आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी घेतला आढावा
यापूर्वी आलेल्या कोविड लाटांच्या काळातली सहकार्याची भावना जारी राखत केंद्र आणि राज्यांनी काम सुरू ठेवण्याची गरज - डॉ. मनसुख मांडविया
“चाचणी-मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी अनुरुप वर्तन ही पंचसूत्री कोविड व्यवस्थापनाचे धोरण राहील”
8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सज्जतेचा आढावा घेण्याची राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांना विनंती करण्यात आली
10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्याची राज्यांना सूचना, या ड्रिलची पाहणी करण्यासाठी रुग्णालयांना भेट देण्याची राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना विनंती
राज्यांना दक्ष राहण्याच्या आणि कोविड व्यवस्थापनासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्याच्या सूचना
आकस्मिक हॉटस्पॉट लक्षात घेण्याच्या, चाचण्यांचे प्रमाण, लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या आणि रुग्णालयाच्य पायाभूत सुविधांची सज्जता सुनिश्चित करण्याच्या राज्यांना सूचना
Posted On:
07 APR 2023 2:47PM by PIB Mumbai
“यापूर्वी आलेल्या लाटांच्या काळात दाखवलेल्या सहकार्याच्या भावनेने केंद्र आणि राज्यांनी काम सुरू ठेवण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केले आहे. देशातील काही राज्यांमध्ये अलीकडेच कोविड रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा आणि राज्यांमधील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांचे आरोग्यमंत्री आणि प्रधान सचिव/ अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार देखील उपस्थित होत्या.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना दक्ष राहण्याचा आणि कोविड-19 व्यवस्थापनासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्याचा सल्ला दिला. 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सज्जतेचा आढावा घ्यावा आणि 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी राज्यांच्या आरोग्यमंत्र्याना केली. ILI/SARI रुग्णांच्या प्रमाणाचा कल लक्षात घेऊन तयार होणारे हॉट-स्पॉट्स ओळखावेत आणि कोविड-19 आणि एन्फ्ल्युएंझाच्या चाचण्यांचे पुरेसे नमुने पाठवावेत आणि पॉझिटिव्ह नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण वेगाने करावे, अशा सूचनाही त्यांनी राज्यांना दिल्या.
23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष चाचण्यांची सरासरी राष्ट्रीय सरासरीच्याही खाली असल्याचे दिसून आले आहे. सध्या आढळणाऱे कोविडचे उत्परिवर्तक नवीन असले तरीही चाचणी-मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधासाठी अनुरुप वर्तन ही पंचसूत्रीच कोविड व्यवस्थापनाचे सिद्ध झालेले धोरण राहील, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. यामुळे योग्य प्रकारच्या आरोग्यविषयक उपाययोजना हाती घेणे शक्य होईल, असे ते म्हणाले. 7 एप्रिल 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात नोंद झालेल्या प्रति दशलक्ष 100 या चाचणीच्या सध्याच्या दरात अतिशय वेगाने वाढ करण्याची विनंती देखील राज्यांना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. चाचण्यांमध्ये RT-PCR चा वाटा वाढवण्याच्या सूचनाही राज्यांना करण्यात आल्या आहेत.
7 एप्रिल 2023 रोजी संपत असलेल्या आठवड्यातील नोंदीनुसार दैनंदिन रुग्णसंख्येची सरासरी, 17 मार्च 2023 रोजीच्या आठवड्यातील 571 वरून 4188 वर पोहोचली असून भारतात कोविड-19 रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली असल्याची माहिती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली. 7 एप्रिल 2023 रोजी संपणाऱ्या आठवड्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.02% झाला आहे. मात्र, याच काळात जगामध्ये दैनंदिन रुग्णसंख्येची सरासरी 88,503 झाली आहे ज्यामध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या पाच देशांचे गेल्या आठवड्यातील जागतिक रुग्णसंख्येत 62.6% इतके योगदान आहे.
सध्या जागतिक आरोग्य संघटना व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट (VOI), XBB.1.5 आणि इतर सहा उत्परिवर्तकांवर(BQ.1, BA.2.75, CH.1.1, XBB, XBF and XBB.1.16) अतिशय बारीक नजर ठेवून आहे, अशी माहिती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली. ओमायक्रॉन आणि त्याच्याशी संबंधित उपप्रकार हेच जास्त प्रभावी प्रकार दिसत आहेत आणि बहुतेक उत्परिवर्तकांमध्ये अतिशय कमी किंवा अजिबात नसलेली संक्रमणक्षमता, रोगाचे गांभीर्य न वाढवणारी किंवा रोगप्रतिकारक्षमतेला चकवा न देणारी क्षमता दिसून आली आहे, ही बाब अधोरेखित करण्यात आली. XBB.1.16 या उत्परिवर्तकाचे प्रमाण फेब्रुवारीमधील 21.6% वरून मार्च 2023 मध्ये 35.8% पर्यंत वाढले. मात्र, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रमाणात किंवा मृत्युदरात वाढ झाल्याची नोंद नाही.
भारताने प्राथमिक लसीकरणात 90% लोकसंख्येपर्यंत व्याप्ती साध्य केली आहे तर खबरदारीच्या मात्रेचे लसीकरण मात्र अत्यल्प आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पात्र लोकसंख्येच्या विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता असलेल्या लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना केली.
निरीक्षणाअंती असे दिसून आले आहे की देशातील आठ राज्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोविड बाधितांची नोंद होत असून, केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीमधील 10 किंवा त्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी 10% अधिक आहे तर कर्नाटक,केरळ,महाराष्ट्र,दिल्ली,हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि हरियाणा या राज्यांतील 5 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये 5%हून अधिक पॉझिटीव्हीटी नोंदण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी कोविड प्रतिबंधक वर्तणुकीचे निष्ठेने पालन करण्यासंदर्भात जनजागृती अभियानांचे प्रमाण वाढविण्याच्या महत्त्वावर अधिक भर दिला आहे. कोविडबाधितांसाठी राखीव खाटांची उपलब्धता तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची सुनिश्चिती करण्यासह सर्व मालवाहतूकविषयक तसेच पायाभूत सुविधांच्या सुसज्जतेवर जातीने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिल्या आहेत. सर्व राज्यांनी त्यांच्याकडील कोविड संबंधित सर्व माहिती नियमितपणे कोविड इंडिया पोर्टलवर अद्ययावत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
कोविड-19 बाबतच्या जागतिक तसेच देशांतर्गत परिस्थितीविषयी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच आयसीएमआर यांनी 25 मार्च 2023 रोजी एक संयुक्त सूचना जारी करून सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद यंत्रणेचे पुनरुज्जीवन करुन, त्वरित निदान, विलगीकरण,चाचण्या आणि नव्या SARS-CoV-2 ची साथ ओळखून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संशयित आणि बाधित रुग्णांचे वेळेवर व्यवस्थापन यांच्या माध्यमातून एन्फ्ल्युएंझा आणि कोविड-19 संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले होते.त्याबाबत आज पुन्हा एकदा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना या सूचनेची आठवण करून देण्यात आली. या सूचनांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या.रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे तसेच चाचण्यांचे प्रमाण वाढविणे यासह कोविड रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या विविध पैलूंविषयी व्यापक आणि तपशीलवार चर्चा देखील करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी त्यांच्या भाषणात आरोग्य यंत्रणेने वेळेवर सज्ज राहण्याचे महत्त्व आणि कोविड-19 चे योग्य व्यवस्थापन यावर भर दिला. त्यांनी राज्य सरकारांना प्राधान्यक्रमाने आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी ईसीआरपी-II मधील आपापला भाग राबविण्याचा आग्रह केला. राज्य सरकारांनी त्यांची देखरेख यंत्रणा अधिक मजबूत करावी आणि येत्या काळात पर्यटनात वाढ होईल हे लक्षात घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना देखील डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिल्या.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी होणाऱ्या आढावा बैठका तसेच मंत्रालयाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचना याची राज्य सरकारांनी प्रशंसा केली. कोविड-19 चे कार्यक्षम नियंत्रण तसेच व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारसोबत एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही सर्व राज्य सरकारांनी या बैठकीत दिली. राज्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सद्य परिस्थितीचा आढावा घेत आहोत अशी माहिती राज्य सरकार प्रशासनांनी केंद्राला दिली. राज्यांतील रुग्णालय विषयक पायाभूत सुविधांची सज्जता तपासण्यासाठी देशातील सरकारी तसेच खासगी आरोग्य सुविधांच्या ठिकाणी येत्या 10 आणि 11 एप्रिल 2023 रोजी, मॉक ड्रिल घेण्यात येईल अशी ग्वाही राज्य सरकारांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे तसेच गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांच्यासह इतर अनेक राज्यांचे आरोग्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
***
N.Chitale/S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914648)
Visitor Counter : 297