पंतप्रधान कार्यालय

अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहातील सर्वात मोठ्या 21 निनावी बेटांना 23 जानेवारी रोजी परमवीर चक्र पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी


या बेटांना परमवीर चक्र पुरस्कारांच्या मानकऱ्यांचे नाव देणे म्हणजे त्यांना कायमस्वरुपी अभिवादन ठरेल.

वास्तविक जीवनातील नायकांचा सन्मान करण्यासाठी आणि मान्यता देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून उचललेले पाऊल.

नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपावर उभारण्यात येणाऱ्या नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे पंतप्रधान करणार अनावरण

Posted On: 21 JAN 2023 6:25PM by PIB Mumbai

 

यंदाच्या पराक्रम दिनी 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहातील नामकरण न झालेल्या सर्वात मोठ्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे देण्याच्या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपावर उभारण्यात येणाऱ्या नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरण देखील याच कार्यक्रमात पंतप्रधान करणार आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2018 मधील या बेटांच्या भेटीच्या वेळी रॉस बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे नाव देण्यात आले होते. नील बेट आणि हॅवलॉक बेट यांचे देखील शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण करण्यात आले होते.

देशात वास्तविक जीवनातल्या खऱ्या  नायकांना योग्य आदर सन्मान देण्याला पंतप्रधानांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने  आता  द्वीपसमूहातील नामकरण न झालेल्या  21 सर्वात मोठ्या बेटांना  21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्या  वीरांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधील सर्वात मोठ्या बेटाला पहिल्या परमवीर चक्र  पुरस्कार विजेत्याचे तर दुसऱ्या क्रमांकावरील मोठ्या बेटाला दुसऱ्या परमवीर चक्र पुरस्कार  विजेत्याचे नाव अशाप्रकारे ही नावे दिली जातील .या  वीरांपैकी कित्येकांनी आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले त्या वीरांना हा कायमस्वरूपी सन्मान ठरेल.

ही बेटे ज्या परमवीर चक्र  विजेत्यांच्या नावाने ओळखली जातील त्यांची नावे पुढीलप्रमाणे - मेजर सोमनाथ शर्मा , सुभेदार आणि मानद कॅप्टन ( तत्कालीन लान्स नायक) करम सिंग एम एम, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पीरू सिंग, कॅप्टन जी. एस सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, CQMH अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बर्जोरजी तारापोर, लान्स नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखॉ, मेजर रामस्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बनासिंग, कॅप्टन विक्रम बात्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर (तत्कालीन रायफल मॅन) संजय कुमार आणि निवृत्त सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव.

***

S.Kane/S.Patil/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1892734) Visitor Counter : 238