पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 07 JUL 2023 6:27PM by PIB Mumbai

श्री हरिः। वसुदेव सुतं देवं, कंस चाणूर-मर्दनम्।

देवकी परमानन्दं, कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गीता प्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या श्री हरिः। वसुदेव सुतं देवं, कंस चाणूर-मर्दनम्।

देवकी परमानन्दं, कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गीताप्रेसचे केशोराम अग्रवाल, विष्णू प्रसाद, खासदार रवि किशन, इतर मान्यवर, स्त्री आणि पुरूषगण .

पवित्र श्रावण महिना, भगवान इंद्राचा आशीर्वाद, शिवावतार गुरु गोरखनाथांचे तपस्थळ आणि अनेक संतांचे कार्यस्थान असलेली ही गोरखपूरची गीताप्रेस . जेव्हा संतांचा आशीर्वाद फलदायी ठरतो, तेव्हा अशा मंगल प्रसंगाचा लाभ मिळतो. यावेळची माझी गोरखपूर भेट ही 'विकासाबरोबरच वारसाही' या धोरणाचे उत्तम उदाहरण आहे. मला नुकतेच सचित्र शिवपुराण आणि नेपाळी भाषेत शिवपुराण प्रकाशित करण्याचे भाग्य लाभले आहे. गीता प्रेसच्या या कार्यक्रमानंतर मी गोरखपूर रेल्वे स्थानकावर जाणार आहे. गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे कामही आजपासून सुरू होणार आहे. आणि जेव्हापासून मी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत, तेव्हापासून लोक आश्चर्याने पाहत आहेत. रेल्वे स्थानकांचाही अशाप्रकारे कायापालट होऊ शकतो, असा विचारही लोकांनी केला नव्हता. आणि त्याच कार्यक्रमात मी गोरखपूर ते लखनौ या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. आणि त्याचवेळी जोधपूर ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला जाईल. वंदे भारत रेल्वेगाडीने देशातील मध्यमवर्गाला सुविधा आणि सोयींचें एक नवीन दालन खुले करून दिले आहे. एक काळ असा होता की आमच्या भागात या रेल्वेगाडीला किमान थांबा द्या, त्या गाडीला थांबा द्या, अशी पत्रे नेते लिहायचे. आज देशाच्या कानाकोपऱ्यातील नेते मला पत्र लिहून वंदे भारत आपल्या प्रदेशातूनही चालवा, अशी विनंती करतात. ही वंदे भारताची मोहिनी आहे. या सर्व घटनांसाठी मी गोरखपूरच्या जनतेचे आणि देशातील जनतेचे अभिनंदन करतो.

मित्रहो ,

गीताप्रेस हे जगातील एकमेव मुद्रणालय आहे, जे केवळ एक संस्था नसून जिवंत श्रद्धा आहे. गीता प्रेसचे कार्यालय कोट्यवधी लोकांसाठी मंदिरापेक्षा कमी नाही. त्याच्या नावातही गीता आहे आणि त्याच्या कार्यातही गीता आहे. आणि जिथे गीता आहे तिथे साक्षात् कृष्ण आहे. आणि जिथे कृष्ण आहे तिथे करुणा आहे, कर्मदेखील आहे. ज्ञानाची अनुभूती आहे तसेच विज्ञानाचे संशोधनही आहे. कारण, गीतेचे वाक्य आहे- 'वासुदेव: सर्वम्'. सर्व काही वासुदेव आहे, सर्व काही वासुदेवामुळेच आहे, सर्व काही वासुदेवातच आहे.

बंधूंनो आणि भगिनींनो,

1923 मध्ये गीताप्रेसच्या रूपाने येथे जो अध्यात्मिक प्रकाशाचा द्वीप प्रज्वलित झाला, आज त्याचा प्रकाश संपूर्ण मानवतेला मार्गदर्शन करत आहे. आपले भाग्य आहे की आपण सर्वजण या मानवतावादी कार्याच्या शताब्दीचे साक्षीदार बनत आहोत. या ऐतिहासिक प्रसंगी आपल्या सरकारने गीताप्रेसला गांधी शांतता पुरस्कारही दिला आहे. गांधींजींचे गीता प्रेसशी भावनिक बंध होते. एकेकाळी गांधीजी ही कल्याण पत्रिकेच्या माध्यमातून गीता प्रेससाठी लिखाण करीत असत. आणि मला सांगण्यात आले की कल्याण पत्रिकेत जाहिराती प्रकाशित करू नयेत असे गांधीजींनीच सुचवले होते. गांधीजींच्या त्या सूचनेचे कल्याण पत्रिका अजूनही शतप्रतिशत पालन करत आहे. गीताप्रेसला आज हा पुरस्कार मिळाला याचा मला आनंद आहे. गीताप्रेसबद्दल देशाचा आदर, त्यांच्या योगदानाचा आदर आणि 100 वर्षांच्या वारशाचा हा आदर आहे. या 100 वर्षात गीताप्रेसची कोट्यावधी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकडा कधी 70 सांगतो, कुणी 80 सांगतो, कुणी 90 कोटी सांगतो! ही संख्या कोणालाही आश्चर्यचकित करू शकते. आणि ही पुस्तके छपाई किमतीपेक्षा कमी किमतीत विकली जातात, घरोघरी पोहोचवली जातात. तुम्ही कल्पना करू शकता, ज्ञानाच्या या प्रवाहाने अनेकांना आध्यात्मिक-बौद्धिक समाधान दिले असेल. समाजासाठी किती समर्पित नागरिक निर्माण झाले असतील. या ज्ञानयज्ञात कोणत्याही प्रसिद्धीशिवाय निस्वार्थपणे सहकार्य करणाऱ्या त्या व्यक्तींचे मी अभिनंदन करतो. या प्रसंगी सेठजी श्री जयदयाल गोयंका आणि भाईजी श्री हनुमान प्रसाद पोद्दार यांसारख्या व्यक्तिमत्त्वांना मी आदरांजली वाहतो.

मित्रहो,

गीताप्रेससारखी संस्था केवळ धर्म आणि कार्याशी निगडित नाही, तर तिचे राष्ट्रीय चारित्र्यही आहे. गीताप्रेस भारताला जोडते, भारताची एकता मजबूत करते. त्याच्या देशभरात 20 शाखा आहेत. आपल्याला देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे स्थानकांवर गीताप्रेसचे स्टॉल दिसतात. यांची 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये सुमारे 1600 प्रकाशने आहेत. गीताप्रेस भारताचे मूलभूत विचार विविध भाषांमध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवते. गीताप्रेस एक प्रकारे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेचे प्रतिनिधित्व करते.

मित्रहो,

देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना गीताप्रेसने 100 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. अशा प्रकारच्या घटना निव्वळ योगायोग नसतात. 1947 पूर्वी, भारताने आपल्या पुनर्जागरणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले. भारताचा आत्मा जागृत करण्यासाठी विविध संस्था उदयास आल्या. याचा परिणाम असा झाला की 1947 पर्यंत भारत मनाने आणि आत्म्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता.

गीताप्रेसची स्थापना देखील याचा एक खूप मोठा आधार बनली. शंभर वर्षांपूर्वीचा असा कालखंड ज्यावेळी शतकानुशतकाच्या गुलामगिरीने भारताची चेतना नष्ट केली होती. तुम्हाला देखील ठाऊक आहे की शेकडो वर्षांपूर्वी परदेशी आक्रमकांनी आपली ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांच्या कालखंडात गुरुकुल आणि गुरु-शिष्य परंपरा जवळजवळ नष्ट करण्यात आल्या होत्या. अशा वेळी साहजिकच आपले ज्ञान आणि वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर होते. आपले पूज्य ग्रंथ नाहिसे होऊ लागले होते. जे छापखाने भारतात होते ते महागड्या दरांमुळे सामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर होते. तुम्हीच कल्पना करा, गीता आणि रामायणाशिवाय आपला समाज कसा चालत होता असेल? जेव्हा मूल्ये आणि आदर्शांचे स्रोतच आटून जातात, तेव्हा समाजाचा प्रवाह आपोआपच थबकू लागतो. पण मित्रांनो आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भारताच्या अनादि प्रवासात असे अनेक टप्पे आले आहेत ज्यावेळी आपण आणखी जास्त तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत. कित्येकदा अधर्म आणि दहशत यांचे सामर्थ्य वाढले, कित्येकदा सत्यावर संकटाच्या ढगांचे सावट निर्माण झाले, पण त्यावेळी आपल्याला श्रीमद भागवत गीतेमधूनच सर्वात मोठा विश्वास मिळतो- “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्” अर्थात ज्या ज्या वेळी धर्माच्या सत्तेवर, सत्याच्या सत्तेवर संकटे येतात, त्या त्या वेळी ईश्वर त्याच्या रक्षणासाठी प्रकट होतात. आणि गीतेचा दहावा अध्याय सांगतो की ईश्वर कित्येक विभूतींच्या रुपात समोर येऊ शकतात. कधी कोणी संत येऊन समाजाला नवी दिशा दाखवतात. तर कधी गीता प्रेस सारख्या संस्था मानवी मूल्ये आणि आदर्शांना पुनरुज्जीवित करण्यासाठी जन्म घेतात. यामुळेच 1923 मध्ये ज्यावेळी गीता प्रेसने आपले कामकाज सुरू केले त्यावेळी भारतासाठी देखील त्याची चेतना आणि चिंतनाचा प्रवाह वेगवान झाला. गीतेसह आपल्या धर्मग्रंथांचा सूर घरा-घरात घुमू लागला. मानस पुन्हा एकदा भारतीय मानसामध्ये मिसळू लागला. या ग्रंथांमुळे कौटुंबिक परंपरा आणि नवीन पिढ्या जोडल्या जाऊ लागल्या, आपले पवित्र ग्रंथ भावी पिढ्यांचे आदर्श बनू लागले.  

मित्रांनो,

गीताप्रेस या गोष्टीचा देखील दाखला आहे की जेव्हा तुमचे उद्देश पवित्र असतात, तुमची मूल्ये पवित्र असतात तेव्हा यश आपोआपच तुमचा पर्याय बनते. गीता प्रेस एक अशी संस्था आहे जिने नेहमीच सामाजिक मूल्यांना समृद्ध केले आहे, लोकांना कर्तव्यपथाचा मार्ग दाखवला आहे. गंगा जीच्या स्वच्छतेचा विषय असो, योग विज्ञानाचा विषय असो, पतंजली योग सूत्राचे प्रकाशन असो, आयुर्वेदाशी संबंधित आरोग्य अंक असो, भारतीय जीवनशैलीसोबत लोकांचा परिचय करून देण्यासाठी ‘जीवनचर्या अंक’ असो, समाजसेवेचे आदर्श बळकट करण्यासाठी ‘सेवा अंक’ आणि ‘दान महिमा’ असो, या सर्व प्रयत्नांच्या मागे, राष्ट्रसेवेची प्रेरणा जोडलेली आहे, राष्ट्र निर्माणाचा संकल्प राहिला आहे.

मित्रांनो,

संतांची तपश्चर्या कधीही निष्फळ होत नाही, त्यांचे संकल्प कधी शून्य होत नाहीत. याच संकल्पांचा हा परिणाम आहे की आज आपला भारत दररोज यशाचे नवे आयाम प्रस्थापित करत आहे. मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते. आणि तुम्हाला लक्षात असेल, मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की हा काळ गुलामगिरीच्या मानसिकतेमधून मुक्त होऊन आपल्या वारशाचा अभिमान व्यक्त करण्याचा काळ आहे. आणि म्हणूनच सुरुवातीला देखील मी सांगितले, आज देश विकास आणि वारसा या दोघांना सोबत घेऊन वाटचाल करत आहे. आज एकीकडे भारत डिजिटल तंत्रज्ञानात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे, तर त्याबरोबरच अनेक शतकांनी काशीमध्ये विश्वनाथ धामचे दिव्य स्वरुप देखील देशाच्या समोर प्रकट झाले आहे. आज आम्ही जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार करत आहोत, तर त्याबरोबरच केदारनाथ आणि महाकाल महालोक सारख्या तीर्थक्षेत्रांच्या भव्यतेचे साक्षीदार देखील बनत आहोत. अनेक शतकांनंतर अयोध्येत भव्य राममंदिराचे आपले स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण नौदलाच्या झेंड्यावर गुलामगिरीचे प्रतीक वाहत होतो. आपण राजधानी दिल्लीत भारतीय संसदेच्या शेजारी इंग्रजी परंपरांवर चालत होतो. आम्ही संपूर्ण आत्मविश्वासाने यांना बदलण्याचे काम केले आहे. म्हणूनच आता भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चिन्ह दिसत आहे. गुलामगिरीच्या काळातील राजपथ आता कर्तव्यपथ बनून कर्तव्यभावनेची प्रेरणा देत आहे. आज देशातील आदिवासी परंपरांचा सन्मान करण्यासाठी देशभरात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची संग्रहालये उभारण्यात येत आहेत. आपल्या ज्या पवित्र मूर्ती चोरून देशाबाहेर पाठवण्यात आल्या होत्या त्या देखील आता आपल्या मंदिरात परत येत आहेत. ज्या विकसित आणि आध्यात्मिक भारताचा विचार आपल्या विचारवंतांनी आपल्याला दिला, आज आपण तो सार्थ होताना पाहात आहोत. मला विश्वास आहे, आपले संत-ऋषी, मुनी, त्यांची आध्यात्मिक साधना भारताच्या सर्वांगीण विकासाला अशाच प्रकारे ऊर्जा देत राहील. याबरोबरच तुम्हा सर्वांनी या पवित्र प्रसंगी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी दिली आणि मला देखील या पवित्र कार्यात काही क्षण का होईना तुमच्यामध्ये घालवण्याची संधी मिळाली, हे माझ्या जीवनातील परम भाग्य आहे. तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो, खूप खूप शुभेच्छा देतो    

***

JaydeviPS/Sushama/Patil/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938127) Visitor Counter : 147