पंतप्रधान कार्यालय
येत्या उन्हाळ्यात उष्णतेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
मान्सूनचा अंदाज, रब्बी पिकांवर होणारा परिणाम, वैद्यकीय पायाभूत सुविधांची सज्जता आणि उष्णतेशी संबंधित आपत्ती आणि उपशमन उपायांची तयारी याबद्दल पंतप्रधानांना दिली माहिती
पंतप्रधानांनी वेगवेगळ्या भागधारकांसाठी स्वतंत्र जागरूकता सामग्री तयार करण्याची दिली सूचना
समजण्यास सोपे आणि प्रसारासाठी योग्य अशा पद्धतीने दैनंदिन हवामान अंदाज तयार करण्याची पंतप्रधानांची भारतीय हवामान विभागाला सूचना
सर्व रुग्णालयांच्या तपशीलवार फायर ऑडिटच्या गरजेवर पंतप्रधानांनी दिला भर
भारतीय अन्न महामंडळाने अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीत धान्याची इष्टतम साठवण करण्याची तयारी करावी
Posted On:
06 MAR 2023 6:06PM by PIB Mumbai
उन्हाळ्यात कमालीच्या उष्णतेचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजनांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या 7 एलकेएम या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली.
पुढील काही महिन्यांसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) हवामान अंदाजाबद्दल आणि मान्सून सर्वसाधारण राहील या अंदाजाबद्दलही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. हवामानाचा रब्बी पिकांवर होणारा परिणाम आणि प्रमुख पिकांच्या अपेक्षित उत्पादनाबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. सिंचन, पाणीपुरवठा, चारा आणि पिण्याच्या पाण्यावर देखरेख ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही आढावा घेण्यात आला. आवश्यक पुरवठा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जतेच्या संदर्भात राज्ये आणि रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांच्या तयारीबद्दल पंतप्रधानांनी माहिती घेतली. उष्णतेशी संबंधित आपत्ती आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांसाठी देशभरात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांबद्दलही त्यांना माहिती देण्यात आली.
नागरिकांसह वैद्यकीय व्यावसायिक, नगरपालिका आणि पंचायत अधिकारी, अग्निशामक दलासारखी आपत्ती प्रतिसाद पथके या विविध भागधारकांसाठी स्वतंत्र जनजागृती साहित्य तयार करावे अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या. अति उष्णतेच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुलांना जागरूक करण्यासाठी शाळांमध्ये काही मल्टीमीडिया व्याख्याने आयोजित करण्याची सूचना त्यांनी केली. उष्ण हवामानात काळजी कशी घ्यावी हे सांगण्यासाठी जिंगल्स, माहितीपट, पत्रके इत्यादी विविध पद्धतींचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले.
समजण्यासाठी सहजसोपे आणि प्रसारासाठी योग्य अशा पद्धतीने दैनंदिन हवामान अंदाज जारी करावेत असे पंतप्रधानांनी आयएमडीला सांगितले. दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ यासारख्या माध्यमांनी दैनंदिन हवामान अंदाज दररोज काही मिनिटे प्रसारित करावेत म्हणजे ते अंदाज ऐकून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेता येईल या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली.
सर्व रुग्णालयांच्या तपशीलवार फायर ऑडिटच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला आणि सर्व रुग्णालयांमध्ये अग्निशमन दलाकडून मॉक फायर ड्रिल घेतले जावे. जंगलातील वणव्यांवर, आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वित प्रयत्नांची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जंगलातील वणवे रोखण्यासाठी आणि आटोक्यात आणण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी योग्य रीतीने बदल केले पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली.
चारा आणि जलाशयांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेचा मागोवा घ्यावा, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. अत्यंत टोकाच्या हवामानाच्या परिस्थितीत धान्याचा इष्टतम साठा करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाला सज्जता राखण्यासाठी सांगण्यात आले.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि सदस्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए)चे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.
***
Nilima C/Prajna/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904706)
Visitor Counter : 210
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam