माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यात झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची शानदार सोहळ्याने सांगता
कोस्टारिकाच्या व्हॅलेंटीना मॉरेल दिग्दर्शित 'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या स्पॅनिश चित्रपटाला 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार
'नो एंड' या चित्रपटासाठी इराणचे प्रख्यात लेखक दिग्दर्शक इराणी लेखक आणि दिग्दर्शक नादेर साईवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार
‘नो एंड’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार
'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर (सिल्व्हर पिकॉक) पुरस्काराने सन्मानित
फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना ‘व्हेन द वेव्हज आर गॉन’ साठी विशेष ज्युरी पुरस्कार
बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार
प्रवीण कांड्रेगुला यांना "सिनेमाबंदी" या तेलुगु चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांचा ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर -2022’ या पुरस्काराने सन्मान
गोवा/मुंबई, 28 नोव्हेंबर 2022
गेले नऊ दिवस देशविदेशातील चित्रपट रसिकांना अनेक दर्जेदार आणि विविधांगी चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची आज गोव्यात पणजी इथे, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियमवर झालेल्या शानदार सोहळ्याने सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्यासह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि चित्रपट क्षेत्रातले नामवंत कलाकार उपस्थित होते. सर्जनशिलतेचा तरल अनुभव देणाऱ्या या महोत्सवातल्या सिनेमांपैकी, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणी बाजी मारली याची उत्सुकताही आता संपुष्टात आली आहे. पुरस्कारासाठी परीक्षकांनी केलेली निवड म्हणजे केवळ कलेचा सन्मान नाही, तर ही निवड आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच प्रेरणा देखील आहे.
“प्रादेशिक चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचले आहेत. चित्रपटांमध्ये सशक्त आशय असेल तर, ते सहजपणे सर्वदूर पोहचतात आणि त्यांचं भरपूर कौतुकही होतं,” असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. या चित्रपट महोत्सवात विविध भाषांमधले उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्यात आले. त्यामुळे या विविधांगी कलेच्या क्षेत्रातल्या प्रतिभाशाली व्यक्तींच्या कलेचा अविष्कार आपल्याला अनुभवता आला. भारत आज तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे, या उच्च तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय चित्रपटांना जगभरात पोहचवण्यासाठी पुढेही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.
''आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या स्पॅनिश चित्रपटाला 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार
यंदाच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात / इफ्फीमध्ये टेंगो सुएनोस इलेक्ट्रिकोस /'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या स्पॅनिश चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सूवर्ण मयुर पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटातून सिने जगताच्या वर्तमान आणि भविष्याचं प्रतिबींद पडद्यावर उमटलेलं दिसतं असं मत परीक्षकांनी व्यक्त केलं आहे. या सिनेमातून दिग्दर्शकानं इव्हा या 13 वर्षांच्या मुलीच्या प्रौढावस्थेत जाण्याचा प्रवास मांडला आहे. पडद्यावर मांडलेला हा प्रवास म्हणजे निव्वळ वय वाढण्याची प्रक्रिया नाही, तर तो बदलांच्यादृष्टीनं अत्यंत तपशीलवार मांडला असल्यानं, चित्रपटातली अनेक दृश्य पाहतांना प्रेक्षकांच्या मनालाही चटका लावून जातात असंही परीक्षकांनी म्हटलं आहे. या चित्रपटातून मानवी जीवनातली गुंतागुंत अत्यंत प्रामाणिकपणे साकारली असून, हिंसा आणि चैतन्य, भिती आणि जवळीक या भावना एकसमान वाटू लागतात, या सिनेमातूेन मानवी जीवनाचे पैलू इतक्या तरलतेनं मांडले आहेत, की त्यामुळे हा सिनेमा पाहताना आम्हाला स्वतःलाही अनेकदा कंप फुटल्याचा अनुभव आल्याचंही परीक्षकांनी म्हटलं आहे.
हा चित्रपट, जो लोकांना जगाच्या दुसर्या बाजूच्या कथांसह ओळखण्यात मदत करू शकतो आणि त्याच वेळी कौटुंबिक मूल्ये किंवा सार्वत्रिक असलेल्या भावनांशी जोडू शकतो, बेनोइट रोलँड आणि ग्रेगोअर डेबॅली यांनी निर्मित केला आहे.
इराणमधल्या प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं जादुई आणि मार्मिक चित्रण असलेल्या 'नो एंड' या चित्रपटासाठी इराणचे प्रख्यात लेखक दिग्दर्शक इराणी लेखक आणि दिग्दर्शक नादेर साईवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार
नो एंड / बाई पायन हा तुर्कीश सिनेमा असून यात इराणच्या गुप्त पोलिसांकडून केली जाणारी हेराफेरी आणि कारस्थानांचं दिग्दर्शक नादेर सैवर यांनी प्रभावी चित्रण केलं आहे. या सर्जनशीलतेनंच त्यांना 53व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार मिळवून दिला आहे. नादेर यांनी या चित्रपटातून अयाज या शांत संयमी आणि प्रामाणिक व्यक्तीची कथा मांडली आहे. काही एका कारणामुळे आपलं घर सुरक्षित राखण्याच्या आर्जवी प्रयत्नातून गुप्त पोलीसांसमोर खोटी कथा रचतो. मात्र प्रत्यक्षात जेव्हा या सगळ्या प्रकरणात खऱ्या गुप्त पोलीसांचा प्रवेश होतो, तेव्हा कथेतली गुंतागुंत अधिक वाढत जाते. या चित्रपटासाठी नादेर यांना पुरस्कार जाहीर करताना सर्व परीक्षकांचं एकमत होतं ही बाब परीक्षकांनी आवर्जून नमूद केली. इराणमधल्या घटनाचं संदर्भानं मांडलेल्या या कथानकातून प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं दिग्दर्शक नादेर यांनी अंत्यत जादुई आणि मार्मिक चित्रण केलं आहे, हा सिनेमा तसा संथ असला तरी डोळ्यात अंजन घालणारा आणि संवेदनशील असल्याचं मतही परीक्षकांनी व्यक्त केलं आहे.
नो एंड या चित्रपटातील मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार, रौप्य मयुर पुरस्कारानं भावनांच्या गुंतागुंतीतून यातनांच्या गर्तेत सापडलेल्या नायकाचं पात्र जिवंत करणाऱ्या अभिनयाचा गौरव.
नादेर साईवार दिग्दर्शित नो एंड या सिनेमातलं मुख्य पात्र साकारणाऱ्या वाहिद मोबस्सेरी यांची परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कारासाठी एकमतानं निवड केली. या चित्रपटातल्या अयाज या मूख्य पात्राची, भावनांच्या गुंतागुंतीतून यातनांच्या गर्तेत सापडलेल्या नायकाची भूमिका साकारताना, त्या नायकाचे विविध पैलू, नायकात घडणारं स्थित्यंतर कोणत्याही शब्दांशिवाय केवळ आपला चेहरा आणि देहबोलीतून साकारलं आहे असं कोतुकास्पद निरीक्षण परीक्षकांनी नोंदवलं आहे. ही भूमिका साकारताना वाहिद यांनी उभ्या केलेल्या पात्रातून सामान्य माणसानं निषेध नोंदवण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांच्या मनात रुजतो, हताश, असुरक्षिततेनं ग्रासलेला सामान्य इराणी माणूस त्यांच्यासमोर उभा राहतो असं मतही परीक्षकांनी नोंदवलं आहे.
'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर (सिल्व्हर पिकॉक) पुरस्काराने सन्मानित
डॅनिएला मारिन नवारो या 19 वर्षांच्या युवा अभिनेत्रीची, आपल्या पदार्पणातच, स्पॅनिश चित्रपट, ‘'आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स' मधल्या 16 वर्षांच्या मुलीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर (सिल्व्हर पिकॉक) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या प्रशस्तीपत्रावर, ज्यूरी सदस्यांनी लिहिले आहे,की या पुरस्कारासाठी डॅनिएलाची निवड करण्यात आली कारण, तिच्या अभिनयातील सहजता, ताजेपणा आणि विश्वासार्हता, यामुळे,तिने ही व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. तिच्या अनवट किशोरवयात असलेलं नैसर्गिक अबोधपण, या भूमिकेत उतरलं आहे.”
विशेष म्हणजे, याच चित्रपटातील भूमिकेसाठी डॅनिएला ला लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना व्हेन द वेव्हज आर गॉन / (Kapag wala nang mga alon) साठी विशेष ज्युरी पुरस्कार
53 व्या इफ्फीमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार, “व्हेन द वेव्हज गॉन” या फिलिपिनो चित्रपटाचे निर्माते लव्ह डियाझ यांना मिळाला आहे. त्यांच्या प्रशस्तीपत्रावर, चित्रपटाचे वैशिष्ट्य लिहितांना ज्यूरी सदस्यांनी म्हटलं आहे- “हा चित्रपट, केवळ दृश्य माध्यमातून प्रत्यक्ष कथा सांगण्याच्या ताकदीची प्रभावी प्रचिती देतो. यात कमीतकमी शब्द आहेत, तरीही, क्रोधासारखी भावनाही अत्यंत परिणामकारक रित्या अभिव्यक्त झाली आहे.”
हा चित्रपट फिलीपिन्समधील एका शोधकर्त्याची कथा आहे, जो स्वतःच नैतिक-अनैतिकच्या खोल विवरात अडकला आहे. हा शोधकर्ता, स्वतःची अस्वस्थता आणि अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याच्या गडद भूतकाळाची सावली त्याच्यावर पडली आहे, जी त्याला त्रास देत आहे. लव्ह डायझ हे ‘सिनेमॅटिक टाइम’चे स्वतःचे स्वरूप विकसित करण्यासाठी ओळखले जातात.
बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार
इफ्फीने अथेन्सच्या दिग्दर्शक असिमिना प्रोड्रू यांना ‘बिहाइंड द हेस्टॅक्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या महोत्सवात या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रिमियर झाला होता. हा चित्रपट म्हणजे अनावश्यक नैतिकतेच्या तीव्र मानसशास्त्रीय दृष्टीकोनावरील एक शोधनिबंध आहे, वांशिक निर्वासितांच्या समस्येविषयी असलेला तिटकारा आणि पौगंडावस्थेतील सजगता याकडे लक्ष वेधणारा आहे, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. एक माणूस, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी यांना पहिल्यांदाच एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि त्या दरम्यान त्यांच्या प्रत्येक कृतीची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. त्यांच्या या प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारे कथानक या चित्रपटात आहे.
प्रवीण कांड्रेगुला यांना ‘'सिनेमाबंदी' ‘ या तेलुगु चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार
दिग्दर्शक, लेखक आणि सिनेमॅटोग्राफर प्रवीण कांड्रेगुला यांना बंदी या चित्रपटासाठी परीक्षकांच्या विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ज्यामध्ये एका अतिशय गरीब आणि जगण्याचा संघर्ष करणाऱ्या रिक्षा चालकाची कथा आहे. ज्या रिक्षा चालकाला एक अतिशय महागडा कॅमेरा बेवारस स्थितीत सापडतो, जो त्याला रिक्षा चालकापासून चित्रपट निर्माता बनण्याच्या प्रवासाकडे घेऊन जातो. भारतामध्ये चित्रपटाविषयी असलेलं कमालीचं वेड आणि आकांक्षांची कहाणी हा चित्रपट सांगत असल्याचं परीक्षकांचं मत आहे.
सर्वोत्तम भारतीय आणि जागतिक चित्रपटाची निवड करण्याचे आव्हान ज्युरींनी पेलले
या चित्रमय पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आणि त्यातून सर्वोत्तम भारतीय आणि जागतिक चित्रपटाची निवड करण्याचे आव्हान कोणी पेलले? आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेल्या परीक्षक मंडळाचे नेतृत्व इस्राएली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नादाव लॅपिड यांनी केले आहे तर या परीक्षकांमध्ये अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्कल शेवान्स, फ्रेंच माहितीपट निर्माते, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार झेवियर अँग्युलो बार्टुरेन आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा समावेश होता .
अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान
अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. काही सन्मान माझ्यासाठी विशेष मौल्यवान आहेत, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल इफ्फी आणि भारत सरकारचे आभार मानतो असे चिरंजीवी यांनी सांगितले.चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असं होतं, चित्रपट सृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. आणि आता माझी कीर्ती, माझे नाव, करिश्मा, सर्व माझ्या चाहत्यांचे अनमोल प्रेम आणि आपुलकी हे सगळं मला तुमच्याकडून मिळालं. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणार्या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणार्या चित्रपटसृष्टीचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे चिरंजीवी यांनी सांगितले.
'फाऊदा' या वेब मालिकेचे निर्माते- लिओर राझ आणि अॅव्ही इसाशेरॉफ हे देखील इफ्फीच्या सांगता सोहळ्याला उपस्थित होते. 53व्या इफ्फीमध्ये काल रविवारी फाऊदा या वेब मालिकेच्या चौथ्या पर्वाचा प्रिमिअर होणं हा एक मोठा सन्मान असल्याची भावना अॅव्ही इसाशेरॉफ यांनी व्यक्त केली. तर भारतातील लोकांसोबत आपलं वेगळं नातं जोडलं गेलं आहे, 'फाऊदा' ही आपली बेव मालिकेला भारतात मोठा प्रेक्षक आणि त्यांचं प्रेमही लाभलं ही गोष्ट भारावून टाकणारी आहे अशी भावना लिओर राझ यांनी बोलून दाखवली.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/Radhika/Shailesh/Tushar/D.Rane
Follow us on social media:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879613)
Visitor Counter : 284
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam