पंतप्रधान कार्यालय

बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 11 NOV 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू येथे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन  केले.  पंतप्रधानांनी विमानतळ प्राधिकरणांशी संवाद साधला. यावेळी  त्यांना टर्मिनल 2 च्या इमारतीच्या मॉडेलची माहिती देण्यात आली. पंतप्रधानांनी  अनुभूती  केंद्रातील सुविधांचीही पाहणी केली आणि केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 च्या परिसरामधून पायी  चालत पाहणी केली. पंतप्रधानांनी टर्मिनल 2 बद्दलचा लघुपटही पाहिला.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 क्षमतेत भर घालेल आणि सुविधांमध्ये आणखी वाढ करेल. आपल्या  शहरी केंद्रांना उच्च  दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.टर्मिनल सुंदर आणि प्रवासी स्नेही  आहे ! त्याचे उद्घाटन करून आनंद झाला.”

 

पार्श्वभूमी

बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 2 सुमारे 5000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे टर्मिनल विमानतळाची प्रवासी  क्षमता प्रतिवर्ष सध्याच्या  सुमारे 2.5 कोटीं प्रवासी क्षमतेवरून  दुप्पट करून  5-6 कोटी प्रवाशांपर्यंत पोहोचवेल.

बंगळुरूच्या गार्डन सिटीला मानवंदना  म्हणून आणि प्रवाशांना  "बागेत फिरत असल्याचा " अनुभव मिळावा यांसारखी  टर्मिनल 2 ची रचना करण्यात आली आहे. प्रवासी 10,000+ चौरस मीटर हिरव्या भिंती, हँगिंग गार्डन्स आणि बाह्य भागात असलेल्या  बागांमधून प्रवास करतील.विमानतळाने संपूर्ण संकुलामध्ये अक्षय्य ऊर्जेच्या 100% वापरासह  शाश्वततेचा  मापदंड यापूर्वीच  स्थापित केला आहे.  शाश्वततेच्या   तत्त्वांच्या आधारावर टर्मिनल 2 ची रचना करण्यात आली आहे. शाश्वततेच्या उपक्रमांवर आधारित, टर्मिनल 2 हे कार्यान्वयन  सुरू करण्यापूर्वी यूएस जीबीडी द्वारे  (ग्रीन बिल्डिंग कौन्सिल)   पूर्व-प्रमाणित प्लॅटिनम मूल्यांकन  मिळवणारे जगातील सर्वात मोठे टर्मिनल असेल. 'नवरसा' च्या  संकल्पनेच्या माध्यमातून  टर्मिनल 2 मध्ये  सर्व  कलाकृती एकत्रितपणे दर्शवण्यात आल्या आहेत. या कलाकृती कर्नाटकचा वारसा आणि संस्कृती तसेच व्यापक भारतीय लोक परंपरा  प्रतिबिंबित करतात.

एकंदरीत, टर्मिनल 2 ची रचना  आणि वास्तू स्थापत्य , बागेमध्ये असणारे  टर्मिनल, शाश्वतता , तंत्रज्ञान आणि कला आणि संस्कृती या चार   मार्गदर्शक तत्त्वांनी प्रभावित आहे.  टर्मिनल 2 आधुनिक असले तरी निसर्गाशी जवळीक साधणारे आणि सर्व प्रवाशांना एक संस्मरणीय 'गंतव्य स्थळाचा ' अनुभव देणारे पैलू हे घटक प्रदर्शित करतात .

पंतप्रधानांसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित  होते.

 

 

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane



(Release ID: 1875253) Visitor Counter : 191