आदिवासी विकास मंत्रालय
ट्रायफेडच्या कारागिरांनी निर्माण केलेल्या कलाकुसरीच्या खजिन्याने जी-20 शिखर परिषदेतील सर्वांचे वेधून घेतले लक्ष
Posted On:
11 SEP 2023 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
नवी दिल्ली येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या काळात, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील ट्रायफेड (भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ) संस्थेतर्फे संकलित करून प्रदर्शित करण्यात आलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंमधून भारतातील समृद्ध आदिवासी वारसा आणि कारागिरीचे उल्लेखनीय दर्शन घडले. भारताच्या विविध प्रदेशांतील आदिवासी कारागिरांनी घडवलेल्या अनेक उत्तमोत्तम उत्पादनांनी जगभरातून येथे आलेल्या प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आणि प्रशंसा मिळवली. पिथोरा कलेप्रती दिलेल्या योगदानाबद्दल नावाजलेले परेशभाई जयंतीलाल राथवा यांन जी-20 क्राफ्ट्स बाजारात पिथोरा कलाकृती प्रत्यक्षात तयार करून दाखवून त्यांच्या उल्लेखनीय प्रतिभेचे दर्शन घडवले.

"परेशभाई जयंतीलाल राथवा त्यांच्या उल्लेखनीय प्रतिभेचे दर्शन घडवत असताना"
या ठिकाणी मांडण्यात आलेल्या विविध श्रेणींतील उत्पादनांपैकी खालील कलादालनाला पाहुण्यांनी अधिकाधिक प्रमाणात भेटी दिल्या आणि या वस्तूंबद्दल प्रतिनिधींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून आली”
1. लाँगपी पद्धतीची मातीची भांडी : मणिपुरमधील लाँगपी या गावाच्या नावावरून ही कला ओळखली जाते, तंगखुल नागा जमातीचे लोक या अवर्णनीय पद्धतीचे कुंभारकाम करतात. लाँगपी प्रकारात कुंभाराच्या चाकाचा वापर केला जात नाही. या भांड्यांना आकार देण्यासाठी हाताचा वापर करतात किंवा साचे वापरतात. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण राखाडी-काळ्या रंगाची स्वयंपाकाची भांडी, मजबूत किटल्या, सुंदर वाडगे, मग आणि नट ट्रेज, काही वेळा वापरलेली सुंदर बांबूची हँडल्स ही लाँगपी कलेची वैशिष्ट्ये आहेत. मात्र, आता उत्पादनाची श्रेणी विस्तारण्यासाठी तसेच विद्यमान कुंभारकलेला अधिक सजवण्यासाठी नव्या डिझाईन्सचा देखील वापर करण्यात येतो.

"लाँगपी कुंभार कला हा वारसा घडवणारा कलाप्रकार आहे, यात एका वेळी एकच भांडे घडवले जाते."
2. छत्तीसगड येथील पवन बासऱ्या: छत्तीसगड मधील बस्तर येथील गोंड जमातीमध्ये चालत आलेल्या या कलेमध्ये, ‘सुलूर’ बांबूपासून तयार केलेली बासरी किंवा वेणू ही अत्यंत अभिनव अशी सांगीतिक निर्मिती आहे. ही बासरी एका हाताच्या साध्या गिरकीतून स्वरांच्या लडी निर्माण करते. पारंपरिक बासऱ्यांमध्ये अशी पद्धत नसते. या प्रकारची बासरी तयार करताना, श्रमपूर्वक केलेली बांबूची निवड, त्यामध्ये छिद्रे पाडणे, आणि बासरीच्या बाह्यभागावर माशांची चिन्हे, भौमितिक रेषा तसेच त्रिकोण या आकृत्या कोरणे अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. संगीत निर्मितीसह, ‘सुलूर’ ही बासरी इतर अनेक कारणांसाठी वापरण्यात येते, उदा, श्वापदे पळवून लावण्यासाठी तसेच आदिवासींच्या गुरांना जंगलातून घरी आणण्यासाठी या बासऱ्या उपयोगी ठरतात. गोंड जमातीच्या स्वदेशी कारागिरीतून निर्माण झालेली ही बासरी म्हणजे कलात्मकता आणि उपयुक्तता यांचा सुरेल मिलाफ आहे.

