पंतप्रधान कार्यालय

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 10 MAR 2023 10:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मार्च 2023

 

महामहीम पंतप्रधान अल्बानीज,

दोन्ही देशातील प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांमधले माझे मित्र,

नमस्कार !

सर्वप्रथम,पंतप्रधान अल्बानीस यांच्या पहिल्या भारत भेटीबद्दल मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. पंतप्रधान स्तरावर वार्षिक शिखर परिषद घेण्याचा निर्णय गेल्या वर्षी दोन्ही देशांनी घेतला आणि पंतप्रधान अल्बानीस यांच्या या भेटीने या मालिकेचा प्रारंभ झाला आहे. होळीच्या दिवशी त्यांचे भारतात आगमन झाले आणि त्यानंतर आम्ही क्रिकेटच्या मैदानावर काही वेळ एकत्र आलो. रंग, संस्कृती आणि क्रिकेट यांचा हा उत्सव म्हणजे उत्साह आणि भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मित्रत्वाच्या भावनेचेच प्रतिक आहे.

मित्रहो,

आज आम्ही परस्पर सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. सुरक्षा सहकार्य हा आपल्या समावेशक धोरणात्मक भागीदारीचा महत्वाचा स्तंभ आहे. आज आम्ही हिंद-प्रशांत (Indo-Pacific) क्षेत्रातल्या सागरी सुरक्षेवर आणि संरक्षण आणि सुरक्षा यामध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर सखोल चर्चा केली. संरक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षात आपण लक्षणीय करार केले आहेत यामध्ये परस्परांच्या सैन्य दलांना लॉजिस्टिक सहकार्य पुरवण्याचाही समावेश आहे. आपल्या सुरक्षा  एजन्सीमध्ये नियमित आणि उपयुक्त माहितीचे आदान-प्रदान सुरु असते आणि ही देवाण-घेवाण अधिक दृढ करण्यावर आम्ही चर्चा केली. आपल्या युवा सैनिकांमध्ये संवाद आणि मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही जनरल रावत अधिकारी विनिमय कार्यक्रम सुरु केला असून त्याची या महिन्यापासून सुरवात झाली आहे.

मित्रहो,

विश्वासार्ह आणि बळकट जागतिक पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी परस्पर सहकार्यावर आज आम्ही चर्चा केली. नवीकरणीय उर्जा हे दोन्ही देशांसाठी प्राधान्याचे क्षेत्र असून दोन्ही देशांनी यावर लक्ष केंद्रीत केले आहे, स्वच्छ हायड्रोजन आणि सौर उर्जेवर आम्ही एकत्र काम करत आहोत. गेल्या वर्षी अमलात आलेला व्यापार करारामुळे (ECTA) दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीच्या उत्तम संधी खुल्या झाल्या आहेत. आपला अधिकारी वर्ग समावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या दिशेनेही काम करत आहे.

मित्रहो,

दोन्ही देशांच्या जनतेमधला संवाद भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचा एक महत्वाचा स्तंभ आहे. शैक्षणिक अर्हतेच्या परस्पर मान्यतेसाठीच्या यंत्रणेकरिता आम्ही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, याचा विद्यार्थी वर्गाला फायदा होणार आहे. मोबिलिटी कराराच्या दिशेनेही प्रगती होत आहे. विद्यार्थी, कामगार आणि व्यावसायिकांसाठी हा उपयुक्त ठरेल. भारतीय समुदाय हा ऑस्ट्रेलियातला दुसरा मोठा स्थलांतरीत समुदाय आहे.  हा भारतीय समुदाय ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था आणि समाजासाठीही भरीव योगदान देत आहे. गेल्या काही आठवड्यात ऑस्ट्रेलियात मंदिरांवरच्या हल्ल्यांचे वृत्त नियमित येत आहे ही चिंतेची बाब आहे. या वृत्तांमुळे भारतीय लोकांना चिंता वाटणे स्वाभाविकच आहे आणि या बातम्या आमचे मनही अस्वस्थ करतात.  आपल्या या भावना आणि चिंता मी पंतप्रधान अल्बानीस यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत. भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेला आपले विशेष प्राधान्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या संदर्भात आपले चमू नियमित संपर्कात राहतील आणि सर्वतोपरी सहकार्यही करतील.

मित्रांनो,

जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि जागतिक कल्याणासाठी आपले द्विपक्षीय संबंध महत्वाचे आहेत यावर पंतप्रधान अल्बानीस आणि मी सहमत आहोत. भारताच्या जी- 20 अध्यक्षपदाचे प्राधान्यविषय मी पंतप्रधान अल्बानीस यांना विषद केले असून ऑस्ट्रेलियाकडून मिळत असलेल्या सातत्याच्या सहकार्याबद्दल आभार  व्यक्त केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश क्वाड सदस्य असून या मंचावर उभय देशांच्या सहकार्याबाबतही आम्ही चर्चा केली.  यावर्षीच्या मे महिन्यात होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधान अल्बानीस यांचे आभार मानतो. त्यानंतर सप्टेंबरमध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान अल्बानीस यांचे पुन्हा स्वागत करण्याची संधी मला मिळेल याचा मला आनंद आहे. पंतप्रधान अल्बानीस यांचे भारतात पुन्हा एकदा स्नेहपूर्ण स्वागत. यांची ही भेट दोन्ही देशांमधल्या संबंधाना नवा वेग देईल याचा मला विश्वास आहे.

धन्यवाद. 

 

 S.Thakur/N.Chitale/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1906753) Visitor Counter : 74