ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

टोमॅटोच्या वाढत्या किरकोळ किंमतीला आळा घालण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने प्रमुख विक्री केंद्रांमध्ये वितरणासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे दिले निर्देश


दिल्ली-एनसीआर क्षेत्रासह तुटवडा असलेल्या ठिकाणी ग्राहकांना सवलतीच्या दरात मिळणार टोमॅटो

राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ मंडईतून करणार टोमॅटोची खरेदी

Posted On: 12 JUL 2023 2:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडयांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल. या आठवड्यात शुक्रवारपर्यंत टोमॅटोचा साठा किरकोळ दुकानांच्या माध्यमातून दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वितरित केला जाईल.

गेल्या एका महिन्यात ज्या केंद्रांमध्ये प्रचलित किंमती देशभरातील सरासरी किंमतीपेक्षा जास्त आहेत अशा केंद्रांमध्ये टोमॅटोचा साठा वितरित केला जाईल.  ज्या राज्यांमध्ये अशा केंद्रांचे प्रमाण जास्त आहे अशा प्रमुख केंद्रांची  हस्तक्षेपासाठी निवड करण्यात आली आहे.

टोमॅटोचे उत्पादन भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात होते.  बहुतांश उत्पादन भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात होते, ज्यांचा एकूण उत्पादनात 56% ते  58% वाटा आहे. दक्षिण आणि पश्चिम प्रदेशात अतिरिक्त उत्पादन होत असल्यामुळे पिकाच्या हंगामानुसार इतर बाजारपेठांना त्याचा पुरवठा केला जातो. प्रत्येक भागातील पिकाचा हंगाम देखील भिन्न आहे. पीक कापणीचा हंगाम डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालखंड टोमॅटोसाठी कमी उत्पादनाचा असतो. जुलै महिना पावसाळ्याच्या ऋतूचा असल्यामुळे वितरणाशी संबंधित आणखी आव्हाने आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे किंमती वाढतात. लागवड आणि कापणीच्या हंगामाचे चक्र आणि प्रदेशांमधील विविधता हे घटक टोमॅटोच्या किंमतीला प्रामुख्याने जबाबदार आहेत. सामान्य किमतीच्या हंगामाव्यतिरिक्त, पुरवठा साखळीतील तात्पुरता व्यत्यय आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान यामुळे अनेकदा किमतींमध्ये अचानक वाढ होते.

सध्या, महाराष्ट्रातून विशेषत: सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमधील बाजारपेठांमध्ये पुरवठा होतो, जो या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशातील मदनापल्ली (चित्तूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमधील आवक प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातून आणि काही प्रमाणात कर्नाटकातील कोलारमधून होते.

नाशिक जिल्ह्यातून लवकरच नवीन पिकांची आवक होणे अपेक्षित आहे. शिवाय, ऑगस्टमध्ये नारायणगाव आणि औरंगाबाद पट्ट्यातून अतिरिक्त पुरवठा होणे अपेक्षित आहे. मध्य प्रदेशातूनही आवक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  नजीकच्या काळात दर कमी होण्याची शक्यता आहे.

 

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938886) Visitor Counter : 192