महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या "महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला पंतप्रधान उद्या संबोधित करणार आहेत


या वेबिनारचा उद्देश महिलांच्या मालकीच्या आणि महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय उद्योगांच्या शाश्वत वाढीसाठी विचारमंथन करणे आणि त्यासाठीचा मार्ग प्रशस्त करणे आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी धोरण आणि ब्लू प्रिंट विकसित करणे हा आहे


स्वयंसहाय्यता गटांचा मोठ्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये/सहकारी उपक्रमांमध्ये सहभाग वाढवणे, या संकल्पने अंतर्गत; तंत्रज्ञान आणि वित्त लाभ; आणि बाजार आणि व्यवसाय विस्तार अशा तीन वेगवेगळ्या सत्रांमध्ये विस्तृत चर्चा केली जाईल

Posted On: 09 MAR 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मार्च 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10 वाजता "महिलांचे आर्थिक सक्षमीकरण" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. या वेबिनारचे आयोजन महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय करत आहे. महिलांच्या मालकीच्या आणि महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसाय उद्योगांच्या शाश्वत वाढीसाठी विचारमंथन आणि मार्ग प्रशस्त करण्याच्या उद्देशाने,तसेच घोषणांच्या अंमलबजावणीसाठी धोरण आणि ब्लूप्रिंट विकसित करण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेचा हा एक भाग आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह, महिला आणि बाल विकास राज्यमंत्री महेंद्रभाई मुंजपारा आणि इतर मान्यवर आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अधिकारी देखील या उद्घाटन सत्रात सामील होतील. यानंतर अर्थसंकल्प अंमलबजावणी धोरणावर वेबिनारचा दिशा  ठरवण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव यांच्याकडून एक सादरीकरण केले जाईल.

उद्घाटनाच्या सत्रानंतर, तीनवेगवेगळी सत्रे होणार आहेत. यासाठी तीन स्‍वतंत्र संकल्पना निश्चित केल्या आहेत. यामध्‍ये स्वयंसहाय्यता गटांच्या माध्‍यमातून मोठे  व्यावसायिक उपक्रम वाढवणे, दुसरी संकल्पना आहे,   तंत्रज्ञान आणि  वित्तीय  लाभ घेणे, तिसरी संकल्पना विपणन  आणि व्‍यावसायिक  विस्तार अशी आहे.  या विषयातील तज्ञ, महिला स्वयं-सहायता गट महासंघ  आणि इतर सहभागींद्वारे विस्तृत चर्चा करण्‍यात येणार आहे. या सत्रांमधून व्यावहारिक आणि अंमलबजावणी करण्यायोग्य तोडगे मिळतील अशी  अपेक्षा  आहे.

या वेबिनारमध्ये नियंत्रक, डोमेन तज्ञ आणि या  क्षेत्रातील वक्ते  सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे  थेट वेबकास्ट करण्‍यात येणार आहे.  वेबिनारच्या   सहभागींमध्ये सरकारी अधिकारी, महिला स्वयं-सहायता गट सदस्य/महासंघ, सार्वजनिक/खाजगी क्षेत्रातील बँकांचे प्रतिनिधी, कृषी-तंत्रज्ञान  कंपन्या, नागरी संस्था, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आणि उद्योग चेंबर्सचे सदस्य, एसआरएलएमचे सदस्य यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर  मोठ्या प्रमाणावर जनताही सहभागी होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी  अर्थ संकल्पीय  भाषणामध्‍ये  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाविषयी अनेक गोष्‍टींचा उहापोह केला होता. यावेळी केलेल्या घोषणेमध्ये असे म्हटले होते की, "81 लाख बचत गटांना एकत्रित करण्यात डीएवाय-एनआरएलएम म्हणजेच दीनदयाळ अंत्योदय योजना- नॅशनल लाइव्‍हलीहूड मिशनने उल्लेखनीय यश मिळवले आहे. आता यापुढचा टप्‍पा गाठता येणार आहे. त्यासाठी  कच्च्या मालाच्या पुरवठ्यामध्ये योग्य तो  हस्तक्षेप करून, मोठ्या उत्पादक उद्योगांची उभारणी करता येईल  किंवा सामूहिक निर्मितीद्वारे आर्थिक सक्षमीकरणाचा पुढचा टप्‍पा गाठता येईल. मात्र यासाठी  उत्पादनांचे डिझाईन, गुणवत्ता, ब्रँडिंग आणि विपणन, मोठ्या ग्राहक बाजारपेठांना सेवा देण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने  त्यांचे कार्य वाढविण्‍याची गरज आहे. तसेच त्यापैकी काही उद्योगांचे रूपांतर  'युनिकॉर्न' मध्‍ये करण्‍याची आवश्‍यकता आहे.

या ब्रेक-आउट सत्रांनंतर वेबिनार समारोप सत्र होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक तीन ब्रेकआउट सत्रांच्या नियंत्रकांद्वारे  मंत्रालये किंवा विभागांकडून  सचिव आणि इतर भागधारकांच्या उपस्थितीत सादरीकरण केले जाईल. यानंतर मुक्त  चर्चा होणार आहे.

 

हा कार्यक्रम पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://webcast.gov.in/mwcd

 

* * *

JPS/S.Bedekar/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905340) Visitor Counter : 189