अल्पसंख्यांक मंत्रालय
हज यात्रेसाठी मेहरम विना यात्रेकरू महिलांचा आजवरचा सर्वात मोठा जत्था यंदा होणार रवाना
Posted On:
03 APR 2023 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2023
2023 ची हज यात्रा, यात्रेकरूंना अधिक आरामदायी, सुविधा देणारी आणि परवडणारी हवी, यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय सातत्याने प्रयत्न करत आहे. यात्रेकरुंची निवड अधिक तटस्थपणे, पारदर्शीपणे, योग्य वेळेत आणि कोणताही मानवी हस्तक्षेप न करता होण्यासाठी समर्पित प्रयत्न केले जात आहेत.
हज यात्रेसाठीचे अर्ज आणि यात्रेकरुंची निवड प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात करण्यात आली.यासाठी,यावर्षी आलेल्या एकूण 1.84 लाख अर्जांपैकी 14,935 हज इच्छुक अर्जदारांना यात्रेची संधी मिळाली आहे. ( यात 10,621 अर्जदार 70 वर्षे वयाच्या वरील आहेत, आणि 4,314 महिला मेहरमशिवाय जाणाऱ्या आहेत). हज यात्रेसाठी जाणाऱ्या महिलांपैकी, मेहरमशिवाय- म्हणजे कोणत्याही पुरुष संरक्षकाशिवाय स्वतंत्रपणे जाणाऱ्या महिलांचा हा आजवरचा सर्वात मोठा जत्था आहे.
हज कोट्यापेक्षा जास्त आणि त्याहून अधिक प्राप्त झालेले अर्ज, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय, ऑनलाइन आणि रॅन्डंम डिजिटल निवड (ORDS) प्रक्रियेद्वारे निवडण्यात आले आहेत. निवड प्रक्रियेतून निवडलेल्या आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची यादी सर्व लोकांसाठी, ताबडतोब अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली असून, त्यामुळे या प्रक्रियेतील पारदर्शकता अधोरेखित झाली आहे. यात्रेसाठी निवड झालेल्या सर्व 1.4 लाख भाविकांना त्यांची निवड झाल्याचा मेसेज पाठवण्यात आला आहे. तसेच, जे प्रतीक्षा यादीत आहेत, त्यांनाही त्यांच्या सद्यस्थितीची माहिती मेसेजद्वारे कळवण्यात आली आहे.
यात्रेकरूंना परदेशी चलनाची सुविधा मिळावी, यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाने भारतीय स्टेट बँकेसोबत भागीदारी केली आहे. त्यासाठी सरकार एसबीआयच्या सहकार्याने, यात्रेकरूंना अगदी माफक दरात परदेशी चलन मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे.
त्याशिवाय, यात्रेच्या काळात, रोख पैशांची चोरी किंवा वस्तू हरवून यात्रेकरुचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्व यात्रेकरूंना फॉरेक्स कार्ड देण्यात येत आहे. जर, यात्रेकरूकडून हे कार्ड गहाळ झाल्यास, त्याला बँकेकडून हे पैसे परत मिळू शकतील.
फॉरेक्स कार्ड संदर्भात मार्गदर्शनासाठी एसबीआय, लवकरच एक मदत क्रमांक जारी करणार असून, इथले नोडल अधिकारी आणि वेबसाईटचा पत्ता लवकरच जाहीर केला जाईल.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1913425)
Visitor Counter : 165