पंतप्रधान कार्यालय
गुजरातमध्ये स्टेच्यू ऑफ युनिटीजवळ मिशन लाईफच्या उद्घाटन समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
20 OCT 2022 3:04PM by PIB Mumbai
संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव जनरल एंटोनियो गुटरेसजी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर, देश विदेशातून आलेले इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, या गौरवशाली भूमीवर आपणा सर्वांचे स्वागत. एंटोनियो गुटरेसजी यांच्यासाठी तर भारत त्यांच्या दूसऱ्या घराप्रमाणेच आहे. त्यांनी त्यांच्या युवावस्थेत अनेक वेळा भारताला भेट दिली आहे. गोव्याबरोबर त्यांचे कौटुंबिक संबंध देखील आहेत. गुजरातमध्ये मी आज आपल्याच कुटूंबातील सदस्यांचे स्वागत करत असल्यासारखे भासत आहे. एंटोनियो गुटरेसजी तुम्ही येथे आलात त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि खुप खुप अभिनंदन. मला आनंद वाटतो की मिशन लाईफ लॉन्च करताना अनेक देश या संकल्पाशी जोडलेले आहेत. मी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, युकेच्या पंतप्रधान लिज ट्रस, गुयानाचे राष्ट्रपती इरफान अली, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडीस, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ,
मादागास्करचे राष्ट्रपती एंड्री राजोएलिनाजी, नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूरजी, मालदीवचे बंधू सोलिहजी, जॉर्जियाचे पंतप्रधान इराकली गरिबाशविलि, एस्टोनियाचे पंतप्रधान कजा कल्लास यांचे मनापासून आभार मानतो.
मित्रांनो,
या कार्यक्रमाचे आयोजन आपले राष्ट्रीय गौरव सरदार वल्लभभाई पटेल यांची विशाल प्रतिमा स्टेच्यू ऑफ युनिटी जवळ करण्यात आले आहे आणि हवामान बदल विरोधी जीवनात एकता हा महत्वपूर्ण घटक आहे. जगातील सर्वात मोठी प्रतिमा आपल्याला पर्यावरणासंबंधी मोठे उद्दिष्ट ठरविण्याची आणि ते साध्य करण्याची प्रेरणा देईल.
मित्रांनो,
जेंव्हा आपले आदर्श विशाल असतात तेंव्हा त्याची किर्ती देखील विशाल असते. या कार्यक्रमाचे आयोजन गुजरातमध्ये होणे खुप महत्वपूर्ण आहे. आणि हे अगदी उपयुक्त आहे. गुजरात भारतातील त्या राज्यांपैकी एक राज्य आहे ज्यांनी सर्वप्रथम नवीकरणीय उर्जा आणि पर्यावरण संरक्षणासाठी अनेक पावले उचलली आहेत. मग ते कालव्यांवर सोलार पॅनल लावणे असो की दुष्काळग्रस्त भागात पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जल संवर्धन अभियान असो, गुजरात नेहमीच नेतृत्व करणारे आणि नवा पायंडा पाडणारे राज्य ठरले आहे.
मित्रांनो,
हवामान बदल हा केवळ धोरण निर्मितीचा विषय आहे अशी धारणा बनवण्यात आली आहे. मात्र, ज्या क्षणी आपण धोरणाला जोडून या मुद्याचा विचार करु लागतो तेंव्हा कळत नकळत आपल्या मनात हे येऊन जाते याबाबतीत सरकारच काही तरी करु शकेल. किंवा आपण असाही विचार करु लागतो की आंतरराष्ट्रीय संस्थांनी याबाबतीत ठोस पावले उचलली पाहिजेत. हे अगदी रास्त आहे की सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न ते कसोशीने करत आहेत. या मुद्द्याचे गांभीर्य केवळ केवळ चर्चासत्रांपुरते मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात, घराघरात पोहचल्याचे दिसून येत आहे.
हवामान बदलामुळे झालेले परिणाम तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहू शकत आहात. मागील काही दशकात आपण या दुष्परिणामांना आणखीनच तीव्र होताना पाहिले आहे, आकस्मिक संकटांचा सामना केला आहे. आज आपल्या हिमनद्या वितळत आहेत, समुद्रांचा जलस्तर वाढतो आहे. नद्या कोरड्या पडत आहेत, ऋतुचक्र अनिश्चित झाले आहे. आणि हे परिणाम लोकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत की हवामान बदल हा मुद्दा केवळ धोरण आखणीपुरता मर्यादित नाही. लोकांना आता हे जाणवत आहे की एक व्यक्ती, एक कुटुंब आणि एक समुदाय म्हणून या पृथ्वीसाठी, या धरतीसाठी प्रत्येकाने काही तरी जबाबदारी घेऊन प्रत्येकाने काही तरी केले पाहिजे. लोकांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे की ते स्वतःच्या प्रयत्नाने किंवा कुटुंबातील सदस्यांसह आणि समुदायाच्या सोबतीने पृथ्वीच्या या धरतीच्या सुरक्षिततेसाठी ते कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करु शकतात ?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिशन लाईफमध्ये आहेत. 'पर्यावरणासाठी जीवन' हाच मिशन लाईफचा मूल मंत्र आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीगत प्रयत्नांची कामना करत आज मी मिशन लाईफचा दृष्टीकोन जगासमोर मांडत आहे. मिशन लाईफ पृथ्वीच्या संरक्षणासाठी लोकांच्या शक्तिला एकत्र जोडत आहे, त्यांचा योग्य वापर करायला शिकतो आहे. मिशन लाईफ हवामान बदल विरोधातील लढाईचा लोकतान्त्रिक पद्धतीने विचार करत आहे. ज्यामध्ये प्रत्येक जण आपल्या सामर्थ्यानुसार योगदान देऊ शकतो. छोट्या छोट्या प्रयत्नांनी देखील व्यापक प्रभाव पाडू शकतात यावर मिशन लाईफचा विश्वास आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपण खुप काही करू शकतो यासाठी आपल्याला मिशन लाईफ प्रेरित करते. आपल्या जीवनशैलीत बदल करून पर्यावरणाचे संरक्षण केले जाऊ शकते असे मिशन लाईफचे म्हणने आहे. मी तुम्हाला दोन गमतीदार उदाहरणे देऊ इच्छितो, खुपच साधी गोष्ट मी सांगणार आहे. काही जणांना ए.सी. चे तापमान 17 किंवा 18 डीग्री सेल्सिअस ठेवायला खुप आवडते. पण ए.सी. चे तापमान इतके कमी केल्यावर हेच लोक रजई किंवा गोदडीचा वापर करतात. ए.सी. चे कमी केलेले प्रत्येक डीग्री तापमान पर्यावरणाला तितकेच हानीकारक आहे. म्हणजेच आपण हे वाचवण्यासाठी प्रयत्न करु शकतो. म्हणजेच जर आपण जीवनशैलीत बदल केले तर पर्यावरण संरक्षणाला खुप मोठा फायदा होईल. जीवनशैलीतील बदलाचे आणखी एक उदाहरण सांगू इच्छितो. आपण पाहतो की काही लोक 5 किलोमीटर प्रति तास ॲव्हरेज देणारी गाडी चालवत जीममध्ये जातात आणि ट्रेड मीलवर जोरदार कसरत करुन घाम गाळतात. बंधूंनो, हा घाम तुम्ही पायी चालून किंवा सायकलवर जीमला जाल तर पर्यावरण संरक्षणासोबतच स्वास्थ्य संरक्षण देखील घडले असते.
मित्रांनो,
जीवनशैलीतील बदलांमुळे व्यक्तिगत आणि समाजाच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठे परिणाम साधता येतात. मी याचेही एक उदाहरण देऊ इच्छितो. काही वर्षांपूर्वी, भारतात देशवासीयांना जास्तीत जास्त प्रमाणात LED बल्ब वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. लोकांचे वीज बिल कमी व्हावे, त्यांचा वीजेवरचा खर्च कमी करणे हा या आवाहनाचा मुख्य उद्देश होता. सरकारने LED बल्बची एक योजना सुरू केली आणि देशातील खाजगी क्षेत्रही या योजनेत सहभागी झाले. इथे आलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ञांना हे जाणून आश्चर्य होईल की थोड्याच कालावधीत भारतातील लोकांनी 160 कोटींहून अधिक LED बल्ब आपल्या घरांमध्ये लावून परिवर्तन घडविले, याचा परिणाम असा झाला की, 100 मिलियन टनाहून अधिक कार्बन डाय ऑक्साईडचे उत्पादन कमी करण्यात यश आले, त्याचे उत्सर्जनही कमी करण्यात यश आले. आणि मी याची नोंद घेण्यास आपल्याला सांगू इच्छितो की, हे दरवर्षी घडत आहे, ही फक्त एका वेळेची घटना नाही, दरवर्षी हा लाभ होणार आहे, होत आहे.
LED बल्बमुळे आता दरवर्षी इतके उत्सर्जनही कमी होत आहे.
मित्रांनो,
गुजरात ही महात्मा गांधींची जन्मभूमी आहे. ते एक अशा विचारवंतांपैकी एक होते ज्यांना पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगण्याचे महत्त्व कळले होते. त्यांनीच विश्वस्तपदाची संकल्पना विकसित केली होती. "मिशन लाइफ" हे आपल्याला पर्यावरण प्रति विश्वस्त बनवते. विश्वस्त असा असतो जो संसाधनांचा आंधळेपणाने वापर करू देत नाही. विश्वस्त हा शोषक म्हणून काम करत नाही तर पोषक म्हणून काम करतो. मिशन लाइफ पी3 ची संकल्पना मजबूत करेल. पी 3 म्हणजे प्रो प्लॅनेट पीपल . आज आपण अशा जगात वावरत आहोत जिथे कोण कोणत्या देशाच्या किंवा गटाच्या सोबत आहे आणि कोण कोणत्या देशाच्या किंवा गटाच्या विरोधात आहे याची चर्चा सुरू आहे. पण मिशन लाइफ, पृथ्वीवरील लोकांना प्रो प्लॅनेट पीपल म्हणून जोडते, त्यांना आपल्या विचारांमध्ये सामावून घेते, त्यांना एकत्र करते. मिशन लाइफ हे पृथ्वीची जीवन शैली,पृथ्वीसाठी आणि पृथ्वीवरील या मूलभूत तत्त्वावर चालते.
मित्रांनो,
भूतकाळातून शिकूनच आपण चांगलं भविष्य घडवू शकतो. भारतात हजारो वर्षांपासून निसर्गाची पूजा करण्याची समृद्ध परंपरा आहे. आपल्या वेदांमध्येही पाणी, जमीन, हवा आणि निसर्गाने दिलेल्या सर्व गोष्टींचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे. उदाहरणार्थ, अथर्ववेद म्हणतो: माता भूमिः पुत्रोहम पृथ्वीः। म्हणजेच पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपण तिची मुले आहोत. कमी वापर, पुनर्वापर आणि पुनर्निर्माण आणि अशी चक्राकार अर्थव्यवस्था हजारो वर्षांपासून आपल्या भारतीयांच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की जगाच्या अनेक भागांमध्ये, अनेक देशांमध्ये अशा प्रथा आजही प्रचलित आहेत, ज्या आपल्याला निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची प्रेरणा देतात. मिशन लाइफमध्ये निसर्गाच्या संवर्धनाशी संबंधित प्रत्येक जीवनशैलीचा समावेश असेल, जी आपल्या पूर्वजांनी अंगीकारली होती आणि ज्याला आपण आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवू शकतो.
मित्रांनो,
आज, भारताचे वार्षिक दरडोई कार्बन उत्सर्जन केवळ 1.5 टन आहे, त्या तुलनेत जागतिक कार्बन उत्सर्जन सरासरी 4 टन प्रतिवर्ष आहे. तरीही, हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचे निराकरण करण्यात भारत आघाडीवर आहे. कोळसा आणि लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही उज्ज्वला योजना सुरू केली. जलसुरक्षेचा विचार करून, आज आम्ही भारतातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ 'अमृत सरोवर' बनवण्याची मोठी मोहीम राबवत आहोत. येथे कचऱ्यापासून संपत्ती बनवण्यावर अभूतपूर्व भर दिला जात आहे. आज, भारत जगातील चौथ्या क्रमांकाची नवीकरणीय ऊर्जा क्षमता असलेले राष्ट म्हणून उदयास आले आहे. आज पवन ऊर्जेतही आम्ही जगात चौथ्या क्रमांकावर आहोत, तर सौरऊर्जेत पाचव्या क्रमांकावर आहोत. गेल्या 7-8 वर्षांत भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता सुमारे 290 टक्क्यांनी वाढली आहे. ठरवलेल्या मुदतीच्या 9 वर्षे आधीच विद्युत क्षमतेच्या 40 टक्के विद्युत जीवाश्म नसलेल्या इंधनाच्या स्त्रोतापासून तयार करण्याचे उद्दिष्ट देखील आम्ही साध्य केले आहे. आम्ही पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्टही यावर्षाच्या शेवटी पूर्ण करण्याचे ध्येय समोर ठेवले होते आणि तेही आम्ही अंतिम मुदतीच्या 5 महिने आधी गाठले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या लक्ष्यावर भारत काम करत आहे. भारत देखील हायड्रोजन इकोसिस्टमसाठी पर्यावरणपूरक ऊर्जा स्त्रोताकडे वेगाने वाटचाल करत आहे आणि आता गुजरात हे राज्य या ग्रीन हायड्रोजनचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. यामुळे भारत आणि जगातील अनेक देशांना त्यांचे नेट झिरोचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.
मित्रांनो,
आज भारत प्रगती सुद्धा करत आहे आणि जगासमोर एक उत्तम उदाहरण निर्माण करून निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा मार्ग ही तयार करत आहे. आज भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आपले वनक्षेत्रही वाढत आहे आणि वन्यजीवांची संख्याही सातत्याने वाढत आहे. भारताला आता जगासोबतची भागीदारी आणखी वाढवायची आहे. "वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड" अशा मोहिमा अशा उद्दिष्टांप्रती आपला संकल्प मजबूत करतात. कोलिएशन फॉर डिझास्टर रेझिलिएंट इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीचे नेतृत्व करून, भारताने जगाला पर्यावरण संरक्षणाच्या संकल्पनेची जाणीव करून दिली आहे. "मिशन लाइफ" ही या मालिकेतील पुढची पायरी आहे.
मित्रांनो,
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस माझ्याशी सहमत होतील की भारत आणि संयुक्त राष्ट्रांनी जेव्हा जेव्हा एकत्र काम केले आहे, तेव्हा जगाला एक चांगलं स्थान बनवण्याचे नवीन मार्ग सापडले आहेत. भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला संयुक्त राष्ट्र संघाने पाठिंबा दिला होता आणि आज त्या संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्यामुळे योग हा जगातील लाखो लोकांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याचे एक कारण बनला आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष हे असेच एक उदाहरण आहे. भारताला आपल्या पारंपारिक आणि पर्यावरणपूरक, भरड धान्याला जगाशी जोडायचे होते. संयुक्त राष्ट्र संघानेही याला पाठिंबा दिला. पुढच्या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय भरड धान्य
वर्ष साजरे करणार आहोत, पण आतापासूनच त्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. मला खात्री आहे की संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने, "मिशन लाइफ"ला जगाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक नागरिकापर्यंत नेण्यात मोठे यश मिळेल. "प्रकृती रक्षिती रक्षित:"हा मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे. म्हणजेच जे निसर्गाचे रक्षण करतात, निसर्ग त्यांचे रक्षण करतो. मला विश्वास आहे की, या मिशन लाइफचे अनुसरण करून आपण एक चांगले जग निर्माण करू शकू. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार मानून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद
***
Jaydevi PS/G.Chippalkatti/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870543)
Visitor Counter : 159
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam