ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कांद्याच्या राखीव साठ्यात  यावर्षी (बफर) 3 लाख मेट्रिक टना वरून 5 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढ


राष्ट्रीय भारतीय  सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) उद्यापासून (सोमवार)  25 रुपये किलो या किरकोळ दराने कांद्याची विक्री करणार

Posted On: 20 AUG 2023 2:56PM by PIB Mumbai

 

कांद्याच्या 3.00 लाख मेट्रिक टन प्राथमिक खरेदीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर, अभूतपूर्व पाऊल उचलत सरकारने यावर्षी कांद्याच्या राखीव साठ्याचे ( बफर)  प्रमाण 5.00 लाख मेट्रिक टन केले.  या संदर्भात अतिरिक्त खरेदीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी, ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ आणि नाफेडला प्रत्येकी 1.00 लाख टन खरेदी करण्याचे निर्देश दिले असून त्याचबरोबर प्रमुख खरेदी केंद्रांमध्ये खरेदी केलेल्या साठ्याचा निपटारा  करण्यात येणार आहे. 

ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील बाजारपेठांमध्ये  कांद्याच्या किरकोळ किंमती  देश पातळीवरच्या  सरासरीपेक्षा जास्त आहेत किंवा मागील महिन्याच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आहेत अशा बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करून राखीव साठ्यामधून (बफर) कांद्याची विक्री करण्यास  सुरुवात झाली आहे. आजपर्यंत, राखीव साठ्यामधून सुमारे 1,400 मेट्रिक टन कांदा लक्ष्यित बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला आहे आणि उपलब्धता वाढवण्यासाठी तो सातत्याने पाठवला  जात आहे.

प्रमुख बाजारपेठेत कांदा पाठवण्याव्यतिरिक्त, बफरमधील कांदा किरकोळ ग्राहकांना देखील  25/- प्रति किलो अनुदानित दराने किरकोळ दुकाने आणि एनसीसीएफच्या फिरत्या वाहनाद्वारे  उद्यापासून म्हणजेच सोमवार 21 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध करून दिला जाणार आहे.इतर संस्था  आणि ई-वाणिज्य मंचाचा समावेश करून आगामी काळात कांद्याची किरकोळ विक्री योग्यरित्या वाढवली जाईल.

राखीव साठ्यासाठी  कांदा खरेदी, लक्ष्यित बाजारपेठांसाठी  कांदा पाठवणे  आणि निर्यात शुल्क लागू करणे यांसारख्या सरकारने केलेल्या बहुआयामी उपाययोजनांमुळे, कांदा उत्पादकांना किफायतशीर भाव मिळून ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत कांद्याची सतत उपलब्धता सुनिश्चित केल्यामुळे  शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होईल.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950615) Visitor Counter : 182