पंतप्रधान कार्यालय

टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 09 OCT 2023 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2023

सन्माननीय महोदया,राष्ट्राध्यक्ष  सामिया हसन जी,

उभय देशांचे प्रतिनिधी,

प्रसार माध्‍यमातील  मित्रांनो,

नमस्कार!

सर्वप्रथम मी,  राष्ट्राध्यक्ष  आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो.

टांझानियाच्या  राष्ट्र प्रमुख  म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मात्र  त्या भारत आणि भारतातील लोकांबरोबर  दीर्घकाळापासून जोडल्या गेलेल्या आहेत.

त्यांना भारताविषयी वाटत  असलेली आपुलकी  आणि वचनबद्धता, यामुळे   प्रत्येक क्षेत्रात उभय देशातले  संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा मिळते.

जी -20 मध्‍ये आफ्रिकन महासंघ कायमस्वरूपी सदस्य म्हणून सहभागी  झाल्यानंतर, आम्हाला प्रथमच आफ्रिकेतील एका  राष्ट्रप्रमुखाचे भारतात स्वागत करण्याची संधी मिळत आहे.

त्यामुळे त्यांच्या या  भारत दौ-याचे महत्त्व आपल्यासाठी अनेकपटींनी वाढते.

मित्रांनो,

भारत आणि टांझानिया यांच्यातल्या संबंधांमधला आजचा दिवस ऐतिहासिक आहे.

आज आम्ही आमच्या जुन्या मैत्रीला ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ म्हणजेच धोरणात्मक भागीदारीच्या सूत्रामध्‍ये गुंफत  आहोत.

आजच्या बैठकीत आम्ही या भविष्यातील धोरणात्मक भागीदारीचा पाया घालण्यासाठी अनेक नवीन उपक्रम चिन्हित   केले आहेत.

भारत आणि टांझानिया हे परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीसाठी एकमेकांचे महत्त्वाचे भागीदार आहेत.

दोन्ही देशांकडून  स्थानिक चलनांमध्ये व्यापार वाढवण्यासंबंधीच्या  करारावर काम सुरू आहे.

आमच्या आर्थिक सहकार्याची पूर्ण क्षमता जाणण्याण्यासाठी आम्ही नव्या संधीनाचा शोध जारी  ठेवणार आहोत.

टांझानिया हा आफ्रिकेतील भारताचा सर्वात मोठा आणि सर्वात जवळचा विकास क्षेत्रातील  भागीदार आहे.

भारताने आयसीटी केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण, संरक्षण प्रशिक्षण, आयटीईसी  आणि आयसीसीआर  शिष्यवृत्तींद्वारे टांझानियाच्या कौशल्य विकासामध्‍ये  आणि क्षमता वाढीसाठी  महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पाणीपुरवठा, कृषी, आरोग्य, शिक्षण यासारख्‍या महत्त्वापूर्ण  क्षेत्रात एकत्र काम करून आम्ही टांझानियाच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

या वचनबद्धतेनुसार  आम्ही भविष्यातही आमचे प्रयत्न सुरूच ठेवू.

आयआयटी मद्रासचा एक  परिसर झांझिबारमध्ये सुरू करण्‍याचा निर्णय हा आमच्या संबंधांमधील एक महत्त्वापूर्ण टप्पा आहे.

हा परिसर  केवळ टांझानियासाठीच नाही  तर या प्रदेशातल्या देशांमधल्या विद्यार्थ्यांसाठीही उच्च दर्जाच्या शिक्षणाचे केंद्र बनेल.

दोन्ही देशांच्या विकास प्रवासामध्‍ये  तंत्रज्ञान हा महत्त्वाचा आधार आहे.

डिजिटल सार्वजनिक वस्तू सामायिक करण्याबाबत  आज झालेला करार आमची भागीदारी मजबूत करेल.

‘यूपीआय’ ची यशोगाथा जाणून, यूपीआयचा टांझानियामध्ये स्वीकार करण्‍याच्या दृष्‍टीने पावले उचलली जात आहेत, याचा मला आनंद आहे.

मित्रांनो,

संरक्षण क्षेत्रातील आगामी पाच वर्षांच्या आराखड्याबाबत आमचे एकमत झाले आहे.

या आराखड्याच्या माध्यमातून लष्करी प्रशिक्षण, सागरी सहकार्य, क्षमता निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवनवे पैलू जोडले जातील.

उर्जा क्षेत्रात देखील भारत आणि टांझानिया यांच्यामध्ये पूर्वीपासून दृढ सहयोगी संबंध चालत आलेले आहेत.

भारतात अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या स्वच्छ उर्जा मानचित्राचा विचार करता आम्ही या महत्वाच्या क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

जी-20 शिखर परिषदेत भारतातर्फे स्थापन करण्यात आलेल्या जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या टांझानियाच्या निर्णयाने मला अत्यंत आनंद झाला आहे.

त्याच बरोबर, आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या टांझानिया देशाच्या निर्णयामुळे बिग कॅट्स म्हणजेच मार्जारवर्गातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल.

अवकाश संशोधन तसेच आण्विक तंत्रज्ञानाचा वापर लोककल्याणासाठी केला जावा यावर आम्ही आज अधिक भर दिला. या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निश्चित उपक्रमांची निवड करून प्रगती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

मित्रांनो,

आज आम्ही अनेक जागतिक तसेच क्षेत्रीय विषयांवर विचार विनिमय केला.

हिंदी महासागराशी संबंधित असलेले देश म्हणून सागरी सुरक्षा, चाचेगिरी, अंमली पदार्थांची तस्करी यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपसांतील समन्वयात वाढ करण्यावर आम्ही अधिक भर दिला.

हिंद-प्रशांत परिसराशी संबंधित सर्व प्रयत्नांच्या बाबतीत टांझानिया देशाला मोलाच्या  भागीदाराचे स्थान आहे.

दहशतवाद हा आजघडीला मानवतेला असलेला सर्वात मोठा धोका आहे याबाबत भारत आणि टांझानिया यांचे एकमत आहे.

म्हणूनच आम्ही दहशतवाद विरोधाच्या क्षेत्रात परस्पर सहयोग वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

या दोन्ही देशातील जनतेच्या दरम्यान असलेले सशक्त आणि प्राचीन बंध हा आपल्या नाते संबंधांतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी देखील गुजरातचे मांडवी बंदर आणि झांझिबार यांच्या दरम्यान व्यापार होत असे. 

भारतातील सिद्दी जमातीचे मूळ  पूर्व आफ्रिकेच्या झांज किनाऱ्यावर आहे.

आज घडीला देखील भारतातील मोठ्या प्रमाणातील लोक टांझानिया देशाला आपले दुसरे घर मानतात.

या लोकांच्या देखभालीसाठी टांझानिया कडून मिळालेल्या समर्थनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष  हसन यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

योग्याभ्यासाबरोबरच टांझानिया देशात कबड्डी आणि क्रिकेट या खेळांची लोकप्रियता वाढते आहे.

दोन्ही देशांच्या जनतेमधला परस्पर संवाद  वाढवण्याचे प्रयत्न आम्ही यापुढेही सुरूच ठेवणार आहोत.

महोदया,

तुमचे आणि तुमच्या प्रतिनिधीमंडळाचे पुन्हा एकदा भारतात स्वागत.

खूप खूप धन्यवाद.

 

 

N.Chitale/Suvarna/Sanjana/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1965965) Visitor Counter : 102