पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी तिसरी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरु झाल्याची केली घोषणा
“खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा एक भारत श्रेष्ठ भारतचे उत्तम माध्यम बनले आहेत”
"गेल्या 9 वर्षात भारतात खेळांच्या माध्यमातून समाजाला सक्षम बनवण्याचे नवे क्रीडा पर्व सुरू झाले आहे "
"खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे"
"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये क्रीडा हा विषय म्हणून घेण्याचा प्रस्ताव असून तो अभ्यासक्रमाचा भाग बनेल "
“खेलो इंडियाने भारताच्या पारंपारिक खेळांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली आहे”
“भारताची प्रगती तुमच्या प्रतिभेमध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये आहे. तुम्ही भविष्यातील चॅम्पियन आहात "
"खेळ आपल्याला निहित स्वार्थांच्या पुढे जाऊन सामूहिक यशाची प्रेरणा देतो"
Posted On:
25 MAY 2023 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 सुरु झाल्याची घोषणा केली. या स्पर्धेत 21 क्रीडा प्रकारांमध्ये 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4750 हून अधिक खेळाडूंचा सहभाग असेल.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023 च्या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि सांगितले की उत्तर प्रदेश आज क्रीडा प्रतिभांचा संगम बनला आहे. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेणारे 4000 खेळाडू विविध राज्यातून आणि प्रदेशातून आले आहेत असे पंतप्रधान म्हणाले आणि राज्याचे खासदार म्हणून त्यांचे विशेष स्वागत केले. या स्पर्धेचा समारोप समारंभ त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तिसरी खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे महत्त्व लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, ही स्पर्धा सांघिक भावनेसह 'एक भारत श्रेष्ठ भारत'ची भावना जागृत करण्यासाठी एक उत्कृष्ट माध्यम बनले आहे. विविध प्रांतातून येणारे खेळाडू एकमेकांशी संवाद साधतील आणि उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी भेट देतील जिथे या स्पर्धा होत आहेत असे ते म्हणाले. यामुळे अशा ठिकाणांशी अनोखे बंध निर्माण होतील आणि खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतला सहभाग सर्व खेळाडूंसाठी एक सुखद आठवण राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी स्पर्धांमध्ये भरघोस यश मिळवण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 9 वर्षात भारतात खेळांचे नवे पर्व सुरू झाले असून भारताला क्रीडा क्षेत्रात केवळ महासत्ता बनवण्याचे नाही तर खेळाच्या माध्यमातून समाजाला सक्षम बनवण्याचे हे युग आहे असे पंतप्रधान म्हणाले. यापूर्वी खेळांबद्दल उदासीनता होती ,खेळांना सरकारकडून आवश्यक पाठिंबा मिळत नव्हता असे ते म्हणाले. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील मुलांना खेळात प्राविण्य मिळवणे अत्यंत कठीण झाले होते. करिअर म्हणून मर्यादित वाव असल्याने अनेक पालक खेळाकडे दुर्लक्ष करत असे सांगून खेळाकडे पाहण्याच्या पालकांच्या दृष्टिकोनात झालेला मोठा बदल पंतप्रधानांनी अधोरेखित केला. “खेळांकडे आता एक आकर्षक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे आणि त्यात खेलो इंडिया अभियानाने मोठी भूमिका बजावली आहे,”असे ते म्हणाले.
यापूर्वीच्या सरकारांच्या खेळाप्रति असलेल्या वृत्तीचे उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी भारतातील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्यांची आठवण सांगितली. पंचायत युवा क्रीडा और खेल अभियान ज्याला नंतर राजीव गांधी अभियान असे नाव देण्यात आले त्या योजनांमध्ये प्रामाणिकपणा नव्हता असे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या काळात क्रीडा विषयक पायाभूत सुविधांचा अभाव होता असे सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. हे सर्व बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांमधील खेळांच्या पायाभूत सुविधांबाबत पंतप्रधान म्हणाले की, पूर्वीच्या सरकारांनी 6 वर्षात केवळ 300 कोटी रुपये खर्च केले होते, तर खेलो इंडिया अंतर्गत आता 3000 कोटी रुपये क्रीडा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात आले आहेत, ज्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना खेळांकडे वळणे सोपे झाले आहे.
खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत सुमारे 30,000 खेळाडूंनी सहभाग घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. त्यापैकी 1500 खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळत आहे. 9 वर्षांपूर्वीच्या तुलनेत क्रीडा क्षेत्रासाठीच्या तरतुदीत तीन पटीने वाढ झाली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातही खेळांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश बद्दल बोलताना पंतप्रधानांनी लखनौ इथल्या क्रीडा सुविधांच्या विस्ताराचा उल्लेख केला.वाराणसीमधल्या सिगरा स्टेडीयमचे आधुनिकीकरण आणि 400 कोटी रुपयांच्या तरतुदीसह आधुनिक क्रीडा सुविधांच्या निर्मितीचा उल्लेख त्यांनी केला.
क्रीडापटूंना स्पर्धांच्या माध्यमातून चांगला वाव मिळत आहे , यामुळे त्यांना मूल्यांकन आणि सुधारणा करण्याच्या अधिक संधी मिळत आहेत,यावर पंतप्रधानांनी भर दिला. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा सुरू करण्यामागचे हे मुख्य कारण होते आणि या स्पर्धांचा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा आणि खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांपर्यंत विस्तार झाला. आहे. याचे फलीत प्राप्त होत आहे आणि आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगले परिणाम मिळत आहेत, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणात क्रीडा हा विषय म्हणून घेण्याचा प्रस्ताव आहे तिथे तो अभ्यासक्रमाचा भाग होईल आणि देशातील पहिल्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीमुळे या हेतूला आणखी बळ मिळेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली, राज्यांमध्ये क्रीडा-विशेष उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.उत्तर प्रदेश अतिशय प्रशंसनीय काम करत असल्याचे सांगत त्यांनी मेरठमधील मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचे उदाहरण दिले.देशभरात 1000 खेलो इंडिया केंद्रे स्थापन केली जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सुमारे 12 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आली आहेत तिथे कामगिरी सुधारण्यासाठी प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञान समर्थनासाठी पाठबळ प्रदान केले जाते.“खेलो इंडियाने भारताच्या पारंपारिक खेळांनाही पुन्हा प्रतिष्ठा बहाल केली आहे” असे सांगत पंतप्रधानांनी ,गतका, मल्लखांब, थांग-ता, कलारीपयट्टू आणि योगासन यासारख्या विविध देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तींवर प्रकाश टाकला.
खेलो इंडिया कार्यक्रमात महिलांच्या वाढलेल्या सहभागाचा उत्साहवर्धक परिणाम लक्षात घेऊन , खेलो इंडिया महिला लीग देशातील अनेक शहरांमध्ये आयोजित केली जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. "आतापर्यंत विविध वयोगटातील सुमारे 23 हजार महिला खेळाडूंनी यात सहभाग घेतला आहे",असे ते म्हणाले. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंचा मोठा सहभाग नमूद करत पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
“भारताची प्रगती तुमच्या प्रतिभेमध्ये, तुमच्या प्रगतीमध्ये आहे. तुम्ही भविष्यातील चॅम्पियन आहात”, तिरंगा ध्वजाचे वैभव नव्या उंचीवर नेणे ही खेळाडूंची जबाबदारी असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. . खिलाडूवृत्ती आणि सांघिक भावनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी हे केवळ पराभव आणि विजय स्वीकारणे आणि सांघिक कार्य एवढ्यापुरतेच मर्यादित आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. खिलाडूवृत्तीचा अर्थ यापेक्षा व्यापक आहे.खेळ आपल्याला निहित हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन सामूहिक यशासाठी प्रेरित करतो, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले .खेळ आपल्याला मर्यादा आणि नियमांचे पालन करण्यास शिकवतो, असे ते म्हणाले. परिस्थिती विरोधात असताना खेळाडूंनी संयम न गमावता नेहमी नियमांशी बांधील राहिले पाहिजे . मर्यादा आणि नियमांच्या मर्यादेत राहून प्रतिस्पर्ध्यावर संयमाने मात करणे हीच खेळाडूची ओळख असते, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. विजेता तेव्हाच महान खेळाडू बनतो जेव्हा तो नेहमी क्रीडा भावना आणि मर्यादेचे पालन करतो. विजेता तेव्हाच महान खेळाडू बनतो जेव्हा समाज त्याच्या प्रत्येक आचरणातून प्रेरणा घेतो”, असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी देशात क्रीडा संस्कृती विकसित करण्यावर आणि तरुणांना खेळासाठी प्रोत्साहित करण्यावर भर दिला आहे.नवोदित खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत आणि देशातील क्रीडा व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
यावर्षी, तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा उत्तर प्रदेशमध्ये 25 मे ते 3 जून दरम्यान होणार आहेत .या स्पर्धा वाराणसी, गोरखपूर, लखनौ आणि गौतम बुद्ध नगर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या खेळांमध्ये 200 हून अधिक विद्यापीठांमधील 4750 हून अधिक खेळाडूंचा 21 खेळांमध्ये सहभाग असेल. वाराणसी येथे 3 जून रोजी या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार आहे. या क्रीडा स्पर्धांच्या शुभंकराचे नाव जितू असून तो दलदलीतील हरीण (बारशिंगा ) या उत्तर प्रदेशच्या राज्य प्राण्याचे प्रतीक आहे.
* * *
N.Chitale/Sushma/Sonal C/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927380)
Visitor Counter : 371
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam