पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडमधील पिथौरागड इथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 12 OCT 2023 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑक्‍टोबर 2023

 

भारत माता की – जय!

भारत माता की – जय!

उत्तराखंडचे लोकप्रिय तरुण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी जी, केंद्रीय मंत्री अजय भट्ट जी, माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक जी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट जी, उत्तराखंड सरकारमधील मंत्री, सर्व खासदार, आमदार, अन्य मान्यवर आणि देवभूमीच्या माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. 

आज तर उत्तराखंडने कमालच केली आहे. बहुधा असे दृश्य पाहण्याचे भाग्य क्वचितच यापूर्वी कुणाला लाभले असेल. आज सकाळपासून उत्तराखंडमध्ये जिथे जिथे मी गेलो, अभूतपूर्व प्रेम, अनेक आशीर्वाद मिळाले, जणू काही प्रेमाची गंगाच वाहत आहे असे वाटत होते.

अध्यात्म आणि अतुलनीय शौर्याच्या या भूमीला मी वंदन करतो. विशेषतः शूर मातांना वंदन करतो. बद्रीनाथ धाममध्ये जेव्हा "जय बद्री-विशाल" चा जयघोष केला जातो तेव्हा गढवाल रायफल्सच्या वीरांचा उत्साह वाढतो. जेव्हा गंगोलीहाटच्या कालिका मंदिरातील "जय महाकाली" चा घंटानाद होतो, तेव्हा कुमाऊं रेजिमेंटच्या वीरांमध्ये अदम्य ऊर्जा संचारते. इथे मानसखंडमध्ये बागेश्वर, बैजनाथ, नंदा देवी, गोलू देवता, पूर्णागिरी, कसार देवी, कैंची धाम, कटारमल, नानकमत्ता, रीठासाहिब या अगणित देवस्थानांचे वैभव, आपल्याकडे खूप मोठा वारसा आहे. राष्ट्ररक्षा आणि श्रद्धेच्या या तीर्थभूमीला जेव्हा-जेव्हा मी भेट देतो, जेव्हा मी याचे स्मरण करतो, तेव्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.

माझ्या कुटुंबियांनो,

येथे येण्यापूर्वी मला पार्वती कुंड आणि जोगेश्वरधाम येथे पूजा करण्याचे भाग्य लाभले. मी प्रत्येक देशवासीयाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि विकसित भारताचा संकल्प मजबूत करण्यासाठी तसेच माझ्या उत्तराखंडची सर्व स्वप्ने आणि संकल्प पूर्ण होण्यासाठी आशीर्वाद मागितले . थोड्याच वेळापूर्वी मी आपल्या सीमा रक्षकांना आणि आपल्या  सैनिकांनाही भेटलो. मला स्थानिक कला आणि बचत गटांशी संबंधित आपल्या सर्व बंधु आणि भगिनींना भेटण्याची संधी मिळाली. म्हणजेच भारताची संस्कृती, भारताची सुरक्षा आणि भारताची समृद्धी या तीन प्रकारात अशा प्रकारे माझ्या या नव्या प्रवासाचीही भर पडली. सर्वांचे दर्शन एकाचवेळी झाले. उत्तराखंडचे हे सामर्थ्य अद्भुत आहे, अतुलनीय आहे. म्हणूनच माझा विश्वास आहे आणि हा विश्वास मी बाबा केदार यांच्या चरणी बसून व्यक्त केला होता.  मला विश्वास आहे की हे दशक उत्तराखंडचे दशक असेल. आणि आज मी आदि कैलासाच्या चरणी बसून माझा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करतो.

उत्तराखंडने विकासाची नवीन उंची गाठावी ,तुमचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आमचे सरकार आज प्रामाणिकपणे ,पूर्ण समर्पित वृत्तीने आणि एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे.  आताच इथे 4 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. एकाच कार्यक्रमात 4 हजार कोटी रुपये, उत्तराखंडच्या माझ्या बंधू-भगिनींनो, तुम्ही कल्पना करू शकता ? या प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

माझ्यासाठी इथले रस्ते नवीन नाहीत आणि तुम्ही सर्व मित्रमंडळी देखील नवीन नाहीत. उत्तराखंडशी आपलेपणाची भावना नेहमीच माझ्या मनात असते. आणि मी पाहतो की तुम्हीही माझ्याशी आपलेपणाच्या त्याच हक्काने, त्याच आत्मीयतेने जोडलेले आहात. उत्तराखंड आणि अगदी दुर्गम  खेड्यातून अनेक मित्र मला पत्रे लिहितात. प्रत्येक चांगल्या वाईट काळात बरोबर उभे राहतात . कुटुंबात नवीन पाहुणा जन्मला  तरी मला कळवतात.  मुलीची अभ्यासातली  प्रगती पत्राद्वारे कळवतात. जणू काही मी संपूर्ण उत्तराखंड कुटुंबाचा सदस्य आहे अशाप्रकारे उत्तराखंड माझ्याशी जोडले गेले आहे.

जेव्हा देश एखादे मोठे यश संपादन करतो, तेव्हा तुम्हीही आनंदात सहभागी होता.  कुठे सुधारणा आवश्यक असतील , तर तुम्ही मला ते सांगायलाही मागे हटत नाही. अलिकडेच देशाने लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 30-40 वर्षांपासून प्रलंबित असलेले काम माता-भगिनींनो, तुमच्या आशीर्वादाने तुमचा हा भाऊ , तुमचा मुलगा  करू शकला आहे. आणि गंमत बघा, यावेळीही इथल्या भगिनींनी मला बरीच पत्रं पाठवली आहेत.

माझ्या कुटुंबियांनो,

तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आज भारत विकासाच्या नव्या उंचीकडे वाटचाल करत आहे. जगभरातून भारत आणि भारतीयांचे कौतुक होत आहे. होत आहे ना , भारताचा जगभरात जयजयकार होत आहे ना ? एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र निराशेचे वातावरण होते. संपूर्ण देश जणू काही निराशेच्या गर्तेत बुडाला होता.  त्यावेळी आपण सगळे प्रत्येक मंदिरात जायचे आणि भारत लवकरात लवकर अडचणीतून बाहेर पडावा अशी इच्छा व्यक्त करायचो. प्रत्येक भारतीयाला हजारो कोटींच्या घोटाळ्यांपासून देश मुक्त करायचा होता. भारताची कीर्ती वाढावी, अशी प्रत्येकाची इच्छा होती.

आज बघा, आव्हानांनी वेढलेल्या या जगात,  भारताचा आवाज किती बुलंद होत आहे. काही आठवड्यांपूर्वीच जी -20 चे भव्य आयोजन करण्यात आले. त्यातही तुम्ही पाहिले की जगाने आपल्या भारतीयांचे सामर्थ्य मान्य केले आहे. तुम्हीच मला सांगा, जेव्हा जग भारताचे गुणगान गाते, जगात भारताचा जयजयकार होतो, तुम्ही सांगाल, उत्तर द्याल ? मी विचारतो , तुम्ही उत्तर द्याल का? भारताचे नाव जगात उंचावते , तेव्हा तुम्हाला ते आवडते का? संपूर्ण ताकदीनिशी मला सांगा , तुम्हाला आनंद होतो का? जेव्हा भारत जगाला दिशा दाखवतो तेव्हा तुम्हाला ते आवडते का?

हे सर्व कोणी केले आहे? हे सर्व कोणी केले आहे? हे मोदींनी केले नाही, हे सर्व तुम्ही , माझ्या कुटुंबातील सदस्यांनी केले आहे, याचे श्रेय तुम्हा सर्वांना, जनतेला जाते. काय? लक्षात ठेवा? कारण 30 वर्षांनंतर तुम्ही मला दिल्लीत स्थिर आणि मजबूत सरकार बनवून तुमची सेवा करण्याची संधी दिली आहे. ही तुमच्या मताची ताकद आहे, जेव्हा मी जगातील मोठ्या लोकांशी हस्तांदोलन करतो तेव्हा तुम्ही पाहिलेच असेल की मोठमोठ्या लोकांना  भेटत आहे . मात्र जेव्हा मी हस्तांदोलन करतो तेव्हा मी थेट त्यांच्या नजरेला नजर भिडवतो. आणि जेव्हा ते माझ्याकडे पाहतात तेव्हा ते मला पाहत  नाहीत, तर 140 कोटी भारतीयांना पाहतात.

माझ्या कुटुंबियांनो,

दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांचीही आम्हाला काळजी वाटते.  त्यामुळे अवघ्या 5 वर्षात देशातील 13.5 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले. 13.5 कोटी लोक, तुम्हाला हा आकडा लक्षात राहील ना ? आठवेल ना ? पाच वर्षांत 13.5 कोटी लोक गरीबीतून बाहेर आले हे पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे. कोण आहेत हे 13.5 कोटी लोक? यातील अनेक लोक तुमच्यासारखेच डोंगराळ , दुर्गम भागात राहतात. हे 13.5 कोटी लोक भारत आपल्या देशातील गरीबीचे समूळ उच्चाटन करू शकतो याचे उदाहरणच आहेत.

मित्रांनो,

यापूर्वी गरिबी हटावचा नारा दिला जात होता. म्हणजे तुम्ही हटवा आणि ते म्हणत होते गरिबी हटवा, मोदी म्हणत आहेत,आपण एकत्र येऊन गरिबी हटवू . आम्ही (35.54) यथोचित जबाबदारी स्वीकारतो, जबाबदारी घेतो  आणि त्यासाठी मनापासून काम करतो.  आज प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक मैदानात आपला तिरंगा   उंच उंच फडकत  आहे. आपले चांद्रयान, हे चांद्रयान जिथे पोहोचलं आहे तिथे  जगातला कुठलाही देश पोहोचू शकलेला  नाही. आणि आपले चांद्रयान जिथे पोहोचले त्या ठिकाणाला भारताने शिवशक्ती असे नाव दिले आहे. माझ्या उत्तराखंडच्या लोकांनो, तुम्ही शिव-शक्तीच्या विचाराने  खूश आहात की नाही? तुमचे मन आनंदीत झाले की नाही? म्हणजे माझ्या  उत्तराखंडची ओळख तिथेही पोहोचली. शिव आणि शक्तीच्या या संयोगाचा अर्थ काय आहे, हे उत्तराखंडमध्ये आपल्याला  शिकवण्याची गरज नाही, हे येथे प्रत्येक टप्प्यावर स्पष्टपणे दिसून येते.

मित्रांनो,

आज जगाला भारताची ताकद केवळ अंतराळातच नाही तर खेळातही दिसत आहे. नुकत्याच आशियाई क्रीडा स्पर्धा संपल्या. यामध्ये भारताने इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. प्रथमच भारतीय खेळाडूंनी शतक झळकावत 100 हून अधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला. आणि तुम्ही जरा जोरात टाळ्या वाजवा, उत्तराखंडची 8 मुले -मुली सुद्धा आशियाई खेळात आपले सामर्थ्य  दाखवायला गेली होती .आणि यामध्ये आपल्या लक्ष्य सेनच्या संघानेही पदक पटकावले आणि वंदना कटारियाच्या हॉकी संघानेही देशाला शानदार  पदक मिळवून दिले.  एक काम करूया , उत्तराखंडच्या या मुलांनी कमाल केली आहे.  आपण एक काम करू या ?  तुमचा मोबाईल फोन बाहेर  काढा, त्याचा फ्लॅश चालू करा. आणि तुमचा फ्लॅशलाइट वापरून या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करा. प्रत्येकाने , आपला मोबाईल फोन बाहेर काढा आणि तो फ्लॅशलाईट सुरु करा , शाबास.आपल्या  उत्तराखंडच्या मुलांना हे अभिवादन आहे , आपल्या  खेळाडूंना अभिवादन आहे. मी पुन्हा एकदा देवभूमीच्या माझ्या तरुण मुलांचे आणि या खेळाडूंचे अभिनंदन करतो. आणि तुम्ही आज एक नवीन रंग भरला आहे .

मित्रांनो,

बसा, मी तुमचा खूप आभारी आहे. भारताच्या खेळाडूंनी  देश आणि जगात आपला झेंडा फडकवावा यासाठी  सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. खेळाडूंच्या जेवणापासून ते आधुनिक प्रशिक्षणापर्यंत सरकार कोट्यवधी  रुपये खर्च करत आहे. हे तर बरोबर आहे  पण एक  उलटही होते. सरकार करते आहे  पण लक्षचे जे कुटुंब आहे ना आणि  लक्ष जेव्हाही विजयी होतो तेव्हा मला मिठाई घेऊन येतो. खेळाडूंना फार दूर जावे लागू नये, यासाठी शासनातर्फे ठिकठिकाणी क्रीडांगणेही बांधली जात आहेत. आजच हल्दवानी येथील हॉकी मैदान आणि रुद्रपूर येथील वेलोड्रोम स्टेडियमचीही  पायाभरणी  झाली आहे. टाळ्या वाजवा माझ्या तरुणांनो, तुमचे काम होत आहे. माझ्या उत्तराखंडच्या तरुणांना याचा फायदा होईल.   राष्ट्रीय खेळांसाठी उत्साहाने तयारी करत असलेल्या   धामीजी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे देखील मी खूप खूप अभिनंदन करतो. तुमचे आणि तुमच्या संपूर्ण चमूचे  खूप खूप अभिनंदन,  

माझ्या कुटुंबियांनो,

उत्तराखंडच्या प्रत्येक गावात देशाचे रक्षक आहेत. येथील शूर मातांनी माझ्या देशाचे रक्षण करणाऱ्या शूर पुत्रांना जन्म दिला आहे. वन रँक वन पेन्शनची त्यांची अनेक दशके जुनी मागणी आमच्याच सरकारने पूर्ण केली आहे. आतापर्यंत वन रँक वन पेन्शन अंतर्गत आमच्या सरकारने माजी सैनिकांना 70  हजार कोटींहून अधिक  रुपये दिले आहेत. उत्तराखंडमधील 75 हजारांहून अधिक माजी सैनिकांच्या कुटुंबांनाही याचा लाभ झाला आहे. सीमाभागातील विकासालाही आमच्या सरकारचे मोठे प्राधान्य आहे.आज सीमावर्ती भागात सुविधा निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तुम्ही विचार करत असाल की, तुमची चूक काय होती... आधीच्या सरकारांनी हे काम का केले नाही?  तुमची  चूक नव्हती. शत्रू त्याचा फायदा घेऊन आत येऊ शकतो या भीतीने पूर्वीच्या सरकारांनी सीमाभागाचा विकास केला नाही, मला सांगा, काय तर्क मांडत होते . आजचा नवा भारत पूर्वीच्या सरकारांच्या या भीतीदायक विचाराला  मागे टाकून पुढे जात आहे. आम्ही घाबरत नाही आणि घाबरवतही नाही.

भारताची संपूर्ण सीमा, ज्यावर आपण आधुनिक रस्ते, बोगदे, पूल बांधत आहोत. गेल्या 9 वर्षांत केवळ सीमावर्ती भागात 4200 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते बांधण्यात आले आहेत. आम्ही सीमेवर सुमारे 250 मोठे पूल आणि 22 बोगदेही बांधले आहेत.आजही या कार्यक्रमात अनेक नवीन पुलांची पायाभरणी झाली आहे. आता आम्ही सीमेपर्यंत  रेल्वेगाड्या आणण्याचीही तयारी करत आहोत. या बदललेल्या विचाराचा  फायदा उत्तराखंडलाही मिळणार आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

पूर्वी सीमाभाग, सीमावर्ती गावे ही देशातील शेवटची गावे मानली जात होती. जो शेवटचा आहे तो विकासाच्या बाबतीतही त्यांचा क्रमांक शेवटचा असायचा . ही सुद्धा जुनी विचारसरणी होती.सीमावर्ती गावांचा विकास शेवटची नव्हे तर देशातील पहिली गावे म्हणून आम्ही सुरू केला आहे. व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमांतर्गत अशाचप्रकारे  सीमावर्ती गावे विकसित केली जात आहेत.येथून स्थलांतरित झालेले लोक पुन्हा परतावेत, असा आमचा प्रयत्न आहे. या गावांमध्ये पर्यटन वाढावे आणि तीर्थक्षेत्र विस्तारावे अशी आमची इच्छा आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

डोंगराचे पाणी आणि डोंगरातील तरुणाईचा डोंगराला काही उपयोग नाही अशी जुनी म्हण आहे.मी संकल्प केला आहे की मी ही धारणा  बदलणार आहे.पूर्वीच्या चुकीच्या धोरणांमुळे उत्तराखंडमधील अनेक गावे ओसाड झाल्याचेही तुम्ही पाहिले आहे. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, औषध, उत्पन्न  या सर्वच गोष्टींचा अभाव आहे आणि या अभावामुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत.आता परिस्थिती बदलत आहे. उत्तराखंडमध्ये नवीन संधी आणि नवीन सुविधा निर्माण होत असल्याने अनेक मित्र आपापल्या गावी परतायला लागले आहेत. गावाकडे परतण्याचे हे काम वेगाने व्हावे, हा  डबल इंजिन सरकारचा प्रयत्न आहे.त्यामुळेच या रस्ते, वीज प्रकल्प, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये, मोबाईल फोन टॉवर्सवर एवढी मोठी गुंतवणूक होत आहे. आजही त्यांच्याशी संबंधित अनेक प्रकल्प येथे सुरू झाले आहेत.

सफरचंदाच्या बागा आणि फळे आणि भाजीपाला याला येथे भरपूर वाव आहे. आता याठिकाणी रस्ते तयार होत असून पाणी पोहोचत असल्याने माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनाही प्रोत्साहन मिळत आहे.आज पॉलिहाऊस बांधून सफरचंद बाग विकसित करण्याची योजनाही सुरू झाली आहे. या योजनांवर 1100 कोटी रुपये खर्च होणार आहेत. उत्तराखंडमधील आपल्या छोट्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी इतका पैसा खर्च केला जात आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत देखील, उत्तराखंडच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 2200 कोटी रुपये अधिक मिळाले आहेत.

मित्रहो,

इथे तर कित्येक अनेक पिढ्यांपासून भरड धान्य- श्रीअन्न पिकवले जात आहे. मी जेव्हा आपणासोबत राहत होतो, कितीतरी काळ मी तुमच्याबरोबर राहत होतो तेव्हा घराघरात भरड धान्य भरपूर खाल्लं जात असे. आता केंद्र सरकार हे भरड धान्य- श्री अन्न - जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवू इच्छित आहे. यामुळे देशभरात एक मोहीम सुरू केली गेली त्याचा खूप फायदा आपल्या उत्तराखंडच्या छोट्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

माझ्या कुटुंबीयांनो,

आमचे सरकार माता भगिनींच्या प्रत्येक अडचणी, प्रत्येक गैरसोयी दूर करण्यासाठी वचनबध्द आहे. त्यासाठी आमच्या सरकारने गरीब भगिनींना पक्के घर दिले. आम्ही भगिनी लेकींसाठी शौचालय उभारून दिले. गॅस जोडण्या दिल्या. बँकेत खाते उघडून दिले. विनामूल्य उपचार केले मोफत रेशन आजही सुरू आहे जेणेकरून गरीब घरांमध्ये चूल पेटती राहावी.

हर घर जल योजनेअंतर्गत उत्तराखंडमध्ये अकरा लाख कुटुंबातील बहिणींना जलवाहिनीतून पाण्याची सुविधा मिळत आहे,. आत्ता भगिनींसाठी अजून एक काम केले जात आहे. यावर्षी लाल किल्ल्यावरून मी महिला स्वयंसहाय्यता गटांना ड्रोन द्यायची घोषणा केली आहे. ड्रोनच्या माध्यमातून शेतात औषधे, खते, बियाणे अशी अनेक  काम केली जातील. आता तर फळे किंवा भाज्यां जवळच्या बाजार पेठेत पोचवू शकतील असेही ड्रोन तयार होत आहेत. डोंगराळ भागात ड्रोनच्या मदतीने औषधेही वेगाने पोहोचवता येतील म्हणजेच महिला स्वयंसहायता समूहांना मिळणारे हे ड्रोन उत्तराखंडला आधुनिकतेच्या नवीन शिखरांवर घेऊन जातील.

