पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तराखंड रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 20 FEB 2023 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 फेब्रुवारी 2023

 

नमस्कार !

देवभूमी उत्तराखंडच्या युवा  मित्रांना रोजगार मेळाव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आज ज्यांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. यामुळे नक्कीच तुमचे जीवन, तुमच्या कुटुंबाचे जीवन बदलणार आहे. मात्र आज तुम्ही ज्या सेवेत प्रवेश करत आहात,ते  केवळ तुमचे जीवन बदलण्याचे साधन नाही तर ते सर्वसमावेशक बदलाचे माध्यम आहे. आपल्या सेवाभावाने  राज्य आणि राष्ट्राच्या विकासाच्या आणि विश्वासाच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण  योगदान द्यायचे आहे. तुमच्यापैकी बहुतेक मित्र हे शैक्षणिक क्षेत्रात सेवा देणारे आहेत.  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आम्ही भारतातील तरुणांना नव्या शतकासाठी सज्ज  करण्याचा संकल्प केला आहे. उत्तराखंडमध्ये हा संकल्प सिद्धीस नेण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या तरुणांच्या खांद्यावर आहे.   

मित्रांनो,

केंद्र सरकार असो किंवा उत्तराखंडचे भाजप सरकार, प्रत्येक तरुणाला त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार नव्या  संधी मिळाव्यात आणि प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी योग्य माध्यम मिळावे, असा  सतत प्रयत्न करत असते.  सरकारी सेवेतील भरतीची ही मोहीमही याच दिशेने टाकलेले पाऊल आहे.गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारने देशातील लाखो तरुणांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. देशभरात जिथे जिथे भाजपची सरकारे आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, तिथेही अशा मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत. मला आनंद आहे की आज उत्तराखंडही त्यात जोडले जात आहे.

मित्रांनो,

डोंगरातील वाहून जाणारे पाणी आणि डोंगराळ भागातील तरुणाईचा डोंगराला काही उपयोग नाही ही जुनी धारणा आपल्याला बदलायची आहे.आपल्याला ही गोष्ट बदलायची आहे, त्यामुळेच उत्तराखंडमधील तरुणांनी आपल्या गावी परतावे यासाठी केंद्र सरकारचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.त्यासाठी डोंगराळ भागामध्ये  रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आज तुम्ही बघा, कितीतरी रस्ते बांधले जात आहेत, रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत  आहेत. म्हणजेच उत्तराखंडमध्ये पायाभूत सुविधांवर इतकी गुंतवणूक केली जात आहे.यामुळे  दुर्गम भागातील  गावात जाणे सोपे होत असून, मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होत आहे. बांधकाम कामगार असो, अभियंता असो किंवा कच्चा माल उद्योग असो, दुकाने असो, रोजगाराच्या संधी सर्वत्र वाढत आहेत. वाहतूक क्षेत्रातही मागणी वाढल्याने तरुणांना नवीन संधी मिळत आहेत.पूर्वी अशा  प्रकारच्या रोजगारासाठी माझ्या उत्तराखंडच्या ग्रामीण तरुणांना, आपल्या  मुला-मुलींना शहराकडेच  धाव घ्यावी लागत असे . आज प्रत्येक गावात इंटरनेट सेवा आणि डिजिटल सेवा देणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांमध्येही हजारो तरुण काम करत आहेत.

मित्रांनो,

जस जसे उत्तराखंडचे  दुर्गम भाग  रस्ते , रेल्वे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडले जात आहेत तसे  पर्यटन क्षेत्रही विस्तारत आहे. पर्यटन नकाशावर नवनवीन पर्यटनस्थळे येत आहेत.त्यामुळे .उत्तराखंडमधील तरुणांना  तोच रोजगार आता घराजवळ  मिळत आहे, ज्यासाठी ते पूर्वी मोठ्या शहरात जात असत. मुद्रा योजना पर्यटनामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार वाढविण्यात खूप मदत करत आहे.  त्यामुळे दुकान, ढाबा,अतिथीगृह , होम स्टे असे व्यवसाय करणाऱ्या संबंधितांना हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत आहे. देशभरात आतापर्यंत 38 कोटी मुद्रा कर्ज देण्यात आली  आहेत . ही कर्जे मिळवून सुमारे 8 कोटी तरुण प्रथमच उद्योजक झाले आहेत. यामध्येही महिला, एससी /एसटी /ओबीसी वर्गातील तरुण मित्रांचा  वाटा सर्वाधिक आहे. उत्तराखंडच्या हजारो मित्रांनीही याचा लाभ घेतला आहे.

मित्रांनो,

भारतातील तरुणांसाठी हा विलक्षण संधींचा  अमृतकाळ  आहे. याला तुम्हाला तुमच्या सेवांच्या माध्यमातून  सतत गती द्यावी लागेल. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो की तुम्ही उत्तराखंडच्या लोकांची उत्तम  सेवा कराल, उत्तराखंडला अधिक चांगले बनवण्यात योगदान द्याल आणि आपला देश देखील सशक्त  , समर्थ आणि समृद्ध होईल!  खूप खूप धन्यवाद!

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1901066) Visitor Counter : 119