पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वागत उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 27 एप्रिलला होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात, पंतप्रधान होणार सहभागी


गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नरेंद्र मोदी यांनी स्वागत उपक्रमाची केली होती सुरुवात

स्वागत ही देशातील पहिलीच तंत्रज्ञान आधारित तक्रार निवारण व्यवस्था

लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेची तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी या माध्यमातून फार पूर्वी जाणीव करून दिली

स्वागतचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याद्वारे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता येतात

लोकांचे तक्रार निवारण, जलद, सक्षम आणि कालबद्ध स्वरूपात होत असल्याने, या व्यवस्थेतून, जनतेचे जीवनमान सुखकर होण्यास मदत होते

स्वागतच्या माध्यमातून आजवर 99 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले

Posted On: 25 APR 2023 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023

 

गुजरातमधील 'स्वागत' या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यनिमित्त येत्या 27 एप्रिलला दुपारी चार वाजता होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणाली मार्फत सहभागी होणार आहेत. यावेळी पंतप्रधान या योजनेच्या काही जुन्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधतील. स्वागत उपक्रमाला, 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गुजरात सरकार, स्वागत सप्ताह साजरा करत आहे.

स्वागत (SWAGAT) म्हणजेच- तंत्रज्ञानाच्या वापरातून राज्यव्यापी तक्रार निवारण व्यवस्था- या उपक्रमाची सुरुवात, नरेंद्र मोदी यांनी 2003 साली, गुजरातचे मुख्यमंत्री असतांना केली होती. मुख्यमंत्री म्हणून आपली सर्वात प्रमुख जबाबदारी, जनतेचे प्रश्न सोडवणे ही आहे, या त्यांच्या विश्वासातूनच, ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. मोदी यांनी लोकांचे जीवनमान सुखकर करण्यात, तंत्रज्ञानाचा होणारा उपयोग आणि त्याची क्षमता, फार पूर्वीच समजून घेतली होती.  त्यामुळे तक्रार निवरणाचा आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदींनी अशा प्रकारच्या पहिल्याच तंत्रज्ञान आधारित तक्रार निवारण व्यवस्थेची सुरुवात केली होती.

ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश, नागरिक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणे हा होता. त्यासाठी, लोकांच्या दैनंदिन तक्रारी जलद, प्रभावी आणि कालबद्ध प्रकारे सोडवण्यासाठी,सरकार तंत्रज्ञानाचा वापर करत  असे. ‘स्वागत’ या उपक्रमामुळे, अनेक लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. आणि लोकांच्या समस्या, कागदविरहित, पारदर्शक तसेच विना-अडथळा सोडवण्याचे ते एक प्रभावी साधन ठरले आहे.

स्वागतचे एक वैशिष्ट्य असे, की याद्वारे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या समस्या, थेट मुख्यमंत्र्यांना सांगता येतात. दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी, हा कार्यक्रम होतो, जेव्हा मुख्यमंत्री तक्रार निवारणासाठी थेट लोकांशी संवाद साधतात. यामुळे, लोक आणि सरकार यांच्यातील अंतर कमी झाले असून, त्याद्वारे, लोकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण केले जाते.

या उपक्रमाअंतर्गत, हे ही सुनिश्चित केले जाते, की प्रत्येक अर्जदाराला त्याच्या समस्येबद्दल घेतलेला निर्णय कळवला जाईल. सर्व अर्जावरील प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असते. आता पर्यंत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींपैकी, 99 टक्क्यांपेक्षा अधिक तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.

स्वागत ऑनलाइन कार्यक्रमाचे चार घटक आहेत: राज्य स्वागत, जिल्हा स्वागत, तालुका स्वागत आणि ग्राम स्वागत. राज्य स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री स्वत: जनसुनावणीला उपस्थित राहतात. जिल्हाधिकारी हे जिल्हा स्वागतचे प्रभारी असतात तर मामलतदार आणि एक वर्ग-1 चे अधिकारी तालुका स्वागतचे प्रमुख असतात. ग्राम स्वागत मध्ये, नागरिक दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत तलाटी/मंत्री यांच्याकडे अर्ज दाखल करतात. निवारणासाठी तालुका स्वागत कार्यक्रमात यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, नागरिकांसाठी लोक फरियाद (जनतक्रार) कार्यक्रम देखील कार्यरत आहे ज्या अंतर्गत ते स्वागतच्या युनिटमध्ये त्यांच्या तक्रारी नोंदवतात.

सार्वजनिक सेवेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुधारण्यासाठीचा प्रभावी उपक्रम म्हणून 2010 मध्ये संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्कारासह स्वागत ऑनलाइन कार्यक्रमाला गेल्या काही वर्षांमध्ये विविध पुरस्कार देण्यात आले आहेत.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919569) Visitor Counter : 204