माझ्या कुटुंबियांनो, 

उत्तराखंडच्या गावागावांमध्ये गंगा आहे, गंगोत्री आहे, येथील हिमशिखरांवर शिवजी आणि नंदा स्थानापन्न असतात, उत्तराखंडातील मेळे, कौथिक, स्थौल, गीत संगीत, खानपान यांची आपली एक विशिष्ट अशी ओळख आहे . पांडवनृत्य, छोलिया मृत्य, मांगल गीत, फुलदेई, हरेला, बग्वान आणि रम्माण यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून ही धरती समृद्ध झालेली आहे. लोक जीवनाचा स्वाद असलेले रोट असो, झंगोरेची खीर ,कफली पकोडे, रायता अलमोडाचे बाल मिठाई, सिंगोरी यांचा स्वाद कोण विसरू शकेल. आणि ही जी काली गंगाची भूमी आहे त्या भूमीशी माझे नाते खूप जवळचे आहे. इथे चंपावतमधील अद्वैत आश्रमाशीही माझा जवळचा संबंध आहे. माझ्या जीवनातील तोही एक कालखंड होता.

माझ्या कित्येक आठवणी येथील जमिनीशी जोडलेल्या आहेत. या वेळेला या दैवी परिसरात जास्त वेळ घालवावा अशी खूप इच्छा होती. परंतु उद्या दिल्लीमध्ये G-20 शी संबंधित एक अजून मोठे संमेलन आहे.‌ जगातील सगळ्या G-20 देशांच्या संसदेतील सभापतींची शिखर परिषद आहे. आणि या कारणामुळे मी चंपावतच्या अद्वैत आश्रमात जाऊ शकणार नाही. मला लवकरच या आश्रमात येण्याची अजून एक संधी मिळावी अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. 

माझ्या कुटुंबीयांनो,

उत्तराखंडात पर्यटन आणि तीर्थयात्रा यांच्या विकासाशी नाते असलेल्या डबल इंजिन सरकारचे प्रयत्न आता फळाला येत आहेत. यावर्षी उत्तराखंडात चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या श्रद्धाळूची संख्या पन्नास लाखांपर्यंत गेली आहे. सारे विक्रम पार केले गेले आहेत. बाबा केदारच्या आशीर्वादाने केदारनाथधामच्या पुनर्निर्माणाचा पहिला भाग पूर्ण झाला आहे. श्री बद्रीनाथ धाम मध्ये सुद्धा शेकडो करोडो रुपयांच्या खर्चाची अनेक कामे होत आहेत. केदारनाथ धाम आणि श्री हेमकुंड साहेब मध्ये रोपवेचे काम सुद्धा पूर्ण होत आले की दिव्यांग आणि जेष्ठ यात्रेकरुंना भरपूर सोयी उपलब्ध होतील. आपले सरकार केदार खंडच्या बरोबर आहे आणि मला मानस खंडाला सुद्धा त्याच उंचीवर घेऊन जायचे आहे. म्हणून मी आज इथे आलो. केदारनाथ खंडाच्या कनेक्टिव्हिटीवर आपण जास्त भर देत आहोत. जे लोक केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला जातात त्यांना जागेश्वर धाम आणि कैलास आणि ओम पर्वत या भागात सुद्धा सहज फिरून येता येईल असे प्रयत्न केले जात आहेत. आज हे जे मानसखंड मंदिर माला मिशन सुरू झाले आहे त्यामुळेसुद्धा कुमाऊच्या अनेक मंदिरांपर्यंत जाणे येणे सोपे होईल.

जे लोक बद्रीनाथ आणि केदारनाथला येतात ते भविष्यात इथे नक्की येतील. त्यांना हा भाग माहित नाही आणि आज जी माणसे व्हिडिओ किंवा टीव्हीवर बघतील की मोदी येथे जाऊन आले आहेत तेव्हा एकमेकांना सांगतील की मित्रांनो काहीतरी तर असेल. आणि आपण तयारी करा. यात्रेकरूंची संख्या वाढणार आहे. माझे मानसखंड दणाणून जाणार आहे.

