अंतराळ विभाग
चांद्रयान 3 बुधवारी चंद्रावर उतरण्याविषयीची सद्यस्थिती आणि सज्जतेबद्दल इस्रोच्या अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांना दिली माहिती
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2023 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2023
इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव डॉ एस सोमनाथ यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणूऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची आज नवी दिल्ली इथे भेट घेतली आणि त्यांना चांद्रयान 3च्या चंद्रावर उतरण्यासंदर्भातली सद्यस्थिती आणि सज्जता याविषयी माहिती दिली. नियोजित कार्यक्रमानुसार चांद्रयान 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे.

इस्रोच्या अध्यक्षांनी डॉ सिंह यांना चांद्रयान 3 च्या सद्यस्थिती बद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की सर्व प्रणाली योग्य रीतीने काम करत असून बुधवारी यान उतरताना काही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस, चांद्रयानावर सातत्याने देखरेख ठेवली जाईल. चंद्रावर उतरण्यासंदर्भातला सर्व कार्यक्रम दोन दिवस आधी लोड केला जाईल आणि त्याचे परीक्षण केले जाईल.
डॉ सिंह यांनी विश्वास व्यक्त केला की यावेळी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ मोहिमांचा एक नवा इतिहास घडवला जाईल अशी आशाही व्यक्त केली.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयन 3 चंद्रावर 23 ऑगस्ट 2923 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:04 वाजता उतरण्यास सज्ज आहे. चांद्रयन 2 मोहीम पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही कारण हार्ड लँडिंगमुळे यानाशी असलेला संपर्क तुटला होता. यावेळी चांद्रयान 3 लँडर मोड्यूल आणि अजूनही कक्षेत भ्रमण करत असलेल्या चांद्रयान 2 ऑर्बिटर यांच्यात दुहेरी संपर्क राखण्यात इस्रो यशस्वी झाली आहे. आज चांद्रयान 3 ने टिपलेली चंद्राच्या दुरवरच्या भागातील छायाचित्रे प्रसिद्ध केली .

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर आपले यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल, मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश असेल.
चांद्रयान तीन ची मुख्य तीन उद्दिष्टे आहेत – 1) चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग म्हणजे अलगद उतरणे 2) चंद्रावर रोव्हर रोविंग आणि 3) तिथे स्थापित होऊन वैज्ञानिक प्रयोग करणे.
डॉ जितेंद्र सिंह यांनी चांद्रयान मालिकेतील पहिले यान म्हणजेच चांद्रयान एक चे स्मरण केले. या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा शोध लावला होता, जी संपूर्ण जगासाठी एक नवी माहिती होती आणि जगातील सर्वात प्रमुख म्हणवली जाणारी अमेरिकेची अवकाश संस्था नासा सुद्धा या शोधामुळे आश्चर्यचकित झाली होती तसेच, या माहितीचा त्यांनी त्यांच्या पुढच्या प्रयोगांमधे उपयोग केला होता, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
चांद्रयान -3 अभियान 14 जुलै 2030 सुरू करण्यात आले, या दिवशी जीएसएलव्ही मार्क 3 (एल व्ही एम 3) ह्या जड अवकाश यानांचे वहन करू शकणाऱ्या प्रक्षेपक यानावरुन आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले होते.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950859)
आगंतुक पटल : 375
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam