पंतप्रधान कार्यालय

हावडा आणि न्यू जलपायगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना आणि कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनवरील जोका- तराताला पट्ट्याच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण

Posted On: 30 DEC 2022 3:21PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. वी. आनंदबोस जी, मुख्यमंत्री ममता जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, सुभाष सरकार जी, निसिथ प्रामाणिक जी, जॉन बारला जी, विरोधी नेते सुवेंदु अधिकारी जी, खासदार प्रसून जी, मंचावर विराजमान अन्य सहकारी, स्त्री आणि पुरुष गण,

आज मला तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटायचे होते, मात्र माझ्या खासगी कारणास्तव मी तुमच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, यासाठी मी तुमची, बंगालची माफी मागतो. बंगालच्या पुण्य भूमीला, कोलकाताच्या ऐतिहासिक भूमीला वंदन करण्याची आज मला संधी आहे. बंगालच्या कणा-कणांमध्ये स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समाहित आहे. ज्या भूमीवरून वंदे मातरमचा जयघोष झाला, त्या भूमीवर आज वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आज 30 डिसेंबर तारखेलाही इतिहासात खूप महत्व आहे. 30 डिसेंबर, 1943, या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान बेटावर तिरंगा ध्वज फडकवला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते.

या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने 2018 मध्ये मी अंदमानला गेलो होतो, नेताजींच्या सन्मानार्थ एका बेटाला त्यांचे नाव देखील दिले होते. आणि आता देश स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करत आहे, अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात देशाने 475 वंदे भारत गाड्या सुरू करण्याचा संकल् केला होता. आज यापैकी एक हावडा-न्यू जलपायगुड़ी वंदे भारत गाडी कोलकाता इथून सुरु झाली आहे. आजच रेल्वे आणि मेट्रोच्या कनेक्टिव्हीटीशी संबंधित अन्य प्रकल्पांचेही लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे. सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्चून जोका -बीबीडी बाग मेट्रो प्रकल्पाचे काम केले जात आहे. यापैकी जोका-तारातला मेट्रो मार्ग बनून तयार आहे. यामुळे शहरातील लोकांचे जगणे अधिक सुखकर होईल.

 

मित्रहो,

काही वेळानंतर मला गंगा नदीची स्वच्छता आणि पश्चिम बंगालला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याशी संबंधित अनेक प्रकल्प समर्पित करण्याची संधीही मिळणार आहे. नमामि गंगे मिशन अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये सांडपाणी / मलनिःसारण संबंधी 25 हून अधिक प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 11 प्रकल्प याआधीच पूर्ण झाले आहेत, तर 7 प्रकल्प आज पूर्ण होत आहेत. आज दीड हजार कोटी रुपये खर्चाच्या 5 नव्या प्रकल्पांवर देखील काम सुरु होत आहे.यामध्ये जे प्रमुख आहेत, ते म्हणजे आदि गंगा नदीचे पुनरुज्जीवन आहे. मला सांगण्यात आले आहे की आता आदि गंगा नदीची स्थिती दुर्दैवाने खूप वाईट आहे. यामध्ये जो कचरा जातो, सांडपाणी जाते, त्याच्या सफाईसाठी 600 कोटी रुपयांहून अधिक आधुनिक पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत.

आपण अनेकदा आयुष्यात प्रतिबंधक आरोग्यसेवेबद्दल चर्चा करत असतो आणि आपण म्हणतो की दिनचर्या अशी असायला हवी की आजार होणारच नाही. अगदी तसेच नदीतील अस्वच्छता साफ करण्याबरोबरच केंद्र सरकार प्रतिबंधावर देखील अधिक भर देत आहे. आणि या प्रतिबंधाची सर्वात मोठी आणि आधुनिक पद्धत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ही आहे.

आगामी 10-15 वर्षांनंतरच्या गरजा लक्षात घेऊनच देशात आजच आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपल्याला भविष्यवादी दृष्टिकोन आणि विचारासह देशाला पुढे न्यायचे आहे

 

मित्रहो,

या 21 व्या शतकात भारताच्या वेगवान विकासासाठी भारतीय रेल्वेचाही वेगवान विकास, भारतीय रेल्वेत जलद सुधारणा होणे खूप आवश्यक आहे. म्हणूनच आज केंद्र सरकार भारतीय रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी, रेल्वेच्या पायाभूत सुविधा आधुनिक बनवण्यासाठी विक्रमी गुंतवणूक करत आहे. आज भारतात भारतीय रेल्वेचा कायापालट करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरु आहे.

आज वंदे भारत, तेजस, हमसफर सारख्या आधुनिक रेल्वेगाड्या देशात तयार होत आहेत. आज विस्टाडोम कोचेस रेल्वे प्रवाशांना नवा अनुभव देत आहेत. आज सुरक्षित, आधुनिक कोचेसच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. आज रेल्वे स्थानकेही विमानतळाप्रमाणे विकसित केली जात आहेत. न्यू जलपायगुड़ी स्थानकाचाही या यादीत समावेश आहे.

आज रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण ज्या गतीने होत आहे, ते यापूर्वी कधी झाले नाही. देशात जो पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडोर तयार होत आहेत, त्यामुळे लॉजिस्टिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून येणार आहेत. सुरक्षा असेल,, स्वच्छता असेल, सामर्थ्य असेल, सामंजस्य असेल, वक्तशीरपणा आणि विविध सेवासुविधा असतील, भारतीय रेल्वेला आज एक नवी ओळख बनवण्याचे आपले सर्वांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत.

गेल्या आठ वर्षात भारतीय रेल्वेने आधुनिकतेचा पाया अधिक भक्कम करण्याचे काम केले आहे. आणि पुढील आठ वर्षांत भारतीय रेल्वेचा आधुनिकीकरणाच्या दिशेने सुरू झालेला नवा प्रवास सुरु झालेला आपल्याला पाहायला मिळेल. भारतासारख्या तरुण देशासाठी भारतीय रेल्वे देखील तरुण दिसणार आहे. आणि यामध्ये 475 पेक्षा अधिक वंदे भारत गाड्यांची नक्कीच मोठी भूमिका असेल.

 

मित्रहो,

स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये 20 हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले. तर 2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर मागील 7-8 वर्षातच 32 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले गेलेआहे. हा आहे देशाचा काम करण्याचा वेग, रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा वेग. आणि हा वेग आणखी वाढवण्यासाठी आता भारतात जगातील सर्वात शक्तिशाली विजेवरील रेल्वे-इंजिनांचीही वेगाने निर्मिती होत आहे

 

मित्रहो,

आजच्या भारताचा वेग आणि व्याप्तीचे आणखी एक उदाहरण आपली मेट्रो रेल्वे प्रणाली आहे.

कोलकत्त्याच्या लोकांना माहित आहे की अनेक दशकं मेट्रो रेल्वे, सार्वजनिक वाहतूकीचं किती उत्तम साधन आहे. 2014च्या पूर्वी पर्यंत देशात मेट्रोचं एकूण जाळं 250 किलोमीटरपेक्षा देखील कमी होतं. आणि यात सर्वात जास्त वाटा दिल्ली - राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचाच होता. केंद्र सरकारने ही स्थिती देखील बदलली आहे, ही परिस्थिती बदलण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि अतिशय वेगाने ही परिस्थिती बदलली आहे.

गेल्या 8 वर्षांत आम्ही मेट्रो दोन डझन पेक्षा जास्त शहरांत नेली आहे. आज देशाच्या वेगवेगळ्या शहरांत जवळपास 800 किलोमीटर ट्रॅकवर मेट्रो धावत आहे. 1000 किलोमीटरच्या नव्या मेट्रो मार्गांवर वेगाने काम सुरु आहे. जोका - बीबीडी बाग मेट्रो प्रकल्प याच संकल्पाचा भाग आहे.

 

मित्रांनो,

गेल्या शतकापासून भारतासमोर दोन आणि मोठी आव्हानं उभी होती, ज्यामुळे देशाच्या विकासावर फार मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. एक आव्हान होतं पायाभूत सुविधा उभारणाऱ्या विविध संस्थांमध्ये अजिबात समन्वय नसणे. याचा परिणाम असा झाला की सरकारच्या एका विभागाला माहित नसायचं की दुसरा विभाग कुठे काम सुरु करणार आहे. याचा भुर्दंड देशाच्या प्रामाणिक करदात्यांना पडत असे.

देशाचे प्रामाणिक करदाते सरकारी पैशाची नासाडी, प्रकल्प पूर्ण व्हायला लागणारा वेळ या सगळ्याचा तिरस्कार करतात. जेव्हा ते बघतात की त्यांच्या कष्टाच्या कमाईतून दिलेल्या करामुळे गरिबांचं, नाही तर भ्रष्टाचारी लोकांचं भलं होत आहे, तर त्यांना दुःख होणं स्वाभाविक आहे.

पैशाची ही नासाडी थांबविण्यासाठी, विभागांमध्ये, सरकारांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा लागू केला आहे. आता वेगवेगळी राज्य सरकारं असोत, वेगवेगळे सरकारी विभाग असो, बांधकामाशी संबंधित संस्था असो, अथवा उद्योग क्षेत्रातले लोक असोत, सर्व एकाच मंचावर येत आहेत.

पीएम गतिशक्ती योजना देशात वाहतुकीच्या वेगवेगळ्या माध्यमांना जोडण्याच्या कामाला देखील वेग देत आहे. आज देशात विक्रमी वेगाने महामार्ग बनत आहेत, विमानतळ बनत आहेत, जलमार्ग बनत आहेत, नवीन बंदरे बनत आहेत आणि यातही सर्वात मोठी गोष्ट ही आहे की यांना आता अशाप्रकारे तयार केले जात आहे की वाहतुकीचे एक माध्यम वाहतुकीच्या दुसऱ्या माध्यमाला पूरक असेल. म्हणजे, महामार्ग उत्तम रीतीने रेल्वे स्थानकांना जोडलेले असावेत, रेल्वे स्थानक विमानतळाशी जोडलेले असावे, लोकांना प्रवास करताना लोकांना सुलभ जोडणी देखील मिळावी

 

मित्रांनो,

21व्या शतकात वेगाने पुढे जाण्यासाठी आपल्याल्या देशाच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करावा लागेल. मी देशातल्या लोकांना जलमार्गांचे उदाहरण देखील देऊ इच्छितो. एक काळ होता, जेव्हा भारतात व्यापार-व्यवसाय आणि पर्यटन या साठी जलमार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. म्हणूनच अनेक शहरं नदी किनारी वसली, नद्यांच्या काठांवर इतका औद्योगिक विकास झाला. मात्र हे सामर्थ्य आधी शेकडो वर्षांची गुलामी आणि मग स्वातंत्र्यानंतर सरकारच्या उदासीनतेमुळे नष्ट झाले.

आता भारत आपली ही जलशक्ती वाढविण्यावर काम करत आहे, देशात 100 पेक्षा जास्त जलमार्ग विकसित केले जात आहेत. भारताच्या नद्यांमध्ये आधुनिक जहाजे चालवली जावीत, व्यापार देखील व्हावा, या दिशेने आम्ही वेगाने पुढे जात आहोत. केंद्र सरकार ने बांग्लादेश सरकारच्या सहकार्याने गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांवर जलमार्ग लिंक स्थापन करण्यावर देखील काम केले आहे.

मी आज देशाच्या लोकांना या संबंधीची एक माहिती देऊ इच्छितो. 13 जानेवारी 2023 ला काशीहून, वाराणसीहून एक क्रुझ जाणार आहे, जो 3200 किलोमीटर जलमार्गावरून, बांग्लादेश मार्गे दिब्रुगडला जाईल. हा जगातील एक अभूतपूर्व क्रुझ असेल. ते भारतात वाढत असलेल्या क्रुझ पर्यटनाचे प्रतिक बनेल. मी पश्चिम बंगालच्या लोकांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी याचा लाभ घ्यावा.

खरं म्हणजे मी आज आणखी एका गोष्टीसाठी खासकरून बंगालच्या लोकांना नमन करू इच्छितो. बंगालच्या लोकांमध्ये मातृभूमीविषयी जे प्रेम आहे, त्याचा मी नेहमीच प्रशंसक राहिलो आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांविषयी माहिती घेण्याचा, देशाच्या वेगवेगळ्या भागांत भ्रमण करण्याचा बंगालच्या लोकांमध्ये जो उत्साह असतो, तो अद्भुत असतो.

अनेक लोक, पहिली संधी मिळताच कुठल्या तरी दुसऱ्या देशात फिरायला जातात. मात्र बंगालचे लोक नेहमी आपल्या देशाला प्राथमिकता देतात. बंगालचे लोक पर्यटनात देखील राष्ट्र प्रथम ही भावना ठेऊन असतात. आणि आज जेव्हा देशात दळणवळण सुविधा वाढत आहेत, रेल्वे - महामार्ग - आयवे - जलमार्ग आधुनिक होत आहेत तर यामुळे प्रवासातील सुलभता देखील तितकीच वाढत आहे. याचा मोठा फायदा बंगालच्या लोकांना देखील मिळत आहे.

 

मित्रांनो,

गुरुदेव टागोर यांनी रचलेल्या प्रसिद्ध ओळी आहेत -

ओमार देशेर माटी, तोमार पौरे ठेकाई माथा

म्हणजे, हे माझी मातृभूमी, मी तुझ्या समोर नतमस्तक होत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, मातृभूमी सर्वोपरी ठेऊन आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे. आज पूर्ण जग भारताकडे मोठ्या विश्वासाने बघत आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला पूर्ण शक्तीनिशी काम करायचे आहे. आपण प्रत्येक दिवस राष्ट्र निर्माणासाठी द्यायचा आहे, प्रत्येक क्षण राष्ट्र निर्मितीसाठी द्यायचा आहे. देश सेवेची कामं आपण थांबवता कामा नये. याच शब्दांसोबत मी या अनेक प्रकल्पांसाठी बंगालचे अभिनंदन करतो. पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि माझे भाषण संपवतो.

अनेक अनेक धन्यवाद!

***

N.Chitale/S.Kane/R.Aghor/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887749) Visitor Counter : 126