पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत अल्जामिया-तुस-सैफियाच्या नव्या परिसराचे उद्घाटन


“मी इथे आज पंतप्रधान म्हणून आलेलो नाही, तर ज्या कुटुंबाच्या चार पिढ्यांशी माझे जवळचे संबंध आहेत अशा कुटुंबाचा सदस्य म्हणून आलो आहे.”

“काळानुरूप बदलांचा अंगीकार आणि विकास या बाबतीत, दाऊदी बोहरा समुदायाने कायम स्वतःला सिद्ध केले आहे. अल्जामिया-तुस-सैफिया सारख्या संस्था यांचे जिवंत उदाहरण आहे.”

“देश राष्ट्रीय शिक्षण धोरणासारख्या सुधारणांसह अमृत काळाचे संकल्प घेऊन पुढे वाटचाल करतो आहे.”

“भारतीय तत्वज्ञानाच्या पायावर उभी असलेली आधुनिक शिक्षणव्यवस्था उभारण्याला देशाचे प्राधान्य”

“शैक्षणिक पायाभूत सुविधांचा देशातील वेग आणि व्याप्ती याचीच साक्ष देणारे आहे की, भारत युवकांची एक अशी शक्ती निर्माण करत आहे जी जगाला नवा आकार देणार आहे.”

“आमचे युवा वास्तव जगातील समस्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत आणि सक्रियपणे त्यावर उपाययोजना शोधत आहेत”

“आज देश रोजगार निर्मात्यांसोबत उभा आहे आणि देशात एक विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.”

“भारतासारख्या देशात विकासही तेवढाच महत्वाचा आहे आणि वारसाही”

Posted On: 10 FEB 2023 9:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत मरोळ इथे, अल्जामिया-तुस-सैफिया (सैफी अकादमी) च्या नव्या परिसराचे उद्घाटन झाले. अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समुदायाची मुख्य शैक्षणिक संस्था आहे. सन्माननीय सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली, ही संस्था या समुदायाच्या अध्ययन परंपरा आणि ज्ञानाचे संरक्षण करण्यासाठी काम करत आहे.

यावेळी बोलताना, पंतप्रधान पुढे म्हणाले की आज मी इथे पंतप्रधान या नात्याने आलो नाही, तर एक ज्या कुटुंबाशी आपले चार पिढ्यांपासूनचे स्नेहसंबंध आहेत, त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून आलो आहे.

प्रत्येक समुदाय, समूह किंवा संघटना बदलत्या काळानुसार त्याची प्रासंगिकता अबाधित ठेवण्याच्या क्षमतेवरून ओळखले जातात. “बदलत्या काळानुरूप स्वतःत बदल घडवणे आणि विकासाशी जुळवून घेण्याच्या निकषावर दाऊदी बोहरा समुदायाने स्वतःला सिद्ध केले आहे. अल्जमिया-तुस-सैफिया सारखी संस्था याचे जिवंत उदाहरण आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

दाऊदी बोहरा समुदायासोबतच्या आपल्या प्रदीर्घ सहवासाबद्दल पंतप्रधान यावेळी आत्मीयतेने बोलले. आपण जिथे जातो तिथे बोहरा समाजाच्या लोकांच्या आपुलकीचा वर्षाव आपल्या, असे ते म्हणाले. डॉ. सय्यदना वयाच्या 99 व्या वर्षीही अध्यापन करत असत, अशी आठवण त्यांनी सांगितली, तसेच गुजरातमध्ये असतांना या समुदायासोबतच्या जवळच्या संबंधांविषयी त्यांनी चर्चा केली. सूरत इथे डॉ. सय्यदना यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या समारंभाचेही त्यांनी स्मरण केले. गुजरातमधील पाण्याच्या परिस्थितीत बदल करण्याच्या डॉ. सय्यदना यांच्या कटिबद्धतेविषयी त्यांनी आठवण केली आणि या कामासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, कुपोषणापासून ते पाणीटंचाईसारख्या समस्या हाताळतांना, सरकारच्या प्रयत्नांना समाजाची जोड मिळाली तर काय कसे उत्तमरित्या घडू शकते, याचे हे उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जेव्हा मी केवळ देशातच नाही तर परदेशातही जिथे कुठे जातो, तेव्हा माझे बोहरा बंधू आणि भगिनी हमखास मला भेटायला येतात”, असे पंतप्रधानांनी बोहरा समाजाला भारताबद्दल असलेले प्रेम आणि काळजी अधोरेखित करत सांगितले.

उदात्त हेतूने पाहिलेली स्वप्ने नेहमीच साकार होतात असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, मुंबईत अलजमिआ-तुस-सैफियाचे स्वप्न स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात  पाहिले गेले होते. दांडी कार्यक्रमापूर्वी महात्मा गांधी दाऊदी बोहरा समुदायाच्या नेत्याच्या घरी राहिले होते अशी आठवणही मोदी यांनी सांगितली. पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या विनंतीवरून हे घर सरकारला संग्रहालय उभारण्यासाठी देण्यात आले.यावेळी पंतप्रधानांनी सर्वांना या घराला  भेट देण्याचे आवाहन केले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासारख्या सुधारणांसह अमृत काळातील संकल्प देश पुढे नेत आहे”, असे पंतप्रधानांनी महिला आणि मुलींच्या आधुनिक शिक्षणासाठी नव्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे अधोरेखित करताना सांगितले. अल्जामिया-तुस-सैफियाही देखील या प्रयत्नात पुढाकार घेत   असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या संस्कृतीला अनुसरून आखलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीला देशाचे प्राधान्य  आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  जगभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या नालंदा आणि तक्षशिला सारख्या संस्थांमुळे जेव्हा भारत हे शिक्षणाचे केंद्र होते त्या  काळाचे त्यांनी स्मरण केले.

भारताचे गतवैभव पुन्हा आणायचे असेल तर शिक्षणाचा तो गौरवशाली काळ पुन्हा जागवायला हवा असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 8 वर्षांत विक्रमी संख्येने विद्यापीठे स्थापन झाली  असून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. 2004-2014 दरम्यान 145 महाविद्यालये स्थापन झाली, तर 2014-22 दरम्यान 260 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये अस्तित्वात आल्याची माहिती त्यांनी दिली. “गेल्या 8 वर्षात दर आठवड्याला एक विद्यापीठ आणि दोन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. "हा वेग आणि प्रमाण  हे भारत हा जगाला आकार देणाऱ्या प्रतिभावान युवकांची मोठी संख्या असलेला देश  बनणार आहे या वस्तुस्थितीचा पुरावा  आहे ."

भारतातील शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण बदलांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी शिक्षण व्यवस्थेत प्रादेशिक भाषांचे महत्त्व अधोरेखित केले. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण आता प्रादेशिक भाषांमध्ये घेता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वामित्व हक्क (पेटंट)  प्रक्रियेच्या सुलभीकरणामुळे भारतात पेटंट मिळवण्याच्या व्यवस्थेला मोठी मदत झाली अशी माहिती पंतप्रधानांनी  दिली . शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि सांगितले की, आजच्या तरुणांना तंत्रज्ञान आणि नवोन्मेषला  सामोरे जाण्यासाठी कौशल्याने सुसज्ज केले जात आहे.   "आमच्या तरुणांना वास्तविक जगातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जात आहे  आणि ते सक्रियपणे त्यावर उपाय शोधत आहेत", असे पंतप्रधान म्हणाले.

कोणत्याही देशासाठी शिक्षण प्रणाली आणि मजबूत औद्योगिक परिसंस्था या एकसारख्या महत्त्वाच्या असतात. संस्था आणि उद्योग हे दोन्ही युवकांच्या भविष्याचा पाया रचतात, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या ८- ९ वर्षांत लोकांनी व्यवसाय सुलभतेच्या दिशेने झालेल्या ऐतिसाहिक सुधारणा पाहिल्या आहेत, त्यांना अनुभवले आहे, असे ते म्हणाले.

देशाने 40 हजार अनुपालन रद्द केले आणि शेकडो गुन्हेगारी तरतुदी रद्द केल्या अशी  माहिती  त्यांनी दिली.  या कायद्यांचा वापर करून उद्योजकांच्या व्यवसायावर परिणाम करणारा छळ कसा केला गेला याची आठवण त्यांनी करून दिली. आज देश रोजगार निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  42 केंद्रीय कायदे रद्द केले आणि विवाद से विश्वास योजना सुरू केली.  सुधारणा करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या जन विश्वास विधेयकाने उद्योग मालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यंदाच्या अर्थसंकल्पात कर दरांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने कर्मचारी आणि उद्योजकांच्या हातात अधिक पैसा येईल, असेही त्यांनी नमूद केले.

भारतासारख्या देशासाठी विकास आणि वारसा तितकेच महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील प्रत्येक समुदाय आणि विचारसरणीचे वेगळेपण त्यांनी अधोरेखित केले. या वेगळेपणाचे श्रेय त्यांनी भारतातील वारसा आणि आधुनिकतेच्या विकासाच्या समृद्ध मार्गाला दिले. भौतिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा या दोन्ही आघाड्यांवर देश काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.  आम्ही प्राचीन पारंपरिक सण साजरे करत आहोत, त्याचवेळी डिजिटल पेमेंटचा वापर करत आहोत, असे त्यांनी नमूद केले. नवीन तंत्रांच्या मदतीने प्राचीन नोंदींचे डिजिटायझेशन करण्याची घोषणा करण्यात आली आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व समाज आणि संप्रदायांच्या सदस्यांना पुढे येऊन त्यांच्याशी संबंधित कोणत्याही प्राचीन ग्रंथांचे डिजिटलायझेशन करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या मोहिमेशी तरुणांना जोडून बोहरा समाज काय योगदान देऊ शकतो यावर त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी पर्यावरण संरक्षण, भरड धान्याला चालना आणि भारताचे जी 20 अध्यक्षपद यासारख्या कार्यक्रमांची उदाहरणे  दिली. या उपक्रमात देखील बोहरा समाजातल्या लोकसहभागाला प्रोत्साहित करू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले,“परदेशातील बोहरा समाजाचे लोक ‘शायनिंग इंडिया’चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करू शकतात. विकसित भारताच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी दाऊदी बोहरा समुदाय महत्त्वाची भूमिका बजावत राहील.”

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प.पू. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन आणि मंत्री उपस्थित होते.

***

S.Tupe/G.Chippalkatti/S.Bedekar/R.Aghor/S.Kane/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898128) Visitor Counter : 250