पंतप्रधान कार्यालय

श्री स्वामीनरायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी समारंभात पंतप्रधानांचे दृकश्राव्य पद्धतीने संबोधन


“विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी गुरुकुलात चांगले विचार आणि मूल्ये याद्वारे विद्यार्थ्यांची बुद्धी आणि मन विकसित करण्यात आले आहे”

“खऱ्या मूल्यांचा प्रसार करणे हे जगातील सर्वात महत्वाचे काम आहे. भारत या कार्याला समर्पित आहे”

“अध्यात्मिकतेला समर्पित विद्यार्थ्यांपासून ते इस्रो आणि भाभा अणू संशोधन केंद्रात वैज्ञानिकांपर्यंत   गुरुकुल परंपरेने देशाच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे”

“अध्ययन आणि संशोधन हे भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहे”

“आमच्या गुरुकुलांनी  मानवतेला विज्ञान, अध्यात्मिकता आणि लैंगिक समानता, यावर मार्गदर्शन केले आहे”

“देशात शैक्षणिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी न भूतो न भविष्याती काम सुरू आहे.”

Posted On: 24 DEC 2022 12:11PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला दुरदृश्य प्रणालीद्वारे आज संबोधित केले.

याप्रसंगी बोलतांना पंतप्रधानांनी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानने 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल उपस्थितांचे आणि या संस्थेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनी शास्त्रीजी महाराज, धर्मजीवनदासजी स्वामी यांच्या संस्थानच्या आजवरच्या वाटचालीत दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. भगवान श्री स्वामी नारायण यांचे नामस्मरण केले तरी एक नवीन अनुभूती होते, असे पंतप्रधान म्हणाले.

हा पवित्र समारंभ स्वातंत्र्याच्या अमृत काळात होत आहे, हा योगायोग आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. हा आनंदाचा प्रसंग आहे असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या इतिहासातल्या अशा अनेक योगायोगांमुळे भारतीय परंपरेला ऊर्जा मिळाली आहे. इतिहासातील अशा संगमांचे दाखले पंतप्रधानांनी दिले. कर्तव्य आणि कठोर परिश्रम, संस्कृती आणि समर्पण, आध्यात्मिकता आणि आधुनिकता अशा सर्व संगमांचा त्यांनी उल्लेख केला. भारतात शिक्षणव्यवस्थेकडे झालेल्या दुर्लक्षाबद्दल आणि स्वातंत्र्यानंतर लगेच, आपल्या प्राचीन शिक्षण व्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी दाखवण्यात आलेली उदासीनता, याविषयी पंतप्रधानांनी  खंत व्यक्त केली. आधीच्या सरकारांकडून ही चूक झाली, असं सांगत, पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय संत आणि आचार्यांनी हे आव्हान स्वीकारले होते. स्वामीनारायण गुरुकुल देखील या सुयोगाचे उदाहरण आहे. असे पंतप्रधान म्हणाले. ही संस्था, स्वातंत्र्यचळवळीतील मूल्ये आणि आदर्श यांच्या पायावर विकसित करण्यात आली होती.

खरे ज्ञान लोकांना देणं ही अत्यंत महत्वाचे काम आहे. भारताचे ज्ञान आणि शिक्षणक्षेत्रातील समर्पित कार्य, यातूनच भारतीय संस्कृतीची पाळेमुळे रूजली गेली आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

गुरूकुल विद्या प्रतिष्ठानमने राजकोट येथे केवळ सात विद्यार्थ्यांनी सुरूवात केली असली तरीही आज जगभरात त्याच्या चाळीस शाखा आहेत आणि  सर्व जगातून हजारो विद्यार्थी आकर्षित होऊन तेथे प्रवेश घेण्यासाठी येत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या 75 वर्षांत गुरूकुल संस्थेने उत्तम विचार आणि मूल्यांनी विद्यार्थ्यांची मने आणि ह्रदयांची मशागत केली आहे. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. अध्यात्मिकतेपासून ते इस्त्रो आणि  बीएआरसीमधील वैज्ञानिक या क्षेत्रातील समर्पित विद्यार्थ्यांसह गुरूकुल परंपरेने देशाच्या प्रत्येक क्षेत्राचे पालनपोषण केले आहे, असे ते म्हणाले. गरीब विद्यार्थ्यांना केवळ एक रूपया शुल्क आकारले जात असून त्याद्वारे त्यांच्यासाठी शिक्षण घेणे सहजसाध्य होत असल्याच्या बाबीवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

ज्ञानालाच  जीवनातील सर्वोच्च ध्येय समजणे  ही भारताची परंपरा असल्याच्या अनुरोधाने पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा जगाचे इतर देश त्यांच्या सत्ताधारी राजघराण्यांच्या नावाने ओळखले जात होते, तेव्हा भारताची ओळख ही गुरूकुल परंपरेशी जोडली गेली होती.  आमचे गुरूकुल न्यायप्रियता, समानता, काळजी घेणे आणि सेवाभाव यांचे शतकानुशतके प्रतिनिधित्व करत आले आहेत, असेही त्यांनी पुढे म्हटले. भारताच्या प्राचीन वैभवाचे समानार्थी शब्द म्हणून नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांचे स्मरण त्यांनी केले. भारतीय जीवनशैलीचा अंतर्गत घटक हा नवनवीन शोध आणि संशोधन हाच राहिला आहे. आत्मशोधापासून ते अध्यात्मिकता, आयुर्वेदापासून ते अध्यात्म, सामाजिक विज्ञानापासून ते सौर विज्ञान, अंकगणितापासून ते धातूशास्त्र आणि शून्यापासून ते अनंत काळापर्यंत, प्रत्येक क्षेत्रात संशोधन आणि नवीन निष्कर्ष काढण्यात आले. भारताने त्या अंधारयुगातही मानवतेला आशेचे किरण प्रदान केले ज्यामुळे आधुनिक विज्ञानाकडे जगाच्या प्रवासाचा मार्ग प्रशस्त झाला, असे त्यांनी सांगितले. भारतीय प्राचीन गुरूकुल व्यवस्थेत स्त्रीपुरूष समानता आणि संवेदनशीलता यांना महत्व दिले जात होते, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकतानाच, स्वामी नारायण गुरूकुलने कन्या गुरूकुल सुरू केल्याबद्दल संस्थेची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी भारताचे भविष्य उज्वल आणि चमकदार बनवण्यात शिक्षण व्यवस्था आणि शैक्षणिक संस्थांनी बजावलेल्या भूमिकेवर जोर दिला. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश प्रत्येक स्तरावर शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि धोरणे विकसित करण्याच्या  दिशेने अत्यंत वेगाने वाटचाल करत आहेअसे त्यांनी सांगितले. आयआयटी, आयआयआयटी, आयआयएम आणि एम्स अशा संस्थांच्या संख्येत देशाने वाढ झाल्याचे पाहिले असून 2014 पूर्वीच्या तुलनेत आता  वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 65 टक्के वाढ झाल्याचे दिसले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यांनी पुढे असेही सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणासह (एनईपी) देश अशी शिक्षण व्यवस्था तयार करत आहे जी भविष्यवेधी असेल. परिणामस्वरूप, ज्या नव्या पिढ्या नव्या व्यवस्थेतून शिक्षण घेतील, त्या देशाचे आदर्श नागरिक होऊ शकतील. पुढील 25 वर्षात देशाच्या प्रवासात संताच्या भूमिकेच्या महत्वावर पंतप्रधानांनी जोर दिला. आज भारताचे निर्धार आणि  ते साकारण्याचे प्रयत्नही नूतन आहेत. आज देश डिजिटल भारत, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकलप्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे आणि एक भारत श्रेष्ठ भारत असे दृष्टीकोन घेऊन पुढे वाटचाल करत आहे. सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक सुधारणांच्या या प्रकल्पांमध्ये सबका प्रयास यामुळे (प्रत्येकाचे प्रयत्न)  कोट्यवधी लोकांच्या जीवनांवर प्रभाव पडणार आहे. पंतप्रधानांनी गुरूकुलच्या  विद्यार्थ्यांना राष्ट्र आणखी बळकट करण्यासाठी किमान 15 दिवस ईशान्य भारतात प्रवास करून त्या लोकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले. बेटी बचाव आणि पर्यावरण संरक्षण  अशा विषयांनाही पंतप्रधानांनी स्पर्श केला आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन लोकांना केले. स्वामी नारायण गुरूकुल विद्या प्रतिष्ठानमसारख्या संस्था भारताच्या या निर्धारांना जबरदस्त पाठबळ देण्याचे काम सुरूच ठेवतील, अशी माझी खात्री आहे, असे पंतप्रधानांनी समारोप करताना म्हटले.

 

पार्श्वभूमी

श्री स्वामी नारायण गुरूकुल राजकोट संस्थान हे राजकोट येथे गुरूदेव शास्त्री महाराज श्री धर्मजीवनदासजी स्वामी यांनी 1948 मध्ये स्थापन केले. संस्थानचा आता भरपूर विस्तार झाला असून जगभरात त्याच्या 40 शाखा आहेत. त्यात शाळांसाठी सुविधा तसेच 25,000 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जात  आहे.

***

M.Chopade/R.Aghor/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886275) Visitor Counter : 187