पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे पंतप्रधानांनी हस्ते 10,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


“आंध्र प्रदेशातील लोकांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे”

“विकासाचा मार्ग बहुआयामी आहे. हा मार्ग सामान्य नागरिकांच्या आवश्यकता आणि मूलभूत गरजांवर भर देणारा आहे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा आराखडा सादर करत आहे“

“समावेशक वृद्धी आणि समावेशक विकासाचा आमचा दृष्टीकोन आहे”

“पीएम गती शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यामुळे केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या गतीमध्येच वाढ झालेली नाही तर प्रकल्पांच्या खर्चातही कपात झाली आहे”

“नील अर्थव्यवस्था पहिल्यांदाच इतक्या प्राधान्याची बाब बनली आहे”

Posted On: 12 NOV 2022 4:36PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे 10,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, विप्लव विरुदु अल्लुरू सीतारामराजू यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आंध्र प्रदेशला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. व्यापार आणि व्यवसायाची अतिशय समृद्ध परंपरा असलेले विशाखापटणम हे एक विशेष शहर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्राचीन भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर असल्यामुळे विशाखापटणम हे हजारो वर्षांपूर्वी पश्चिम आशिया आणि रोमशी होणाऱ्या व्यापारासाठीच्या मार्गाचा एक भाग होते तसेच आजच्या काळात आणि या युगात भारताच्या व्यापाराचे हे मध्यवर्ती ठिकाण आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 10,500 कोटी रुपये खर्चाच्या ज्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होत आहे, ते प्रकल्प पायाभूत सुविधा, सुलभ जीवन आणि आत्मनिर्भर भारताचे नवे आयाम खुले करतील आणि विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशच्या आशा आणि आकांक्षांच्या पूर्ततेचे एक माध्यम बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा पंतप्रधानांनी यावेळी विशेष उल्लेख केला आणि आंध्र प्रदेशसाठी त्यांचे प्रेम आणि समर्पित वृत्ती याला तोड नाही असे सांगितले.  

शिक्षण असो वा उद्यमशीलता, तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या लोकांनी आपला ठसा उमटवला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यांची ही ओळख केवळ त्यांच्या व्यावसायिक गुणवैशिष्ट्यांमुळे निर्माण झालेली नाही तर आंध्र प्रदेशच्या लोकांचा अतिशय हसतमुख स्वभाव आणि मित्रत्वाची भावना यामुळेही झालेली आहे, असे ते म्हणाले. लोकार्पण आणि पायाभरणी होत असलेल्या प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि या प्रकल्पांमुळे या राज्याच्या विकासाच्या गतीला चालना मिळेल, असे सांगितले.  

या अमृत काळात आपला देश विकसित भारताच्या उद्देशाने विकासाच्या मार्गावर झपाट्याने पुढे जात आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विकासाचा मार्ग बहुआयामी असून सामान्य नागरिकांच्या आवश्यकता आणि मूलभूत गरजांवर तो भर देत आहे आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी एक आराखडा मांडत आहे, असे त्यांनी सांगितले. समावेशक विकासाचा सरकारचा दृष्टीकोनही त्यांनी अधोरेखित केला. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याच्या, यापूर्वीच्या सरकारांच्या दृष्टीकोनावर पंतप्रधानांनी टीका केली. त्यांच्या या वृत्तीमुळे लॉजिस्टिक्सच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि पुरवठा साखळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असे त्यांनी सांगितले. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स मल्टीमोडल कनेक्टिविटीवर अवलंबून असल्यामुळे विकासाच्या एकात्मिक दृष्टीकोनावर भर देत असताना पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत एका नव्या दृष्टीकोनाचा अंगिकार सरकारने केल्याची माहिती त्यांनी दिली. आजच्या प्रकल्पांच्या माध्यमातून एकात्मिक विकासाचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी प्रस्तावित आर्थिक मार्गिका प्रकल्पामधील 6 पदरी मार्ग, बंदर जोडणीसाठी स्वतंत्र मार्ग, विशाखापटणम रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि मासेमारीसाठी अत्याधुनिक बंदराची उभारणी या प्रकल्पांची माहिती दिली. पंतप्रधानांनी या एकात्मिक दृष्टीकोनाचे श्रेय पीएम गती शक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याला दिले आणि यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीला केवळ गती मिळाली नाही तर प्रकल्पांच्या खर्चातही कपात झाली आहे, असे सांगितले. मल्टी मोडल वाहतूक प्रणाली प्रत्येक शहराचे भविष्य आहे आणि विशाखापटणमने या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले. आंध्र प्रदेश आणि त्याचा किनारपट्टीलगतचा भाग विकासाच्या शर्यतीत नवी चालना आणि उर्जेसह पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक हवामानात निर्माण होत असलेल्या समस्यांचा त्यांनी उल्लेख केला आणि महत्त्वाच्या उत्पादनांच्या पुरवठ्यात आणि उर्जाविषयक गरजांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, या खडतर कालखंडातही भारताने विकासाचा एक नवा अध्याय लिहिला, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या कामगिरीची तज्ञांकडून प्रशंसा होत असून त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे आणि संपूर्ण जगासाठी भारत आशेचा एक किरण बनला आहे, असे त्यांनी सांगितले. भारत आपल्या नागरिकांच्या आशा आकांक्षाची पूर्तता करत काम करत असल्यामुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक धोरण आणि निर्णय सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी होत आहे. यावेळी पंतप्रधानांनी पीएलआय योजनेचा उल्लेख करत, जीएसटी, आयबीसी आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधांची मालिका यामुळे भारतातील गुंतवणुकीत वाढ झाली आहे, असे सांगितले. त्याचबरोबर गरिबांच्या कल्याणाच्या योजनांचा विस्तार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. विकासाच्या या प्रवासात यापूर्वी जी क्षेत्र उपेक्षित होती त्यांचा देखील आज समावेश केला जातो आहे. अगदी सर्वात जास्त मागास जिल्ह्यांच्या विकासाच्या योजना देखील आकांक्षित जिल्हे कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. गेली अडीच वर्षे लोकांना देण्यात येत असलेले मोफत रेशन, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दर वर्षी जमा होणारे सहा हजार रुपये, ड्रोन, गेमिंग आणि स्टार्ट अप संबंधित नियमांमध्ये उदारीकरण अशा अनेक पावलांची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खोल पाण्यातून ऊर्जा निर्माण करण्याच्या आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या प्रकल्पाचे उदाहरण देऊन पंतप्रधानांनी सुस्पष्ट उद्दिष्टांच्या महत्वावर भर दिला. नील अर्थव्यवस्थेवर सरकारचे लक्ष असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. "नील अर्थव्यवस्थेला पहिल्यांदाच मोठे प्राधान्य देण्यात आले आहे", असे ते पुढे म्हणाले. मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड आणि विशाखापट्टणम मासेमारी बंदराचे आधुनिकीकरण अशा आजपासून सुरू झालेल्या सुविधांचा उल्लेख त्यांनी केला.

समुद्र हा अनेक शतकांपासून भारताच्या समृद्धीचा स्त्रोत राहिला आहे आणि आपल्या समुद्र किनाऱ्यांनी, या समृद्धीच्या प्रवेशद्वाराचे कार्य केले आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देशात बंदरांच्या विकासासाठी सुरू असलेले हजारो कोटी रूपये खर्चाचे प्रकल्प आजपासून आपल्याला व्यापक प्रमाणावर विस्तारत गेलेले दिसतील, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की 21 व्या शतकातील भारत हा सर्वांगिण विकासाची संकल्पना प्रत्यक्षात साकार करतो आहे. देशाच्या विकासाच्या या मोहिमेत आंध्र प्रदेश मोलाची भूमिका बजावत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. जगन रेड्डी, आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, आंध्र प्रदेशातील खासदार आणि विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

सुमारे 450 कोटी रुपये खर्चाच्या विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हे पुनर्विकसित स्थानक दररोज 75,000 प्रवाशांना सेवा देईल आणि आधुनिक सुविधा प्रदान करत प्रवाशांना आनंददायी प्रवासाचा अनुभव देईल.

विशाखापट्टणम मासेमारी बंदराचे आधुनिकीकरण आणि अद्यतन करण्याच्या कामाचीही पंतप्रधानांनी पायाभरणी केली. या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या मासेमारी बंदराचे अद्यतन आणि आधुनिकीकरण केल्यानंतर, त्यांची हाताळणी क्षमता प्रतिदिन 150 टन वरून प्रतिदिन सुमारे 300 टन इतकी वाढेल, तसेच सुरक्षितपणे माल चढवणे आणि उतरवणे साध्य होईल तसेच इतर आधुनिक पायाभूत सुविधांमुळे धक्क्यावर लागणारा  वेळ कमी होईल, अपव्यय कमी होईल आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल. 

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेश क्षेत्रातून जाणाऱ्या सहा पदरी ग्रीनफिल्ड रायपूर-विशाखापट्टणम इकॉनॉमिक कॉरिडॉरची पायाभरणीही केली. 3750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून हा मार्ग बांधला जाणार आहे. यामुळे छत्तीसगड आणि ओडिशा मधील औद्योगिक विभाग आणि विशाखापट्टणम बंदर आणि चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग या  दरम्यान दळणवळण जलद गतीने होईल. तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशातील आदिवासी आणि मागास भागांचा संपर्क सुधारेल. विशाखापट्टणममधील कॉन्व्हेंट जंक्शन ते शीला नगर जंक्शनपर्यंत समर्पित बंदर मार्गाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या मार्गामुळे विशाखापट्टणम शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच स्थानिक आणि बंदरात जाणाऱ्या मालाची वाहतूक सुकर होईल. श्रीकाकुलम-गजपती कॉरिडॉरचा एक भाग असलेला, राष्ट्रीय महामार्ग- 326A (NH-326A) वरील 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा नरसन्नपेटा ते पथपट्टणम हा मार्ग पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे या भागातील दळणवळण सुविधा वाढतील.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा आंध्र प्रदेशातील यू फिल्ड ऑनशोअर डीपवॉटर ब्लॉक प्रोजेक्ट हा 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा प्रकल्प पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला. सुमारे 3 दशलक्ष मेट्रिक प्रमाणित घनमीटर प्रतिदिन (MMSCMD) वायू निर्मिती क्षमता असलेला हा सर्वात खोल वायू प्रकल्प आहे. सुमारे 6.65 एम एम एस सी एम डी (MMSCMD) क्षमतेच्या गेलच्या (GAIL) श्रीकाकुलम अंगुल नॅचरल गॅस पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. 745 किमी लांबीची ही पाइपलाइन एकूण 2650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधली जाणार आहे. ही पाइपलाइन नॅचरल गॅस ग्रिड (NGG) चा एक भाग असून आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या विविध जिल्ह्यांतील घरे, उद्योग, व्यावसायिक युनिट्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा करत महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करेल. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यांतील सिटी गॅस वितरण नेटवर्कला या पाइपलाइनमार्फत नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जाईल.

***

M.Pange/S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1875426) Visitor Counter : 94