पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 24 आणि 25 एप्रिलला मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला देणार भेट


पंतप्रधान 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

पंतप्रधान रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमामध्‍ये होणार सहभागी

पंतप्रधान पंचायत स्तरावर सार्वजनिक खरेदीसाठी एकात्मिक ई-ग्रामस्वराज आणि जेम पोर्टलचे उद्घाटन करणार; सुमारे 35 लाख स्वामित्व मालमत्ता कार्ड सुपूर्द करणार

पीएमएवाय-जी अंतर्गत 4 लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या ‘गृह प्रवेश’ कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

केरळमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

पंतप्रधान कोची वॉटर मेट्रोचे करणार लोकार्पण

पंतप्रधान सिल्वासामधील नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे लोकार्पण करणार

पंतप्रधान दमणमधील देवका ‘सीफ्रंट’ चे करणार लोकार्पण

Posted On: 21 APR 2023 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2023

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 24 आणि 25 एप्रिल 2023 रोजी मध्य प्रदेश, केरळ, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीवला भेट देणार आहेत.

पंतप्रधान 24 एप्रिल रोजी सकाळी सुमारे  11:30 वाजता मध्‍य प्रदेशातील रीवा  येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला  उपस्थित राहणार आहेत. रिवा येथे त्यांच्या हस्ते सुमारे 17,000 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची  पायाभरणी आणि लोकार्पण होईल.   

पंतप्रधान 25 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता तिरुवनंतपुरम  सेन्ट्रल   रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, सकाळी 11 वाजता, तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्‍ये होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे 3200 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची  पंतप्रधान पायाभरणी करतील आणि राष्ट्रार्पण करतील.

पंतप्रधान दुपारी 4 वाजता, नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देतील आणि सुमारे 4:30 वाजता, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली  भागातील  सुमारे 4850 कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन  करतील. त्यानंतर संध्याकाळी 6.00 वाजता पंतप्रधान दमण येथील देवका सीफ्रंटचे उद्‌घाटन करणार आहेत.

रीवामध्‍ये पंतप्रधान

पंतप्रधान रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमामध्ये  सहभागी होणार आहेत. यावेळी देशभरातील सर्व ग्रामसभा आणि पंचायती राज संस्थांच्या प्रतिनिधींना ते मार्गदर्शन  करणार आहेत.

या कार्यक्रमामध्‍ये , पंतप्रधान पंचायत स्तरावर सार्वजनिक खरेदीसाठी एकात्मिक ई ग्राम स्वराज  आणि जेम पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत.ई ग्राम स्वराजच्‍या माध्‍यमातून -गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस एकीकृत  करण्‍याबरोबरच  पंचायतींना लागणारे साहित्य  त्यांच्या वस्तू आणि सेवा जेमद्वारे खरेदी करण्यास सक्षम करणे हा त्याचा उद्देश आहे. पंचायतींना ईग्रामस्वराज मंचाचा  लाभ मिळावा यासाठी हे पोर्टल सुरू करण्‍यात येत आहे.

सरकारच्या योजनांची अंमलबजावणी शंभर टक्के होवून त्यांचा लाभ  सुनिश्चित करण्यासाठी, योजनांमध्‍ये लोकांचा सहभाग  वाढविण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान विकास की ओर साझे क़दम या  मोहिमेचा यावेळी प्रारंभ करणार आहेत. मोहिमेची संकल्पना  सर्वसमावेशक विकास आहे. यामध्‍ये अगदी  शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

पंतप्रधान सुमारे 35 लाख मालमत्ता स्वामित्व  कार्ड लाभार्थ्यांना सुपूर्द करणार आहेत. या कार्यक्रमानंतर, देशभरात आत्तापर्यंत एकूण सुमारे 1.25 कोटी मालमत्ता स्वामित्व  कार्डांचे   वितरण झालेले असेल.

'सर्वांसाठी घरकुल' हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या 'गृह प्रवेश' कार्यक्रमात सहभागी होतील.

या दौऱ्यामध्‍ये पंतप्रधान  सुमारे 2300 कोटी रूपये खर्चाच्या विविध  रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. त्यामध्ये मध्य प्रदेशातील 100 टक्के रेल्वे विद्युतीकरण, विविध लोहमार्गांचे दुहेरीकरण, गेज रूपांतरण आणि विद्युतीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. ग्वाल्हेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी यावेळी पंतप्रधान करणार आहेत.

जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

तिरुवनंतपुरममध्ये पंतप्रधान

तिरुवनंतपुरम आणि कासारगोड दरम्यान सुरू होणाऱ्या केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरून झेंडा दाखवून रवाना करतील. तिरुवनंतपुरम, कोलम, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसुर, पलक्कड, पाथानमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोडे, कन्नुर आणि कासारगोड या 11 जिल्ह्यांमधून ही गाडी धावेल.

पंतप्रधान 3200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील. पंतप्रधान कोची वॉटर मेट्रोचे देखील लोकार्पण करतील. कोची भोवती असलेल्या 10 बेटांना बॅटरीवर चालणाऱ्या हायब्रीड बोटीने एकमेकाशीं जोडून कोची शहराला अतिशय चांगल्या प्रकारच्या दळणवळणाने जोडणारा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. कोची वॉटर मेट्रो व्यतिरिक्त दिंडीगुल-पलानी-पलक्कड सेक्शनच्या रेल्वे विद्युतीकरणाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. 

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान तिरुवनंतपुरम, कोझिकोडे, वर्कला शिवगिरी रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प, नेमन आणि कोचुवेलीसह तिरुवनंतपुरम भागाचा समावेशक विकास आणि तिरुवनंतपुरम- शोरानुर सेक्शन अंतर्गत सेक्शनल वेग वाढवणे या प्रकल्पांसह विविध रेल्वे प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. 

याशिवाय तिरुवनंतपुरम येथील डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. डिजिटल सायन्स पार्क हा प्रकल्प उद्योग आणि व्यापारी आस्थापनांना या क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांच्या सहकार्याने डिजिटल उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी  एक प्रमुख संशोधन सुविधा म्हणून उभारण्यात येणार आहे. थर्ड जनरेशन पार्क म्हणून डिजिटल सायन्स पार्क, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ऍनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, स्मार्ट मटेरियल्स इत्यादी  इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानातील उत्पादनांच्या विकासाला पाठबळ देणाऱ्या सामाईक सुविधांनी सुसज्ज असेल. या ठिकाणी असलेल्या अतिशय प्रगत पायाभूत सुविधा या क्षेत्रातील विद्यापीठांच्या सहकार्याने उद्योगांकडून होणारे अतिशय उच्च दर्जाचे संशोधन आणि उत्पादनांची सह-निर्मिती यांना पाठबळ देतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 200 कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करण्यात येईल तर या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 1515 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.     

सिल्वासा आणि दमणमध्ये पंतप्रधान

सिल्वासा येथील नमो मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्युटला पंतप्रधान भेट देतील आणि या संस्थेचे लोकार्पण करतील, ज्या संस्थेची पायाभरणी स्वतः पंतप्रधानांनीच जानेवारी 2019 मध्ये केली होती. या संस्थेमुळे दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांच्या आरोग्य सेवांमध्ये परिवर्तन घडून येईल. या अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालयात आधुनिक संशोधन केंद्रे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स उपलब्ध असलेली  24x7 सेंट्रल लायब्ररी, निपुण  वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय प्रयोगशाळा, स्मार्ट लेक्चर हॉल, संशोधन प्रयोगशाळा, ऍनाटॉमी म्युझियम, क्लब हाऊस, क्रीडा सुविधा अशा विविध सुविधांबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी निवासाची देखील सोय उपलब्ध आहे. 

यानंतर पंतप्रधान 4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 96 प्रकल्पांची सिल्वासा येथे सायली मैदानात पायाभरणी आणि लोकार्पण करतील. या प्रकल्पांमध्ये दादरा आणि नगर हवेली जिल्ह्यातील मोरखाल, खेरडी, सिंदोनी आणि मसत येथील सरकारी शाळा, दादरा आणि नगर हवेली जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे सुशोभीकरण, बळकटी आणि रुंदीकरण, दमण येथील आंबावाडी, परियारी, दमणवाडा, खारीवाड येथील शाळा आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, मोटी दमण आणि नानी दमण येथील फिश मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि नानी दमण येथील पाणीपुरवठा योजनेचा विस्तार या प्रकल्पांचा समावेश आहे.

दमण येथील देवका सी फ्रंटचे पंतप्रधान लोकार्पण करतील.165 कोटी रुपये खर्चाने 5.45 किमी सी फ्रंट तयार करण्यात आला  असून अशा प्रकारची ही देशातील पहिली किनारी मार्गिका आहे. या सी फ्रंटमुळे जास्तीत जास्त प्रमाणात या भागात पर्यटक आकर्षित होण्याची आणि निवांतपणा देणारे आणि मनोरंजन क्रीडा सुविधा असणारे हे केंद्र बनल्याने  स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून या सी फ्रंटला रुपांतरित करण्यात आले आहे. यामध्ये स्मार्ट प्रकाशयोजना, पार्किंग सुविधा, उद्याने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मनोरंजन साधने असलेले भाग आणि आलिशान तंबू सुविधा तरतूद यांचा समावेश आहे.

 

 N.Chitale/Suvarna/Shailesh P/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1918607) Visitor Counter : 236