आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा मार्च 2023 रोजी ‘आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये करणार मार्गदर्शन


अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावणीसाठी हितसंबंधियांकडून सूचना आणि कल्पनांचे आदानप्रदान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेचाच भाग

नवे नर्सिंग कॉलेजची स्थापना , आयसीएमआर प्रयोगशाळांचा खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांसाठी वापर आणि औषधक्षेत्रातील संशोधने तसेच वैद्यकीय उपकरणांसाठी बहुशाखीय अभ्यासक्रम अशा अर्थसंकल्पातील घोषणांच्या अंमलबजावणीबाबत या वेबिनारमध्ये संयुक्तिकरित्या तीन चर्चात्मक सत्रांचे आयोजन

Posted On: 05 MAR 2023 10:11AM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी, 6 मार्च 2023 ला सकाळी 10 वाजता, दूरदृश्यप्रणालीद्वारे आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यंदाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केलेले उपक्रम आणि घोषणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, हितसबंधी भागधारकांकडून सूचना-सल्ले आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेल्या 12  अर्थसंकल्पोत्तर वेबिनारचाच हा भाग असेल.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 ची उभारणी सात प्राधान्यक्रमांवर झाली असून हे सात दीपस्तंभ, ज्यांना सप्तर्षी म्हटले गेले, ते या अमृतकाळात देशाला दिशादर्शन करणारे आहेत. सर्वसमावेशक विकास हा सरकारच्या अनेक प्राधान्यक्रमांपैकी एक असून, त्या अंतर्गत 157 नव्या नर्सिंग विद्यालयांची स्थापना, आयसीएमआरमध्ये सार्वजनिक आणि खाजगी वैद्यकीय संशोधन केंद्र उभारण्यास प्रोत्साहन देणे तसेच औषधक्षेत्रातील संशोधने आणि वैद्यकीय उपकरणांसाठी  बहुशाखीय अभ्यासक्रम, अशा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

या वेबिनारमध्ये, एकाच वेळी तीन चर्चात्मक सत्रे होणार आहेत. यात, आरोग्य आणि औषधनिर्माण अशा दोन्ही क्षेत्रांविषयी चर्चा होईल. केंद्र सरकारची संबंधित मंत्रालये/विभागांचे मंत्री आणि सचिव यांच्यासह, राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य विभागांशी संबंधित अधिकारी, या विषयातील तज्ञ, उद्योगक्षेत्र/ संघटनांचे प्रतिनिधी, खाजगी वैद्यकीय महाविद्यालये/रुग्णालये /संस्था इत्यादी या वेबिनारमध्ये सहभागी होऊन, या घोषणांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी आपल्या सूचना आणि सल्ले देतील.

या चर्चात्मक सत्रांच्या संकल्पना, नर्सिंग क्षेत्रातील गुणवत्तेत सुधारणा: पायाभूत सुविधा, शिक्षण आणि कार्यान्वयन; आयसीएमआरच्या प्रयोगशाळांचा सार्वजनिक आणि क्षेत्रांकडून वैद्यकीय संशोधनासाठीची सुविधा म्हणून उपयोग, आणि औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधने आणि वैद्यकीय उपकरणांसाठी बहुशाखीय अभ्यासक्रम अशा असतील.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904310) Visitor Counter : 199