल, निवृत्ती वेतनधारक बंधू भगिनींना होईल. भारत सरकारने रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत घसघशीत वाढ केली आहे. मसूर डाळीच्या किमान आधारभूत किमतीत सव्वा चारशे रुपये प्रति क्विंटल, मोहरीच्या किमतीत दोनशे रुपये प्रति क्विंटल, तर गव्हाच्या किमतीत दीडशे रुपये प्रति क्विंटल इतकी वृद्धी करण्यात आली आहे. यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा येईल. वर्ष 2014 मध्ये गव्हाची किमान आधारभूत किंमत चौदाशे रुपये प्रतिक्विंटल इतकी होती जी आता दोन हजाराहून अधिक झाली आहे. मसूर डाळीची किमान आधारभूत किंमत तर गेल्या नऊ वर्षात दुपटीहून अधिक वाढवण्यात आली आहे. मोहरीची किमान आधारभूत किंमत देखील या काळात 2600 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढवण्यात आली आहे. ही भाववाढ शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी गुंतवावे लागलेल्या पैशांपेक्षा दीडपट अधिक समर्थन मूल्य मिळवून देण्याची आमची वचनबद्धता दर्शवणारी आहे. 

मित्रांनो,

केंद्र सरकार शेतकऱ्यांना युरियासह इतर सर्व खते अल्प दरात उपलब्ध करून देत आहे. जगातल्या इतर अनेक देशांमध्ये युरियाची एक गोणी 3 हजार रुपयांमध्ये विकली जाते, ती भारतात मात्र तीनशे रुपये इतक्या अल्प दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते आहे. हा आकडा लक्षात राहील ना तुमच्या ? नक्कीच राहील. याचा लाभ उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना, कर्नाटकातील शेतकऱ्यांना, देशभरातील शेतकऱ्यांना होत आहे. यावरही भारत सरकार एका वर्षात अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करत आहे. माझ्या शेतकरी बांधवांना चढ्या दरात युरिया खरेदी करावा लागू नये यासाठी सरकारच्या तिजोरीतून हे अडीच लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. 

मित्रांनो, 

पिकांची कापणी केल्यानंतर जो कचरा शिल्लक राहतो, तांदूळाच्या साळीचा भूसा असो किंवा किंवा वाळलेली ताटे असो ती वाया जाऊ नयेत, त्यापासूनही आपल्या शेतकऱ्यांना उत्पन्न मिळावे यावरही आपले सरकार काम करत आहे. यासाठी संपूर्ण देशात जैवइंधन आणि इथेनॉल निर्मितीसाठी प्रकल्प उभारले जात आहेत. 9 वर्षे पूर्वीच्या तुलनेत आज देशात 10 पटीने अधिक इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. आजवरच्या या इथेनॉल निर्मितीतून आतापर्यंत संपूर्ण देशात सुमारे 65 हजार कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत. केवळ गेल्या दहा महिन्याच्या कालावधीतच एकूण 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. आणि त्यातही जर मेरठ गाजियाबाद या क्षेत्रातील शेतकऱ्यांबद्दल सांगायचे झाले तर येथे इथेनॉल साठी या वर्षातील केवळ दहा महिन्यांमध्ये 300 कोटी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. इथेनॉलचा वापर ज्याप्रकारे मालवाहतुकीसाठी केला जात आहे त्याचा आपल्या मेरठ गाजियाबाद मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विशेष लाभ होत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाक्यांची समस्या कमी करण्यासाठी मदत होत आहे. 

मित्रांनो, 

सणासुदीच्या या हंगामाची सुरुवात, आणि याच हंगामात भारत सरकारने बहीणी आणि लेकींनाही उपहार दिला आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थी भगिनींसाठी गॅस सिलेंडर 500 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. देशातील 80 कोटींहून अधिक कुटुंबांना निरंतर मोफत अन्नधान्य वाटप केले जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना 4 टक्के महागाई भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे विभागातील आपले जे गट ब आणि गट क चे लाखो अराजपत्रित कर्मचारी आहेत, त्यांनी दिवाळीचा बोनस देखील देण्यात आला आहे. शेतकरी आणि कर्मचारी वर्गाजवळ हे जे अतिरिक्त हजारो कोटी रुपये पोहचणार आहेत त्यांचा लाभ संपूर्ण समाजाला होणार आहे. या पैशातून जी खरेदी केली जाईल, त्यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य संचारेल आणि व्यापारात आणखी वृद्धी होईल. 

माझ्या कुटुंबीयांनो,

जेव्हा असे संवेदनशील निर्णय घेतले जातात तेव्हा प्रत्येक कुटुंबात सणाचा आनंद आणखी वृद्धिंगत होतो. आणि जेव्हा देशातील प्रत्येक कुटुंब आनंदी असते, जर तुम्ही हा सणांचा काळ आनंदात जल्लोषात साजरा केला तर मला सर्वात जास्त आनंद होतो. माझा सण या आनंदात आपसूक साजरा होतो.

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

तुम्हीच माझे कुटुंब आहात, म्हणूनच मी आपल्याला प्राधान्य देतो. हे कार्य तुमच्यासाठीच केले जात आहे. तुम्ही सुखी असाल, तुम्ही प्रगती कराल तरच देश प्रगती करेल, तुम्ही सुखी राहीलात तरच मला सुख मिळेल. तुम्ही समर्थ असाल तरच देश सामर्थ्यवान बनेल.

आणि बंधू भगिनींनो,

मी आज तुम्हाला काही मागू इच्छितो, मी आज तुम्हाला काही मागू इच्छितो, द्याल ना ? असा खालच्य पट्टीतील आवाज चालणार नाही. मी आज तुम्हाला काही मागू इच्छितो, द्याल ना ? हात वर करून सांगा की नक्की द्याल. असे आहे पहा, कोणी गरीब असले तरीही त्यांच्याकडे स्वतःची सायकल असतेच. ते ती सायकल व्यवस्थित ठेवत असतील की नाही, सायकलची साफसफाई करत असतील की नाही. सांगा ना, करत असतील की नाही ? जर तुमच्याकडे स्कुटर असेल तर सकाळी उठल्याबरोबर स्कुटरला बरोबर, ठीकठाक ठेवता की नाही, तिची साफसफाई करता की नाही करत , तुमची स्कुटर चांगली राहावी, हे चांगले वाटते ना ? मग या ज्या नवनवीन प्रकारच्या रेल्वे येत आहेत, त्या कोणाच्या आहेत, कोणाच्या आहेत, कोणाच्या आहेत, मग त्यांना सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे, सांभाळाल ना. त्यावर एक चरा देखील यायला नको, आपल्या नवे रेल्वेवर एक चरा देखील यायला नको. तिला आपण आपल्या गाडीप्रमाणे सांभाळले पाहिजे, सांभाळाल ना, सांभाळाल ना? तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नमो भारत रेल्वे निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद !

माझ्याबरोबर सर्व ताकदीनिशी म्हणा - 

भारत माता की जय !

भारत माता की जय !

भारत माता की जय !

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

S.Tupe/Nilima/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969816) Visitor Counter : 136