पंतप्रधान कार्यालय

आदिवासी बालकांचा संगीत वाद्यवृंद 31 ऑक्टोबर रोजी केवडिया येथे पंतप्रधानांसमोर सादरीकरण करणार


एकेकाळी अंबाजी मंदिरात भीक मागणारी बालके पंतप्रधानांच्या प्रोत्साहनानंतर केवडिया येथे सादरीकरण करणार

यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या अंबाजी दौऱ्यातही या वाद्यवृंदाने सादरीकरण केले होते

Posted On: 28 OCT 2022 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022

केवडिया येथे बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी शहरातील आदिवासी बालकांचा संगीत वाद्यवृंद येत्या 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान केवडियाला भेट देणार आहेत.

पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याची ही या वाद्यवृंदाची पहिलीच वेळ नाही. 30 सप्टेंबर 2022 रोजी, पंतप्रधानांनी गुजरातमध्ये अंबाजी येथे भेट दिली होती आणि 7200 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले होते, त्यावेळी आयोजित समारंभासाठी पंतप्रधानांचे आगमन होत असताना या वाद्यवृंदाने त्यांचे स्वागत केले होते.

या युवा वाद्यवृंदाचे पंतप्रधानांनी कौतुक केले होते आणि त्यांच्या सादरीकरणाचा आनंदही घेतला होता. इतकेच नाही तर समारंभाला सुरूवात होण्यापूर्वी त्यांनी या वाद्यवृंदाशी वैयक्तिक संवादही साधला होता. आपल्या या युवा मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत छायाचित्रही काढून घेतले होते.

उत्कृष्ट संगीत कौशल्य आत्मसात करणाऱ्या या आदिवासी बालकांची कहाणी जाणून घेण्यासारखी आहे. ही मुले एकेकाळी आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आणि शिक्षणाच्या संधीसाठी संघर्ष करत होती. त्यासाठी अंबाजी मंदिराजवळ पाहुण्यांसमोर भीक मागताना ही मुले सतत दिसत. अंबाजी येथील श्री शक्ती सेवा केंद्र नावाच्या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने या मुलांना मदतीचा हात दिला. त्यांना शिक्षण दिले आणि त्यांची कौशल्येही जाणून घेतली. श्री शक्ती सेवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेने या आदिवासी मुलांना वाद्यवृंदासाठी उपयुक्त असे संगीताचे शिक्षणही दिले आहे.

पंतप्रधानांनी या युवा वाद्यवृंदाच्या सादरीकरणाचा आनंद घेतला, त्यांचे कौतुक केले आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर रोजी या वाद्यवृंदाला केवडिया येथे आमंत्रितही केले आहे, जेणेकरून त्यांनाही या ऐतिहासिक दिवशी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन सादरीकरण करता येईल.

31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान केवडियाला भेट देणार असून सरदार पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणार आहेत. एकता दिनानिमित्त आयोजित संचलनातही पंतप्रधान सहभागी होणार असून लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये विविध नागरी सेवांशी संबंधित अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत.

S.Tupe/M.Pange/ P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871627) Visitor Counter : 166