माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 69 वे  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान


महिला या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ बनत असल्याचे वहिदा रेहमान हे उदाहरण-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोणताही आशय  प्रादेशिक नसतो   ,उत्तम  प्रादेशिक आशय  जागतिक प्रेक्षक मिळवतोच :   अनुराग ठाकूर

पायरसीविरुद्धच्या लढ्यात सरकार चित्रपट उद्योगासोबत, एव्हीजीसीबाबत लवकरच धोरण:  ठाकूर

Posted On: 17 OCT 2023 6:10PM by PIB Mumbai


नवी दिल्लीत आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज  विविध श्रेणींमधील  2021 साठीचे  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले. यावेळी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार   वहिदा रेहमान यांना प्रदान करण्यात आला.  केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री   अनुराग सिंह ठाकूर, केंद्रीय  माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, माहिती  आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, परीक्षक मंडळाचे  अध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी   वहिदा रेहमान यांचे अभिनंदन केले आणि  वहिदा रेहमान आपल्या कला आणि व्यक्तिमत्वाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करत  चित्रपटसृष्टीमध्ये  शिखरावर पोहोचल्या असे गौरोवोद्गार राष्ट्रपतींनी काढले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी स्वाभिमान ,आत्मविश्वास असलेली स्त्री म्हणून आपला ठसा उमटवला होता. त्यांनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यात त्यांच्या भूमिकांनी विशेषत: स्त्रियांशी संबंधित अनेक बंधने तोडली होती . महिला सक्षमीकरणासाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा, असा आदर्श वहीदाजींनी घालून दिला आहे., असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, हा पुरस्कार सोहळा भारतातील विविधतेचे आणि एकात्मतेचे चित्र रंगवतो. सोहळ्याला  उपस्थित प्रतिभावान लोकांनी अनेक भाषा, प्रादेशिक वैशिष्ट्ये, सामाजिक आस्था , कामगिरी  आणि समस्यांना सार्थ अभिव्यक्ती दिली आहे आणि हे  सर्व पिढ्यांमधील आणि श्रेणींमधील लोक   राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये एकत्र आले आहेत, असे त्या  म्हणाल्या. .

चित्रपट उद्योग  आणि कलाकार हे परिवर्तन घडवणारे आहेत  असे सांगत , भारतीय समाजातील वैविध्यपूर्ण वास्तवाचा जिवंत परिचय ते त्यांच्या चित्रपटांमधून करून देतात असे त्या म्हणाल्या.

भारतासारख्या प्रतिभासंपन्न देशात, चित्रपटक्षेत्राशी संबंधित व्यक्ती जागतिक दर्जाच्या उत्कृष्टतेचे नवे मापदंड यापुढेही निर्माण करत राहतील आणि त्यांनी निर्माण केलेले चित्रपट विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

भारतीय चित्रपटसृष्टीबद्दल अभिमान व्यक्त करून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की आज कोणतीही गोष्ट प्रदेशापुरती मर्यादित नाही, जर चित्रपटाचा आशय उत्तम असेल तर प्रादेशिक चित्रपटांना देखील जागतिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभतो. महान अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्याबद्दल बोलताना, केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की, भारतीय चित्रपट ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडे पोहोचतात त्याचप्रमाणे वहिदा रेहमान यांची लोकप्रियता देखील सीमापार पोहोचलेली आहे. वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

चित्रपटांच्या पायरसीला अटकाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये सरकार चित्रपट उद्योगाच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे आणि सरकारने आणलेला सिनेमॅटोग्राफ कायदा हे याच समस्येला आळा घालण्याच्या उद्देशाने उचललेले मोठे पाऊल आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी उपस्थित प्रेक्षकांना दिली. याच अनुषंगाने, केंद्रीय मंत्र्यांनी एव्हीजीसी क्षेत्राच्या क्षमतेबद्दल भाष्य केले आणि ते पुढे म्हणाले की सरकार या मुद्द्याबाबत धोरण आखत असून या धोरणामुळे जागतिक पातळीवरील कंटेंट हबहोण्याची क्षमता जाणून घेण्यात भारताला मदत होईल.

आज वितरीत झालेली पारितोषिके वर्ष 2021 मधील कामगिरीसाठी देण्यात आली आहेत असे सांगून सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की त्या वर्षी कोविड-19 च्या प्रभावामुळे चित्रपटगृहे बंद होती आणि चित्रपटसृष्टी देखील संघर्षमय परिस्थितीत सापडली होती. मात्र आपण जलदगतीने त्यातून सावरलो आणि आता आपला देश आणि चित्रपट उद्योग हे दोन्ही विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत . तसेच शेवटची तिमाही देशातील चित्रपट उद्योगासाठी सर्वोत्तम ठरली आहे. ते पुढे म्हणाले की जसे चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेले यश महत्त्वाचे असते तसेच गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी चित्रपटांना दिली जाणारी पारितोषिके देखील तितकीच महत्वाची आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्याबद्दल चंद्रा यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पारितोषिकांची आणि विजेत्यांची संपूर्ण यादी वाचण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा.

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1951758

***

S.Kane/S.Chavan/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968564) Visitor Counter : 144