"ही बासरी म्हणजे छत्तीसगड मधील बस्तर निवासी गोंड जमातीची सुंदर निर्मिती आहे"
3. गोंड चित्रकला: निसर्ग आणि परंपरा यांच्याशी असलेले गोंड जमातीचे दृढ नाते दर्शवणाऱ्या त्यांच्या चित्रांतून या जमातीची कला प्रतिभा झळकते. ही चित्रे ज्या कथा सांगतात त्या जगभरातील कला रसिकांना आवडतात. गोंड कलाकारांनी अत्यंत अभिनव तंत्रांचा वापर करून अत्यंत कल्पकतेने समकालीन माध्यमांशी जुळवून घेतले आहे. ही चित्रे बिंदूंपासून सुरु होतात आणि प्रतिमेच्या आकाराचा अंदाज घेत हे बिंदू जुळवून आकार तयार केले जातात आणि त्यांमध्ये अत्यंत आकर्षक रंग भरले जातात. या कलाकृतींवर, कलाकारांच्या सामाजिक वातावरणाचा प्रभाव दिसून येतो तसेच त्यात दैनंदिन जीवनातील वस्तूंचे आकार कलात्मकरित्या रुपांतरीत केलेले दिसतात. गोंड जमातीच्या कलात्मक कल्पकतेचा आणि त्यांच्या भोवतालाशी असलेल्या त्यांच्या सखोल संबंधांची साक्ष ही चित्रे देतात.

"कुंचल्याच्या प्रत्येक फराट्यात लखलखती कथा : गोंड कलेचे विश्व"
4. गुजरातच्या हँगिंग कलाकृती: गुजरात राज्यातील दाहोद येथे आढळणाऱ्या भील तसेच पटेलिया जमातींद्वारे निर्मित गुजराती वॉल हँगिंग म्हणजे भिंतीवर लटकवण्याच्या वस्तूंना भिंतींचे सौंदर्य वृद्धींगत करणाऱ्या तसेच प्राचीन गुजराती कला प्रकाराचा आविष्कार करणाऱ्या म्हणून कलारसिकांना प्रिय आहेत. पश्चिम गुजरातच्या भील जमातीने तयार केलेल्या या हँगिंग्ज म्हणजे सुरुवातीला सुती कपडे आणि पुनर्नवीकरणीय साहित्यापासून निर्मित बाहुल्या किंवा पाळण्यावर लटकावून ठेवण्याचे पक्षी होते. आता मात्र, परंपरेचे जतन करतानाच आधुनिक पद्धतींचा स्वीकार करण्याच्या दृष्टीने या कलाप्रकारात आरसे, जरी, खडे आणि मणी यांचा देखील वापर करण्यात येतो.

गुजरात मधल्या दाहोद इथल्या भील आणि पटेलिया जमातींद्वारे निर्मित हँगिंग कलाकृती
5. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या शाली : मुळात काळ्या, पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या एकरंगी छटा दाखवणारे आदिवासी कारागिरीचे जग एका परिवर्तनाचे साक्षीदार होत आहे. सध्या प्रचलित असलेल्या दुहेरी-रंगातील डिझाईन्स नव्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठांमध्ये पसंती घेत आहेत. हिमाचल प्रदेश / जम्मू काश्मीर मधील बोध, भुतिया आणि गुजर बकरवाल जमाती मेंढीच्या शुद्ध लोकरीपासून बनवलेल्या जॅकेटपासून शाल आणि स्टोल्सपर्यंतच्या विविध प्रकारच्या वस्त्रांच्या निर्मितीमधून त्यांच्या अजोड कारागिरीचे दर्शन घडवतात. या प्रक्रियेत प्रचंड मेहनत असली तरी ती अत्यंत जिव्हाळ्याने केलेली असते. हातमागावर चार पेडल्स आणि शिलाई मशीनसह बारकाईने विणकाम केले जाते. मेंढीच्या लोकरीचे धागे अतिशय गुंतागुंतीच्या डायमंड, प्लेन आणि हेरिंगबोन नमुन्यांमध्ये विणले जातात.

"Showcasing of Sheep wool from Himachal Pradesh/Jammu & Kashmir"
6. अराकू व्हॅली कॉफी: आंध्र प्रदेशातील नयनरम्य अशा अराकु व्हॅली मध्ये तयार होणारी ही कॉफी तिच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी आणि शाश्वत लागवड पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. ही कॉफी भारताच्या नैसर्गिक संपत्तीची झलक दाखवते. प्रिमियम कॉफी बीन्सची लागवड करून, ते कापणीपासून लगदा आणि भाजण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली जाते आणि त्यानंतर तयार होते ती अत्यंत चविष्ट कॉफी. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली अराकू व्हॅली अरेबिका कॉफी, तिच्या लाजवाब चवीसाठी, उत्साहवर्धक सुगंध आणि अतुलनीय शुद्धतेसाठी अतिशय लोकप्रिय आहे.

"Display of Araku Coffee & other natural products"
7. राजस्थान मधील कलात्मकतेचे दर्शन: मोझॅक दिवे, अंबाबारी धातूकाम, आणि मीनाकारी हस्तकला:
राजस्थान मध्ये उगम पावलेल्या या विणकामातल्या कुशल कारागिरीमधून एका समृद्ध आदिवासी वारसा प्रतिबिंबित होतो.
काचेच्या वस्तूंवरील मोझॅक पॉटरी हा कलाप्रकार वापरून अत्यंत काळजीपूर्वक तयार केलेल्या लॅम्प शेड्स आणि मेणबत्ती स्टॅन्ड सारख्या वस्तूंमध्ये मोझॅक कला शैलीचे दर्शन घडते, या वस्तुंमध्ये दीप प्रज्वलित केल्यावर तयार होतो तो रंगांचा तेजस्वी कॅलिडोस्कोप अगदी कानाकोपऱ्याला देखील उजळून टाकणारा जिवंतपणा अनुभवता येतो.
मीनाकारी ही एक अशी कला आहे ज्यामध्ये एखाद्या धातूचा पृष्ठभाग नैसर्गिक द्रव्यांच्या साहाय्याने सजवला जातो. या कलाप्रकाराचा आरंभ मुघलांनी केला. या राजस्थानी पारंपरिक अदाकारीला अपवादात्मक कौशल्य लागते. धातूवर नाजूक डिझाईन्स कोरल्या जातात, रंग आतवर जावेत यासाठी वस्तूवर खोबणी तयार केली जाते. प्रत्येक रंग हा स्वतंत्रपणे चढवला जातो आणि मग तयार होते कारागिरीचा मुलामा चढवून सुशोभित केलेली अतिशय अद्भुत कलाकृती.
मीना या जमातीने तयार केलेल्या मेटल अंबाबारी क्राफ्टमध्ये मुलामा चढवणे ही प्रक्रिया देखील केली जाते, ही एक सूक्ष्म प्रक्रिया असून त्यामुळे त्या धातूच्या वस्तूंचे सौदर्य अजूनच खुलते . आज, ही कला सोन्याच्या पलीकडे चांदी आणि तांब्यासारख्या धातूंपर्यंत विस्तारली आहे. या कलाकृतीचा प्रत्येक साज राजस्थानचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कारागिरी दर्शवतो.

"Display of Home Décor products from Rajasthan"
या कलाकृतीच्या वस्तू म्हणजे केवळ सजावटीच्या वस्तू नाहीत तर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि वारशाचे मूर्तिमंत स्वरूप आहेत.
* * *
N.Chitale/Sanjana/Bhakti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956445)