पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन- 2023 सोहळ्यावेळी केलेले भाषण

Posted On: 21 JUN 2023 11:30PM by PIB Mumbai

सन्माननीय, कसाबा कोरोसी,

संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष,

सन्माननीय, अमिना मोहम्मद, संयुक्त राष्ट्र संघाच्या उपमहासचिव,

सन्माननीय, एरिक अ‍ॅडम्स, न्यूयॉर्कचे महापौर,

आणि जगभरातील माझ्या प्रिय मित्रांनो,

नमस्कार!

मित्रांनो,

आज या सुंदर सकाळी, आपण येथे संयुक्त राष्ट्र संघात जमलो आहोत.

संपूर्ण मानवजातीच्या संमेलनस्थळी! या रम्य न्यूयॉर्क शहरात! मला माहीत आहे, तुमच्यापैकी बरेच जण लांबून आले आहेत. तुमच्यापैकी बहुतेकजण येथे येण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठले असतील.

तुम्हा सर्वांना पाहून मला आनंद झाला. इथे आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे!

मित्रांनो,

मला सांगण्यात आले आहे की आज येथे जवळपास प्रत्येक राष्ट्राचे प्रतिनिधित्व केले जात आहे. आणि, आपल्या सर्वांना एकत्र आणणारे उत्तम कारण ठरले आहे - योग!

योग म्हणजे - एकत्र येणे. तर, तुमचे एकत्र येणे हे एकप्रकारे योगाच्याच स्वरूपाची अभिव्यक्ती आहे. मला आठवते, सुमारे नऊ वर्षांपूर्वी, इथेच संयुक्त राष्ट्रसंघात, 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्याचा सन्मान मला लाभला होता.

त्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले हे पाहून खूप छान वाटले. मी नुकतेच शूरवीर संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. मी 2015 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघात नवीन स्मारक बांधण्याची मागणी केली होती.

आणि गेल्या आठवड्यात संपूर्ण जगाने हे लवकरच प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताशी हातमिळवणी केली. सर्वात मोठ्या सैन्य तुकडीचे योगदान देणारे राष्ट्र म्हणून, या उदात्त कार्याला पाठिंबा दर्शविल्याबद्दल सर्व राष्ट्रांचे आम्ही आभारी आहोत.

गेल्या वर्षी, 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले. भरडधान्य हे शक्तीशाली अन्न (सुपरफूड) आहे. ते सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देते तसेच पर्यावरणासाठीही चांगले असते. आणि आज, योगासाठी संपूर्ण जग पुन्हा एकत्र आलेले पाहणे आनंददायी आहे!

मित्रांनो,

योग परंपरेचा उगम भारतात झाला आहे. आणि, ही खूप प्राचीन परंपरा आहे. पण सर्व प्राचीन भारतीय परंपरांप्रमाणे ती जिवंत आणि चैतन्यशील आहे. योग विनामूल्य आहे- कॉपीराइटपासून मुक्त, पेटंटपासून मुक्त आणि रॉयल्टी पेमेंटपासून मुक्त आहे. तुमचे वय, लिंग आणि तंदुरुस्ती पातळी या सगळ्यांशी योग जुळवून घेण्यायोग्य आहे. योग कुठेही करता येण्याजोगा आहे - आपण तो घरी, किंवा कामावर किंवा प्रवासातही करू शकतो.

योग लवचिक आहे - तुम्ही एकट्याने किंवा गटात त्याचा सराव करू शकता, शिक्षकाकडून शिकू शकता किंवा स्वत: शिकू शकता. योग एकात्म आहे - तो प्रत्येकासाठी, सर्व जातींसाठी, सर्व धर्मांसाठी आणि सर्व संस्कृतींसाठी आहे. योग हा खऱ्या अर्थाने वैश्विक आहे.

मित्रांनो,

जेव्हा आपण योग करतो तेव्हा आपल्याला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या शांत आणि भावनिकदृष्ट्या समाधानी वाटते. पण फक्त चटईवर बसून करायचा हा व्यायाम नाही. योग ही एक जीवनशैली आहे. आरोग्य आणि कल्याणासाठीचा एक समग्र दृष्टीकोन. विचार आणि कृतींमधील सजगतेचा मार्ग. स्वतःबरोबर, इतरांसह आणि निसर्गाशी सुसंवादाने जगण्याचा एक मार्ग. मला आनंद होत आहे की तुमच्यापैकी बरेच जण योगच्या विविध पैलूंचे वैज्ञानिक प्रमाणीकरण करण्यावर काम करत आहेत. आणि, हाच मार्ग आहे.

मित्रांनो,

मला माहित आहे की तुम्ही सर्वजण सुरुवात करण्यास उत्सुक आहात! मीही आहे. आमचे यजमानपद स्वीकारल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे मला आाज आभार मानायचे आहेत

मी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी महापौर आणि न्यूयॉर्क शहराचा त्यांचा आभारी आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आज येथे आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो. आपण योगाच्या सामर्थ्याचा उपयोग केवळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठीच नाही तर स्वतःशी आणि एकमेकांशी तर सौहार्दभावाने वागण्यासाठीही करुया.

मैत्रीचे पूल, शांततामय जग आणि स्वच्छ, हिरवेगार तसेच शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी योगच्या शक्तीचा उपयोग करूया. "एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य" हे ध्येय साध्य करण्यासाठी आपण एकत्र येऊया. मी या एका मनिषेने समारोप करतो:

सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः

प्रत्येक जण आनंदी होवो, प्रत्येक जण निरोगी होवो!

धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद!

****

 

Samarjit.T/Vinayak/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934454) Visitor Counter : 132