पंतप्रधान कार्यालय
एअर इंडिया-एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून साधला संवाद
या भागीदारीअंतर्गत एअर इंडिया एअरबसकडून 250 विमाने खरेदी करणार असून, भारत-फ्रान्स दरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीच्या सामर्थ्याचे हे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
भारत आणि उर्वरित जगामधील कनेक्टिव्हिटीला चालना देणाऱ्या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या नागरी विमान वाहतूक बाजारपेठेवर पंतप्रधानांनी दिला विशेष भर
फ्रेंच कंपन्यांच्या भारतामधील आश्वासक उपस्थितीची प्रशंसा करत, फ्रेंच एरोस्पेस इंजिन उत्पादक SAFRAN च्या भारतात सर्वात मोठी MRO सुविधा उभारण्याच्या अलीकडेच घेतलेल्या निर्णयाचा पंतप्रधानांनी दिला दाखला
भारत-फ्रान्स संबंध पुढे नेण्यामधील भागीदारीसाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानत, भारताच्या G20 अध्यक्षतेखाली त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
14 FEB 2023 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एच.ई. इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा सन्स बोर्डाचे अध्यक्ष, कॅम्पबेल विल्सन, एअर इंडियाचे सीईओ आणि एअरबस चे सीईओ गिलॉम फौरी यांच्याशी, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.
एअर इंडियाला अडीचशे विमाने, 210 सिंगल एजल ए320 निओज आणि 40 वाईडबॉडी ए320एस यांचा पुरवठा करण्याबाबत एअर इंडिया आणि एअरबस यांच्यात आज झालेल्या या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
हवाई वाहतूक क्षेत्रातील या दोन कंपन्यांमधील ही वाणिज्यिक भागीदारी भारत आणि फ्रान्स या देशांमध्ये असलेल्या धोरणात्मक भागीदारीच्या सामर्थ्याचे देखील दर्शन घडवते. या वर्षी या भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत.
यावेळी केलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा वेगवान विस्तार आणि वाढ यांच्यावर भर दिला. या प्रगतीमुळे भारत आणि उर्वरित जग यांच्यात अधिक उत्तम प्रकारे संपर्क सुविधा प्रस्थापित होण्यास चालना मिळेल आणि त्यातून भारतातील पर्यटन आणि व्यापाराला प्रोत्साहन मिळेल असे ते म्हणाले.
फ्रान्सच्या कंपन्यांच्या भारतातील सशक्त उपस्थितीची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली. सफ्रान या फ्रेंच विमान इंजिन निर्मात्या कंपनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या विमान इंजिनाच्या देखभालीसाठी भारतात सर्वात मोठी एमआरओ उभारण्याबाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयाची देखील त्यांनी आठवण काढली.
भारत-फ्रान्स संबंध पुढे नेण्यात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. जी-20 समूहाच्या अध्यक्षपदाच्या काळात राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत अधिक उत्तम काम करण्याबाबत आशादायी असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
S.Patil/Rajashree/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899242)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam