गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

‘स्वच्छता ही सेवा -2023’ चा  आजपासून  प्रारंभ


स्वच्छता हा केवळ प्रत्येक सरकारी योजनेचाच भाग नाही,  तर नागरिकांच्या जीवनशैलीचा मूलभूत सिद्धांत बनला : केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी

Posted On: 15 SEP 2023 3:51PM by PIB Mumbai

 

स्वच्छ भारत मिशन हे अंत्योदय से सर्वोदयया तत्त्वज्ञानाचे तळपते  उदाहरण आहे. याने  आपल्या  शहरांतील उपेक्षित आणि असुरक्षित घटकांना प्राधान्य दिले आहे आणि शहरी गरीबांचे उत्थान आणि सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री  हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितले. स्वच्छता ही सेवा-2023’ चा प्रारंभ करतानाते बोलत होते.

स्वच्छ भारत दिवसाची पूर्वतयारी म्हणून, वार्षिक स्वच्छता ही सेवा’   (एसएचएस)पंधरवडा स्वच्छ भारत मिशन- शहरी  आणि ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 23 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.इंडियन स्वच्छता लीग 2.0 ,सफाई मित्र सुरक्षा शिबीर आणि व्यापक स्वच्छता मोहिमा यांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांच्या  सहभागाला चालना देण्याचा यामागचा उद्देश आहे.

एसएचएस-2023 च्या प्रारंभ कार्यक्रमाला जलशक्ती मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री  हरदीप सिंह पुरी आणि ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरिराज सिंह आभासी माध्‍यमाद्वारे उपस्थित होते.

महाराष्ट्रातल्या पिंपरी तसेच इतर राज्यांमधल्या  मेरठ,लखीमपुर या शहरांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या शहरांमधल्या स्वच्छताविषयक उत्तम पद्धती सामायिक केल्या. 

एसबीएम म्हणजेच स्वच्छ भारत मिशन आणि एसएचएस- 2023 च्या प्रारंभाबद्दल बोलताना  हरदीप सिंग पुरी म्हणाले की, स्वच्छ भारत मिशनचा आगामी नववा वर्धापन दिन आणि 'स्वच्छता ही सेवा' 2023 चा शुभारंभ हा एक आनंदाचा, साजरा करण्‍याचा क्षण आहे. आपली शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी पुन्हा कटीबद्ध होण्याची ही वेळ आहे असे ते म्हणाले. 

या कार्यक्रमात सहभागींना संबोधित करताना, ते  म्हणाले की, ज्यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली, त्यावेळी  इतक्या मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडून येईल, अशी   कल्पना केली नव्हती. तोपर्यंत स्वच्छतेबाबत खराब कामगिरी असूनही, भारताने पुढील पाच वर्षांत ओडीएफचे लक्ष्य गाठले. भारतातील सर्व 4,884 नागरी स्थानिक संस्था (100%) आता खुल्यावरील  शौचमुक्त (ओडीएफ) आहेत.

एसबीएमने आणलेल्या परिवर्तनाबद्दल बोलताना, मंत्री पुरी म्हणाले की 73.62 लाख शौचालये (67. 1 लाख वैयक्तिक घरगुती शौचालये आणि 6.52 लाख सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालये) बांधून आम्ही लाखो शहरी गरीबांना सन्मान आणि आरोग्य प्रदान केले आहे. स्वच्छता हा केवळ प्रत्येक सरकारी योजनेचाच नव्हे तर नागरिकांच्या जीवनाचा मूलभूत सिद्धांत बनला आहे, यावर हरदीपसिंग पुरी यांनी  भर दिला.

एसबीएमच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे लक्ष वेधून गृहनिर्माण आणि शहरी मंत्री म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत 12 कोटी शौचालये बांधली गेली आहेत.  त्यामुळे आता  उघड्यावर शौचास जाण्याच्या सवयीतून  देशातील लोकही मुक्त झाले आहेत.  

त्यांनी पुढे माहिती दिली की, स्वच्छ भारत मिशन शहरी  2.0 (एसबीएम-यू 2.0) द्वारे  शहरी घटक आता 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. आपल्या समारोपाच्या भाषणात, मंत्री पुरी यांनी  आशा व्यक्त केली की प्रत्येक शहर, गाव, प्रभाग आणि परिसर स्वच्छतेच्या कार्यासाठी श्रमदान (स्वेच्छेने श्रम) करण्याचे वचन देतील. आपली शहरे कचऱ्यापासून मुक्त व्हावीत आणि संपूर्ण स्वच्छता व्हावी यासाठी लोकांनी शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

'स्वच्छता ही सेवा' विषयी :

2 ऑक्‍टोबरला  महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत असतानाच  देश    स्वच्छ भारत दिवस’  साजरा करतो. त्या दिवसापूर्वी पंधरवडाभरगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि पेयजल आणि स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशनची 9 वर्षे साजरी करण्यासाठी 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या काळात इतर मंत्रालयांच्या सहकार्याने 'स्वच्छता ही सेवा' या पंधरवड्याचे आयोजन केले  आहे.

स्वच्छता अभियानाचा कणा या आंदोलनात लोकांचा सहभाग हा  आहे. एसएचएस  2023 ची संकल्पना  "कचरा मुक्त भारत" आहे.

एसएचएस -2023 मध्‍ये स्वयंसेवा आणि श्रमदानाच्या भावनेने काम करण्‍यात येणार आहे.  तसेच सफाईमित्रांच्या कल्याणासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छतेचा उच्च दर्जा प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित करण्‍यात येणार आहे.

एसएचएस- 2023 अंतर्गत आयोजित करण्यात येणारे प्रमुख उपक्रम खालीलप्रमाणे आहेत.

1. स्वच्छता ही सेवा स्वच्छता पंधरवडा मोहीम

2. भारतीय स्वच्छता लीग 2.0

3. सफाईमित्र सुरक्षा शिबिर

**

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957813) Visitor Counter : 323