मित्रहो,

उत्तराखंडाची वाढती कनेक्टिव्हिटी येथील विकासाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. चारधाम महापरियोजनेमुळे सगळ्या मोसमात सुरू राहणाऱ्या रस्त्यामुळे आपल्याला भरपूर सोयी उपलब्ध झाल्या आहेत. ऋषिकेश कर्णप्रयाग परियोजना पूर्ण झाल्यानंतर तर या संपूर्ण भागाचा कायापालट होईल. या संपूर्ण भागात उडान योजनेअंतर्गत स्वस्त विमान सेवांचा विस्तार केला जात आहे. आज सुद्धा इथे बागेश्वर ते कनालीचिनापर्यंत, गंगोलीहाटपासून अल्मोडापर्यंत आणि टणकपूर घाटापासून ते पिथौरागडपर्यंत रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. यामुळे सामान्य लोकांना सुविधाबरोबरच पर्यटनातून होणाऱ्या मिळकतींच्या संधी वाढतील. येथील सरकार होमस्टेंना प्रोत्साहन देत आहे. याचा मला आनंद वाटतो. पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे जिथे सर्वाधिक रोजगार आहे आणि कमीत कमी गुंतवणूक लागते. येत्या काळात तर पर्यटन क्षेत्राचा खूप विस्तार होणार आहे. कारण सगळे जग आज भारतात येऊ इच्छित आहे. भारत पाहू इच्छित आहे. भारताला जाणून घ्यायची इच्छा बाळगत आहे. आणि जे भारत बघू इच्छितात त्यांचे भारत दर्शन उत्तराखंडात आल्याशिवाय पूर्ण होत नाही.

माझ्या कुटुंबीयांनो,

मागील काळात उत्तराखंड ज्या प्रकारे नैसर्गिक संकटांनी घेरले जात आहे त्याच्याशी सुद्धा माझा जवळून परिचय आहे. आपण आपली जवळची माणसे गमावली आहेत. नैसर्गिक संकटाला तोंड देण्याची आपली क्षमता आपल्याला वाढवत न्यायची आहे. आणि आपण ते करत राहू. त्यासाठी येणाऱ्या चार-पाच वर्षांमध्ये उत्तराखंडात 4 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. उत्तराखंडात अशा सोयी निर्माण केल्या जातील की त्यामुळे संकटांच्या काळात संकटापासून संरक्षण आणि संकटातून सुटका ही कामे वेगाने होतील.

माझ्या कुटुंबीयांनो,

हा भारताचा अमृतकाळ आहे. देशातील प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गाला सुविधा, सन्मान आणि समृद्धीने जोडण्याचा काळ आहे . बाबा केदारनाथ आणि बद्री विशालच्या आशीर्वादाने आदी कैलासच्या आशीर्वादाने आपण आमचे संकल्प वेगाने प्रत्यक्षात आणू याचा मला पूर्ण विश्वास आहे. पुन्हा एकदा इतके प्रेम दिलेत म्हणून …

सात किलोमीटर, खरोखरच माझ्याकडे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. मी हेलिकॉप्टर मधून बाहेर पडलो. सात किलोमीटर इथे आलो आणि येण्यासाठी उशीर झाला. याचे कारण म्हणजे सात किलोमीटरवर दोन्ही बाजूने मानवी साखळीच नव्हे तर मानवी भिंत असावी अशी गर्दी होती आणि ज्याप्रमाणे कुटुंबात एखादे कार्य असेल तसे उत्सवाचे कपडे घालून, शुभप्रसंगी घालायचे कपडे घालून मंगल वातावरणात मातांच्या हातात आरती, फुलांचे गुच्छ. आशीर्वाद देताना त्या थांबत नव्हत्या. हे माझ्यासाठी अतिशय भावूक क्षण होते. आज मी पिथौरागड आणि पिथौरागड जिल्ह्यातील सर्व लोकांना या पूर्ण खंडास माझ्या मानस खंडाला त्यांनी जो प्रेमाचा वर्षाव केला, उत्साह दाखवला त्यासाठी मी शतशः नमन करतो. आपले आभार मानतो. परत एकदा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! माझ्याबरोबर बोला दोन्ही हात वर करत पूर्ण शक्तिनिशी म्हणा-

भारत माता की जय! 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद !

* * *

NM/Sushma/Sonal C/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967359) Visitor Counter : 98