पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी दिली ओदिशाला भेट आणि दुर्दैवी रेल्वे अपघातानंतरच्या बचाव आणि मदत कार्याचा घेतला आढावा
आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या सदस्यांच्या पाठिशी सरकार आहे- पंतप्रधान
या अपघातात जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरवण्यामध्ये कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही- पंतप्रधान
या अपघाताची चौकशी वेगाने करण्याचे आणि यात दोषी आढळलेल्याच्या विरोधात त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
बचाव आणि मदत कार्याबरोबरच रेल्वे मार्ग तातडीने पूर्ववत करण्यासाठी रेल्वे काम करत असल्याची पंतप्रधानांची माहिती
अपघातानंतर तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी केली ओदिशा सरकार, स्थानिक प्रशासन विशेषतः युवा वर्गाची केली प्रशंसा
Posted On:
03 JUN 2023 6:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशाला भेट दिली आणि बालासोर येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघातानंतरच्या बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी रेल्वे अपघातस्थळाला भेट दिली आणि या अपघातातील जखमींना ज्या रुग्णालयात दाखल केले आहे त्या रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
पंतप्रधान म्हणाले की विविध राज्यांमधील जे प्रवासी या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करत होते त्यांना या भीषण अपघाताची झळ पोहोचली आहे. या अपघातातील जीवितहानीविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की या अपघातात जखमी झालेल्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरवण्यामध्ये सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या पाठिशी सरकार आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
या अपघाताची योग्य पद्धतीने आणि वेगाने चौकशी करण्याचे आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांविरोधात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
त्यांनी ओदिशा सरकार, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक जनतेची विशेषतः सध्या सुरू असलेल्या मदतकार्यामध्ये संपूर्ण रात्रभर काम करणाऱ्या युवा वर्गाची प्रशंसा केली. जखमींना मदत करण्याकरिता रक्तदानासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक जनतेची देखील त्यांनी प्रशंसा केली. बचाव आणि मदत कार्याबरोबरच रेल्वेचा मार्ग तातडीने पूर्ववत करण्यासाठी रेल्वे काम करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, आपत्ती निवारण दलाचे कर्मचारी आणि रेल्वे अधिकारी यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या भीषण दुर्घटनेचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘ संपूर्ण सरकार’ या दृष्टीकोनावर भर दिला.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1929689)
Visitor Counter : 195
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam