पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमध्ये नाथद्वारा इथल्या रु. 5500 कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण
राजसमंद आणि उदयपुर इथल्या मार्गिकांच्या श्रेणी- सुधारणा दुपदरीकरण प्रकल्पांची केली पायाभरणी
उदयपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि गेज परिवर्तन प्रकल्पाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे केले उद्घाटन
राज्याच्या विकासामधून देशाचा विकास, या मंत्रावर भारत सरकारचा विश्वास: पंतप्रधान
जीवन सुलभता वाढवण्यासाठी सरकार आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार
भूतकाळातील अल्प काळासाठीच्या विचारसरणीमुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले, आणि देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली: पंतप्रधान
आधुनिक पायाभूत सुविधा, पुढील 25 वर्षांत विकसित भारताच्या संकल्पपूर्ती मागील शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
आजचा भारत हा एक महत्वाकांक्षी समाज असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
तो दिवस दूर नाही, जेव्हा राजस्थान हे 100 टक्के रेल्वे विद्युतीकरण असलेल्या राज्यांपैकी एक होईल: पंतप्रधानांचा विश्वास
सरकार सेवेच्या भावनेने काम करत आहे,आणि त्यालाच भक्तीभाव मानत आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2023 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये नाथद्वारा इथे रु. 5500 कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. हे विकास प्रकल्प या प्रदेशातल्या पायाभूत सुविधा आणि दळणवळ यावर लक्ष केंद्रित करणारे असून, यामधील रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांमुळे वस्तू आणि सेवांची वाहतूक सुलभ होईल. ज्या योगे, या भागातील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना मिळेल आणि इथल्या नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधानांनी, आपल्याला भगवान श्रीनाथांच्या मेवाड, या वैभवशाली भूमीला भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नाथद्वारा इथल्या मंदिरात, आज सकाळी श्रीनाथजी यांचे घेतलेले दर्शन आणि पूजेचे स्मरण करून, स्वातंत्र्याच्या अमृत काळात विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला आशीर्वाद मिळावा, अशी भावना व्यक्त केली.
ज्या प्रकल्पांचे आज लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात आली, त्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पांमुळे राजस्थानचे देशाच्या इतर भागांबरोबरचे दळणवळण सुधारेल. तर राष्ट्रीय महामार्गाच्या उदयपूर ते शामलाजी विभागाच्या सहा पदरीकरणाचा फायदा उदयपूर, डुंगरपूर आणि बंसवाडा या भागाला मिळेल. राष्ट्रीय महामार्ग-25 च्या बिलारा-जोधपूर विभागामुळे जोधपूर इथून सीमावर्ती भागात पोहोचणे सोपे होईल. ते म्हणाले की जयपूर-जोधपूर दरम्यानच्या प्रवासासाठी लागणारा वेळ तीन तासांनी कमी होईल आणि कुंभलगड आणि हल्दी घाटी यासारख्या जागतिक वारसा स्थळांपर्यंत सहज पोहोचता येईल. "श्री नाथद्वारापासूनचा नवीन रेल्वे मार्ग मेवाडला मारवाडशी जोडेल, आणि संगमरवर, ग्रॅनाइट आणि खाण उद्योग यासारख्या क्षेत्रांना त्याचा फायदा होईल", पंतप्रधान म्हणाले.
राज्याच्या विकासासह राष्ट्राच्या विकासाच्या मंत्रावर भारत सरकारचा विश्वास आहे'' असे सांगत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. हे राज्य भारताचे शौर्य , वारसा आणि संस्कृतीचे वाहक आहे हे अधोरेखित करत ,देशातील विकासाचा वेग थेट राजस्थानच्या विकासाशी संबंधित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकार राज्यातील आधुनिक पायाभूत सुविधांवर विशेष भर देत असल्याचे त्यांनी नमूद केले. आधुनिक पायाभूत सुविधा केवळ रेल्वे आणि रस्ते यापुरत्याच मर्यादित नसून त्या गावे आणि शहरांमधील संपर्क वाढवतात, सोई सुविधांना चालना देतात आणि समाजाला जोडतात तसेच डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवतात आणि लोकांचे जीवनमान सुलभ करतात , याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितले. आधुनिक पायाभूत सुविधा केवळ जमिनीवरील वारशालाच चालना देत नाहीत तर विकासालाही चालना देतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. “आगामी 25 वर्षांत विकसित भारत करण्याच्या संकल्पामागील शक्ती म्हणून आधुनिक पायाभूत सुविधा उदयास येत आहेत”,असे पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक संभाव्य पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक आणि विकासाचा अभूतपूर्व वेग अधोरेखित करताना सांगितले. केंद्र सरकार प्रत्येक पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये मग ते रेल्वे, हवाई मार्ग किंवा महामार्ग असो हजारो कोटींची गुंतवणूक करत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जेव्हा इतकी गुंतवणूक पायाभूत सुविधांमध्ये केली जाते तेव्हा त्याचा थेट प्रभाव त्या प्रदेशाच्या विकासावर आणि रोजगाराच्या संधींवर पडतो , असे पंतप्रधानांनी पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या 10 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीचा संदर्भ देताना सांगितले. भारत सरकारच्या या योजनांनी अर्थव्यवस्थेला नवी गती दिली आहे, असे ते म्हणाले.
देशात नकारात्मकतेला प्रोत्साहन दिल्याचा उल्लेख करत ,आटा की डेटा , रस्ते की उपग्रह अशी वक्तव्ये करत प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या नकारात्मक विचारांच्या लोकांबद्दलही पंतप्रधान यावेळी बोलले. मूलभूत सुविधांसोबतच आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मितीही तितकीच महत्त्वाची असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जे मतांचे राजकारण करतात ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन योजना आखू शकत नाहीत, असे ते म्हणाले. गरजा वाढत असताना त्या पूर्ण करण्यासाठी फार लवकर कमी पडणाऱ्या सोयीसुविधा निर्माण करण्याच्या संकुचित विचारावर त्यांनी टीका केली. अशा विचारामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागली आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीकडे दुर्लक्ष झाले, असे ते म्हणाले.
"यापूर्वी देशातील पायाभूत सुविधांसाठी भविष्यवेधी दृष्टीकोनाचा अभाव असल्यामुळे राजस्थानचे बरेच नुकसान झाले आहे",लोकांना भेडसावणाऱ्या अडचणी या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापर्यंतच मर्यादित नव्हत्या तर त्यात शेती, व्यवसाय आणि उद्योगांचाही समावेश होता, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या काळात 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना सुरू झाली होती,या योजने अंतर्गत 2014 पर्यंत सुमारे 3 लाख 80 हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते बांधले गेले, तर विद्यमान सरकारने या योजनेतून गेल्या नऊ वर्षांत अंदाजे 3 लाख 50 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले याकडे लक्ष वेधत, यापैकी 70 हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते राजस्थानच्याच गावांमध्ये बांधण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले."आता देशातील बहुतांश गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली गेली आहेत",असे ते म्हणाले.
भारत सरकार गावांपर्यंत रस्ते नेण्यासोबतच शहरांना आधुनिक महामार्गांनी जोडत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 2014 पूर्वीच्या दिवसांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग दुप्पट वेगाने बांधले जात आहेत. दौसा येथील दिल्ली -मुंबई द्रुतगती मार्गाच्या एका विभागाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली.
पंतप्रधानांनी सामान्य नागरिकांच्या जीवनात रेल्वेचे महत्त्व काय आहे हे विषद केले. आधुनिक गाड्या, रेल्वे स्थानके आणि ट्रॅक यांसारख्या बहुआयामी उपाययोजनांद्वारे रेल्वेचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनांची माहिती त्यांनी दिली. राजस्थानला पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. मावळी मारवाड विभागातील गेजमध्ये बदल केला गेला आहे. तसेच अहमदाबाद आणि उदयपूर मार्गाचे ब्रॉडगेज पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मानवरहित रेल्वे फाटके काढून टाकल्यानंतर देशातील संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणावर सरकारचा भर आहे, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. उदयपूर रेल्वे स्थानकाप्रमाणेच देशातील शेकडो रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरणही होत आहे आणि प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. मालवाहतूक गाड्यांसाठी एक विशेष ट्रॅक, एक समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बांधला जात आहे, असेही त्यांनी नमूद केले. 2014 च्या तुलनेत राजस्थानचे रेल्वे बजेट चौदा पटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानमधील 75 टक्के रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण आधीच झाले आहे. द्वार बदल आणि मार्ग दुपदरीकरणाचे फायदे डुंगरपूर, उदयपूर, चित्तोड, पाली, सिरोही आणि राजसमंद या जिल्ह्यांना झाले आहेत. 100 टक्के रेल्वे विद्युतीकरण झालेल्या राज्यांमध्ये राजस्थानचा समावेश होईल तो दिवस दूर नाही असे मोदी पुढे म्हणाले.
राजस्थानमधील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांसाठी वाढलेल्या कनेक्टिव्हिटीचे फायदेही पंतप्रधानांनी सांगितले. त्यांनी महाराणा प्रताप यांचा पराक्रम, भामाशहाचे औदार्य आणि वीर पन्ना दाई यांच्या कहाण्यांना उजाळा दिला. काल महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अवघ्या देशाने त्यांना आदरांजली वाहिली. याबद्दल ते बोलत होते. देशाचा वारसा जपण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भगवान कृष्णाशी संबंधित तीर्थक्षेत्रे जोडली जात आहेत. राजस्थानमध्ये गोविंद देव जी, खाटू श्यामजी आणि श्रीनाथजी यांचे दर्शन सुलभ करण्यासाठी कृष्ण सर्किट विकसित केले जात आहे, असे ते म्हणाले. “सरकार सेवेच्या भावनेने काम करत आहे आणि या कार्यभावाला भक्तीभाव मानत आहे”, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले, “जनता जनार्दनसाठी जीवन सुलभ करणे ही सरकारची प्राथमिकता आहे”
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, संसद सदस्य आणि राजस्थान सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी :-
पंतप्रधानांनी राजसमंद आणि उदयपूरमध्ये दुपदरीकरणासाठी रस्ते बांधकाम प्रकल्पांची पायाभरणी केली. जनतेला अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी उदयपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी त्यांनी केली. गेज परिवर्तन प्रकल्पासाठी आणि राजसमंदमधील नाथद्वार ते नाथद्वार शहरापर्यंत नवीन मार्गिका उभारण्यासाठीच्या प्रकल्पाचीही त्यांनी पायाभरणी केली.
पंतप्रधानांनी तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. त्यात उदयपूर ते राष्ट्रीय महामार्ग-48 च्या शामलाजी भागापर्यंतच्या 114 किमी लांबीच्या सहा पदरी मार्गाचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्ग -25 च्या बार-बिलारा-जोधपूर विभागाच्या पक्क्या आरक्षित मार्गासह (तातडीने थांबता यावे यासाठी मुख्य रस्त्याच्या उजवीकडे बांधलेला अतिरिक्त रस्ता) 110 किमी लांबीच्या मार्गाचे चार पदरी रुंदीकरण आणि मजबुतीकरण; आणि राष्ट्रीय महामार्गावर 58E च्या पक्क्या आरक्षित भागासह 47 किमी लांबीच्या दोन लेनचाही त्यात समावेश आहे.
S.Patil/Rajashree/Sonal C/Prajna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1923125)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam