युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय डोपिंग (उत्तेजक) प्रतिबंधक संस्था, नाडाचा आज नवी दिल्ली येथे दक्षिण आशिया प्रादेशिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेसोबत सामंजस्य करार
क्रीडा क्षेत्रात उत्तेजक प्रतिबंधासाठी प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत करणे, हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट
Posted On:
03 JUL 2023 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2023
क्रीडा क्षेत्रातील डोपिंग विरुद्ध जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्था आणि युनेस्को आंतरराष्ट्रीय करारासंदर्भात भारताचे वाढते योगदान डोपिंगविरोधी चळवळीला पुढे नेण्यासाठी भारताची इच्छाशक्ती आणि दृढ निर्धार दर्शवते: अनुराग ठाकूर
बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशांच्या डोपिंग विरोधी संघटनांचा समावेश असलेल्या दक्षिण आशिया क्षेत्रीय उत्तेजक प्रतिबंध संघटनेसोबत (SARADO) नाडा इंडिया अर्थात राष्ट्रीय डोपिंग (उत्तेजके ) प्रतिबंधक संस्थेने आज नवी दिल्ली येथे झालेल्या दक्षिण आशिया क्षेत्रीय उत्तेजके प्रतिबंध संघटना सहकार्य बैठकीत सामंजस्य करार केला. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा, तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयातील सचिव (क्रीडा ) सुजाता चतुर्वेदी, दक्षिण आशिया क्षेत्रीय उत्तेजक प्रतिबंध संघटना सचिवालय आणि बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रात उत्तेजके प्रतिबंधासाठी प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत करणे, हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचा वाढता सहभाग आणि कामगिरी अधोरेखित केली. तसेच जागतिक डोपिंग विरोधी चळवळीत योगदान देण्याची आणि उत्तेजके मुक्त क्रीडाक्षेत्रासाठी दायित्व घेण्यासाठी भारताची इच्छाशक्ती व्यक्त केली.
''आगामी काळात भारत क्रीडा क्षेत्रात सामर्थ्यवान होण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे,'' असे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. ''युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतिबद्ध असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रीडापटूंची कामगिरी उंचावण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे.”
''उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण, सुलभरित्या उपलब्ध होणाऱ्या सुधारित क्रीडा पायाभूत सुविधा, स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरांद्वारे सर्व खेळांसाठी संधी वाढविण्यावर वाढते लक्ष आणि क्रीडा क्षेत्रातील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न हे जागतिक स्तरावर क्रीडा विकासात योगदान देण्याचा भारताचा निर्धार आणि महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे दर्शवतात " असेही त्यांनी सांगितले.
जगातले उत्तर आणि दक्षिण (विकसित आणि अविकसित) देश यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आणि आशियाई क्षेत्रातील आपल्या मित्रांसाठी आर्थिक तसेच सामाजिक विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी एक सेतू म्हणून काम करत आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था आणि क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी युनेस्को आंतरराष्ट्रीय करारासंदर्भातील भारताचे वाढते योगदान हे जागतिक स्तरावर डोपिंग विरोधी चळवळीला पुढे नेण्यात सहभागी होण्याची भारताची इच्छा आणि दृढ हेतू याद्वारे उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी उपक्रमांना बळकटी करण्यासाठी भारताची निरंतर वचनबद्धता दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
सध्या जी 20 चे अध्यक्षपद भारताकडे असल्याने, भारत आशियाई क्षेत्रातील समस्या आणि दृष्टिकोन जगासमोर मांडण्यावर भर देत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सहकार्याच्या इतर क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी, सक्षम दृष्टिकोनासह हे क्षेत्र विकसित करण्यासाठी आणि उदयास येण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या प्रादेशिक सहकार्याच्या महत्वावरही त्यांनी प्रकाश टाकला.
दक्षिण आशिया प्रादेशिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संघटनेच्या सदस्य देशांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर, क्रीडा क्षेत्रात उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले.
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक संस्थेच्या महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू सैन, आणि दक्षिण आशिया प्रादेशिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक संस्थेचे महासंचालक मोहम्मद माहिद शरीफ यांनी त्यांच्या संस्थांच्या वतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
तीन वर्षांच्या कालावधीत प्रकल्प आराखडा आणि सहकार्याच्या क्षेत्रांद्वारे सामंजस्य कराराची खालील उद्दिष्टे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे:
- दक्षिण आशियामध्ये उत्तेजक द्रव्य विरोधी शिक्षण आणि प्रतिबंध कार्यक्रम विकसित करणे;
- नमुना संकलन कर्मचारी, शिक्षक आणि इतर उत्तेजक द्रव्य विरोधी शिक्षण अधिकारी याचे प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धी ;
- उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी शिक्षण आणि प्रतिबंध यावर अभ्यासक्रम, परिसंवाद, कार्यशाळा, संशोधन आणि विनिमय दौरे आयोजित करणे;
- शिक्षण अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक, प्रशिक्षक, शिक्षक आणि उत्तेजकी द्रव्य सेवन विरोधी शिक्षण आणि प्रतिबंध यावरील तज्ञांची देवाणघेवाण सुविधा;
- उत्तेजन द्रव्य सेवन प्रतिबंधासाठी शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ देणे आणि तज्ञांच्या सेवांची देवाणघेवाण करणे; आणि
- उत्तेजन द्रव्य सेवन प्रतिबंधासाठी शैक्षणिक साहित्य तयार करणे
* * *
N.Chitale/S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937080)
Visitor Counter : 148