माहिती आणि प्रसारण मंत्रालय
डॉ.एल मुरुगन यांच्या हस्ते मार्चे डु फिल्म मध्ये इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन,चित्रपटांच्या माध्यमातून भारताच्या कथाकथनामधील सामर्थ्याचे जगाला दर्शन - डॉ. एल मुरुगन
जगाने भारतीय सर्जनशीलता आणि क्षमता केवळ बाहेरून पाहिली आहे : अनुराग ठाकूर
भारताने प्रथमच ईशान्येकडील चित्रपट निर्मात्यांचेच समावेश असलेले शिष्टमंडळ कान येथे पाठवले
कान चित्रपट महोत्सवात क्लासिक विभागात निवड झालेल्या 'इशानौ' या मणिपुरी चित्रपटाचे डिजिटायझेशन करण्यात आल्याची मंत्र्यांची घोषणा
Posted On:
17 MAY 2023 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आज कान चित्रपट महोत्सवात मार्चे डु फिल्म मध्ये इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. यावेळी फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रितुल कुमार आणि भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गज कलाकार उपस्थित होते.
भारत आज 50 हुन अधिक भाषांमधील 3000 हुन अधिक चित्रपटांसह जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता आहे, असे डॉ मुरुगन यांनी भारतीय चित्रपट कलाकार आणि अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला संबोधित करताना सांगितले. या चित्रपटांच्या माध्यमातून जगाला भारताच्या कथाकथनामधील सामर्थ्याचा संदेश दिला जातो.
मुदुमलाईच्या आताच्या प्रसिद्ध एलिफंट व्हिस्परर्सचे उदाहरण देत, मुरुगन म्हणाले की आजच्या काळात उत्तम आशयाला सीमांचे बंधन राहत नाही आणि आपण त्या युगाचे साक्षीदार आहोत, जिथे भारतीय आशय स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर पोहोचत आहे.
अलीकडच्या काळातले भारतीय चित्रपट आणि चित्रपट निर्मात्यांच्या वलयांकित यशाचे स्मरण करत मुरुगन म्हणाले की आज ऍनिमेशन किंवा व्ही एफ एक्स मध्ये श्रेय नामावलीत भारतीय नावाचा समावेश नसलेला एखादा चित्रपट शोधणे देखील कठीण आहे. गेल्या काही वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उदय आणि डिजिटल तसेच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या आगमनामुळे भारतीय चित्रपट उद्योगाने लक्षणीय बदल अनुभवले आहेत, असे त्यांनी सांगितले.
भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र 2023 पर्यंत 11.4% दराने उल्लेखनीय वृद्धी अनुभवण्यासाठी सज्ज असून, त्यातून मिळणारा महसूल तब्बल 2.36 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असे ते म्हणाले. ही उल्लेखनीय उसळी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या सामर्थ्याचा आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या डिजिटल परिदृश्यात नवीन संधी निर्माण करण्याच्या क्षमतेचा दाखला आहे. कोविड महामारीनंतर भारतातील 2022 चे एकूण बॉक्स ऑफिस उत्पन्न 2021 च्या कमाईच्या जवळपास तिप्पट वाढून 1.3 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाले हे आणि 2025 पर्यंत 3 अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
परदेशी चित्रपटांसाठी भारत हा एक आकर्षक स्थान असून चित्रीकरण, सह-उत्पादन, ॲनिमेशन आणि कमी खर्चिक निर्मिती पश्चात प्रक्रिया यांसह आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगासाठी भारताला एक आकर्षक ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे डॉ मुरुगन म्हणाले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या वर्षी कान येथे चित्रपटांना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली, त्यानंतर, कान्स 2023 मध्ये भारताची आश्वासक उपस्थिती ही गती आणखी वाढवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारत जी 20 परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी सिद्ध होत असताना, आम्ही संस्कृती आणि पर्यटन यांचे महत्व अधोरेखित करण्यावर अधिक भर देत आहोत. संस्कृतीला सर्वसमावेशक, शाश्वत, सामाजिक-आर्थिक पुनर्प्राप्ती आणि विकासासाठी तसेच सर्वांसाठी उज्वल भविष्याचा मार्ग खुला करून देण्यासाठी प्रेरक शक्ती म्हणून स्थान देण्यासाठी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या सामर्थ्याचा लाभ घेण्याचे आमचे ध्येय आहे. एक पृथ्वी - एक कुटुंब - एक भविष्य हाच पुढे मार्गक्रमण करण्याचा मार्ग आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले. 'फेस्टिव्हल डी कान्स' ने केवळ आपल्या चित्रपटसृष्टीलाच प्रोत्साहन दिलेले नाही तर भारत-फ्रान्स संबंध अधिक मजबूत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ठाकूर यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
या वर्षी प्रथमच भारताच्या ईशान्येकडील राज्यांतील प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांचे अधिकृत शिष्टमंडळ कान चित्रपट महोत्सवासाठी पाठवले आहे, असे ते म्हणाले. भारतात चित्रपट निर्मितीमध्ये प्रादेशिक विविधता ओळखून आपण त्याला प्रोत्साहन देतो . म्हणूनच कानमध्ये भारताच्या समृद्ध सिनेमॅटिक संस्कृतीची व्याप्ती आणि विविधता दाखवण्यासाठी ही कल्पना राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने यावर्षी कान्स क्लासिक विभागात निवड झालेल्या मणिपुरी भाषेतील ‘इशानौ’ चित्रपटाच्या निगेटिव्हजचे डिजिटलीकरण केल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाकूर पुढे म्हणाले की 3 वेगळ्या श्रेणींमध्ये 3 भारतीय चित्रपट निवडले जाणे आणि त्यापैकी 2 चित्रपटांनी भारताला ऑस्कर जिंकून देणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. भारतीय चित्रपट उद्योगाची सर्जनशीलता, त्यात हाताळले जाणारे विषय आणि तांत्रिक क्षमतांचा अनुभव त्या निमित्ताने जगाने घेतला, असेही त्यांनी नमूद केले. दमदार कथानक, उच्च दर्जाचे कौशल्य-आधारित विषय, पोस्ट-प्रोडक्शन क्षमता आणि 16 देशांसोबत सह-निर्मिती करारांसह, भारत जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, फ्रान्समधील भारताचे राजदूत जावेद अश्रफ यांनी उपस्थितांना संबोधित केले. कान्स आणि इतर महोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात, अधिक संघटितपणे उपस्थित राहण्याचे तसेच भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक आक्रमक दृष्टिकोन ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिला तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या आवाक्याला आणि दर्जाला न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.
चित्रपट उद्योगातील एक मोठी आणि मजबूत बाजारपेठ बनल्यामुळे जागतिक चित्रपट उद्योगासाठी भारत हा महत्त्वाचा देश आहे, असे कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील मार्चे डू फिल्मचे कार्यकारी संचालक गुइलॉम एस्मिओल म्हणाले.
नोव्हेंबर 2023 मध्ये गोव्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पोस्टर आणि ट्रेलरचे अनावरणही या कार्यक्रमात झाले.
S.Kane/Bhakti/Prajna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924960)
Visitor Counter : 185
Read this release in:
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam