पंतप्रधान कार्यालय
तीन दशकांची अनिश्चितता, अस्थिरता आणि राजकीय अनिवार्यता पश्चात एक मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन केल्याबद्दल पंतप्रधानांनी देशवासियांचे केले अभिनंदन
सरकार ‘सर्व जन हिताय, सर्व जन सुखाय’ साठी प्रत्येक क्षण आणि जनतेच्या पैशातील पै न पै समर्पित करत आहे: पंतप्रधान
देशातील समतोल विकासासाठी विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या नवनिर्मित मंत्रालयांची भूमिका मोदी यांनी केली अधोरेखित
Posted On:
15 AUG 2023 12:44PM by PIB Mumbai
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून 140 कोटी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दशकांच्या अनिश्चितता, अस्थिरता आणि राजकीय अनिवार्यता पश्चात एक मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन केल्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, देशात आज असे सरकार आहे जे देशाच्या समतोल विकासासाठी प्रत्येक क्षण आणि जनतेच्या पैशातील पै न पै 'सर्व जन हिताय, सर्व जन सुखाय'साठी समर्पित करत आहे.
सरकार फक्त "राष्ट्र प्रथम " या एका मापदंडाशी जोडले आहे असे पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केले. सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय याच दिशेने आहे, असेही ते म्हणाले. भारताच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असलेल्या आणि ‘परिवर्तनासाठी कामगिरी’ बजावणारी नोकरशाही हा आपला कणा आहे "आणि त्यांच्यामुळेच 'सुधारणा, कामगिरी , परिवर्तन' चा हा काळ आता भारताच्या भविष्याला आकार देत आहे. आणि आम्ही देशातील अशा शक्तींना प्रोत्साहन देत आहोत, ज्या पुढील हजार वर्षांचा पाया मजबूत करणार आहेत,” असे ते पुढे म्हणाले.
संतुलित विकासासाठी नवीन मंत्रालये स्थापन
विविध क्षेत्रांमध्ये नवीन मंत्रालये स्थापन करून देशातील समतोल विकासासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी विस्तृत माहिती दिली. जगाला युवाशक्तीची गरज आहे आणि युवकांना कौशल्याची गरज असल्याचे मोदी म्हणाले. कौशल्य विकासाचे नवे मंत्रालय केवळ भारताच्याच गरजा पूर्ण करणार नाही, तर जगाच्या गरजाही पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जलशक्ती मंत्रालय आपल्या देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचेल हे सुनिश्चित करण्यावर भर देत आहे असे मोदी म्हणाले. "पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संवेदनशील प्रणालींच्या विकासाचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत आणि त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत" असे ते पुढे म्हणाले. कोरोना महामारीच्या संकटकाळात भारताने कसा मार्ग दाखवला याविषयी बोलताना ते म्हणाले की, सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केली आणि आज योग आणि आयुष जगात लोकप्रिय झाले आहे. भारताने कोरोनावर मात केल्यानंतर, जग सर्वांगीण आरोग्य सेवेच्या शोधात आहे, जी काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी सरकारचे आधारस्तंभ आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे असा त्यांचा उल्लेख केला. नवीन मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे जेणेकरून समाजातील आणि त्या वर्गातील कोणीही सरकारने जाहीर केलेल्या लाभांपासून वंचित राहणार नाही असेही ते म्हणाले.
मोदी यांनी सहकारी चळवळ ही समाजाच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख भाग असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, नव्याने स्थापन झालेले सहकार मंत्रालय सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपले जाळे पसरवत आहे जेणेकरून गरीबांचे म्हणणे ऐकले जाईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. एका छोट्या घटकाचा भाग बनून राष्ट्राच्या विकासासाठी संघटितपणे योगदान देण्यासाठी मंत्रालय त्यांना सुविधा पुरवत आहे. सहकारातून समृद्धीचा मार्ग आपण स्वीकारला आहे, असेही ते म्हणाले.
***
Jaydevi/Sushama/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1948939)
Visitor Counter : 144
Read this release in:
Kannada
,
Khasi
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam